जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय !'
मी जातां राहिल कार्य काय ? ध्रु०
सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल;
तारे अपुला क्रम आचरतिल,
असेच वारे पुढे वाहतिल,
होईल कांहिं का अंतराय ? १
मेघ वर्षतिल, शेतें पिकतिल,
गर्वानें या नद्या वाहतिल,
कुणा काळजी कीं न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय ? २
सखेसोयरे डोळे पुसतिल,
पुन्हा आपल्या कामिं लागतिल,
उठतिल, बसतिल, हसुनि खिदळतिल,
मी जातां त्यांचें काय जाय ? ३
रामकृष्णही आले; गेले !
त्याविण जग का ओसचि पडलें ?
कुणीं सदोदित सूतक धरिलें ?
मग काय अटकलें मजशिवाय ? ४
अशा जगास्तव काय कुढावें ?
मोहिं कुणाच्या कां गुंतावें ?
हरिदूता कां विन्मुख व्हावें ?
कां जिरवुं नये शांतींत काय ? ५
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.