घट तिचा रिकामा झर्यावरी,
त्या चुंबिति नाचुनि जळलहरी. ध्रु०
अशी कशी ही जादू घडली ?
बघतां बघतां कशी हरपली ?
का समजुनिया राणी अपुली
तिस उचलुनि नेई कुणी परी ? १
मिळत चालल्या तीनी सांजा,
दिवसाचा हा धुसर राजा,
चंद्रा सोपुनि अपुल्या काजा
घे निरोप कवळुनि जगा करीं. २
पलीकडे त्या करुनि कापणी
बसल्या बाया हुश्श करोनी,
विनोद करिती, रमती हसुनी,
जा पहा तिथे कुणी ही भ्रमरी. ३
तिथे वडाच्या पाळीभवती,
नवसास्तव मृगनयना जमती;
कुजबुजुनी गुजगोष्टी हसती,
रतिमंजरि हेरा तिथे तरी. ४
तांदुळ पदरीं, बिल्वदळ करीं
चरण क्षाळुनि जवळ तळ्यावरि,
जमति शिवालयिं पोक्त सुंदरी;
फिरकणी बघा ही त्यांत तरी. ५
पलीकडे वेळूंची जाळी;
तेथें वारा धुडगुस घाली,
शीळ गोड तीमधुनि निघाली,
ही झुळुक हरपली लकिरिपरी. ६
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.