फेर्या दारावरी कुणी हा फेरीवाला करी ? ध्रु०
प्रभातकाळीं दीपविसर्जनिं,
सायंकाळीं दीपदर्शनीं,
पुकार करितां खिडकीवरुनी
नजर फेकितो वरी. १
पलीकडे वटवृक्षाखालीं
पारंब्यांची ज्याला जाळी,
गर्द साउली ज्या कवटाळी,
उभा आज तो परी. २
कंवराणीजी, गोखड्यांतुनी
जरा बघा तर हळुच ढुंकुनी,
हवा तरी घ्या बुरखा ओढुनि,
नजर चळो ना परी. ३
किति वीरांनीं सुंदर तरुणी
हरिल्या पूर्वी शत्रुपुरांतुनि,
रसाळ लिहिल्या कथा कवींनीं,
किती पुराणांतरीं ! ४
विशाल त्याचा बळकट बाहू
तरुणि फुलापरि शकेल वाहूं,
टोळांपरि मग शत्रू येवू,
उडविल माशांपरी. ५
नदीपलिकडे त्याची घोडी
टापा हाणी, जमीन फोडी
कशी खिणखिणे ! तिला न जोडी,
नेइल बिजलीपरी. ६.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.