पक्षि पिंजर्यातुनी उडाला, बसा हात चोळुनी ! ध्रु०
अफाट गगनीं दृष्टी फेका,
खुशाल मारा हजार हांका,
प्राणहि त्याच्या मागें झोका,
येइल का परतुनी ? १
डोळे फाडा, तोंडे वासा,
रडा पोटभर अथवा हासा,
बाजी आली, उलटा फासा
पडला हा कोठुनी ? २
अनंग कोणी कुमार आला,
हांक मुकी दे कंवराणीला,
जादूचा मग दोर लाविला
भरजरि खिडकींतुनी. ३
भक्कम तुमचा महाल सारा
दारावरही खडा पहारा,
जनानखान्या कुलुपें बारा,
गेल्या तुरि देउनी. ४
अतां वायुवर शस्त्रें हाणा,
खुशाल घ्या हो भाकाआणा,
उचला विडा, तयांना आणा
मर्द तरिच मी गणीं. ५
अगाध चक्रव्यूह सुरांचा,
झोपाळा त्यामधि रागांचा,
खेळ चालिला त्यावरि त्यांचा,
बघा जरा ढुंकुनी. ६
आकाशांतिल तारे उखडा,
तुरुंगांत वायूला जखडा,
कंवराणीला तेथे पकडा
कोणी वीराग्रणी ! ७
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.