पोशाख नवनवा मला दिला,
नवनवा मुलुख मज दाखविला. ध्रु०
तयार करुनी मम सामुग्री
मधुर दयारस भरुनि समग्रीं
धाडुनि आई ! आधीं अग्रीं
धाडिलें लाडक्या मला मुला. १
एकाहुनिया एक भरजरी
वस्त्रें, अस्त्रें देशि परोपरि,
लाड पुरविशी किती खरोखरि,
किति माझें कौतुक तरि तुजला ! २
कार्यविशेषें जेथे जाईं
तुझ्या दयेचा तेथे आई,
सदा पहारा ठायीं ठायीं
सांभाळि सभोवति गे मजला ३
या मुलुखाची पाहुनि शोभा
लालचुनी मन लागे लोभा;
देशी तूं, मी मिरवीं टेंभा;
निज पराक्रमचि समजें सगळा. ४
अंत नसे गे त्वत्प्रेमातें
अशा तुला मी विसरें माते,
उदरीं घालुनि अपराधातें
गे माते, राग न तूं धरिला. ५
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.