मरणांत खरोखर जग जगतें;
अधि मरण, अमरपण ये मग तें. ध्रु०
अनंत मरणें अधीं मरावीं,
स्वातंत्र्याची आस धरावी,
मारिल मरणचि मरणा भावी,
मग चिरंजीवपण ये बघ तें. १
सर्वस्वाचें दान अधीं करिं,
सर्वस्वच ये स्वयें तुझ्या घरिं,
सर्वस्वाचा यज्ञ करीं तरि,
रे ! स्वयें सैल बंधन पडतें. २
स्वातंत्र्याचा एकचि ठावा
केवळ यज्ञचि मजला ठावा;
यज्ञ मार्ग ! हो यज्ञ विसावा !
का यज्ञाविण कांहीं मिळतें ? ३
सीता सति यज्ञीं दे निज बळि,
उजळुनि ये सोन्याची पुतळी,
बळी देउनी बळी हो बळी,
यज्ञेंच पुढे पाउल बढतें. ४
यज्ञिं अहर्निश रवि धगधगतो,
स्वसत्त्वदानें पाश छेदितो,
ज्योतिर्गण नव जन्मुनि जगतो,
रे स्वभाव हा ! उलटें भलतें. ५
प्रकृति-गती ही मनिं उमजुनिया
उठा वीर, कार्पण्य त्यजुनिया;
'जय हर ! गर्जा मातेस्तव या !
बडबडुनी कांहीं का मिळतें ? ६
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.