तिकडे भीमाने काय केले ते ऐका. तो लोकांना म्हणाला,
“आपण न्यायदेवतेची एक प्रतिमा करून ती तिरडीवर ठेवू या. खांद्यावरून ती नेऊ या. ‘न्याय मेला, हाय हाय; न्याय मेला, हाय हाय’ असे दु:खाने म्हणू या!” सर्वांना ती कल्पना आवडली. एक तिरडी तयार झाली. तिच्यावर न्यायदेवतेची एक प्रतिमा निजवण्यात आली. खांद्यावर घेऊन लोक निघाले. ‘न्यायदेव मेला, हाय हाय,’ असे करीत ती प्रेतयात्रा निघाली.
तिकडून राजा हजारो शेटसावकारांसह, शेकडो सरदार-जहागीरदारांसह येत होता आणि इकडून ती न्यायदेवतेची प्रेतयात्रा येत होती. दोघांची वाटेत गाठ पडली. राजा रथातून खाली उतरला व तो शेतक-यांकडे जाऊन म्हणाला,
“तुम्ही हे काय म्हणता? मी जिवंत आसताना न्याय कसा मरेल?”
“या गावात तरी न्याय नाही!” भीमा म्हणाला.
“काय आहे तुमची तक्रार?” राजाने विचारले.
“महाराज, या गावचे शेतमालक आज मजूर झाले. ज्या केशवचंद्राने तुमचे स्वागत आज मांडले आहे, त्यानेच आमचे संसार धुळीला मिळविले. पाचाचे पन्नास केले नि सा-या जमिनी तो बळकावून बसला. महाराज, या गावातील सर्वांच्या जमिनी गेल्या तरी माझी उरली होती. केशवचंद्र म्हणे, ‘हजार रुपये घे परंतु ती मला विकत दे!’ मी जमीन विकायला तयार नव्हतो. तेव्हा खोटा खटला भरून माझ्याजवळून जमीन हिसकावून घेण्यात आली. न्याधीश पैशांचे मिंधे. वकील म्हणाला, ‘देव आकाशात नसतो, पैशाजवळ असतो!’ महाराज, खरेच का देव उरला नाही? न्याय उरला नाही? तुमच्याभोवती दागदागिन्यांनी सजलेली ही बडी मंडळी आहेत, आणि ही इकडची गरीब मंडळी पहा. या आयाबाया, ही आमची मुले. ना पोटभर खायला, ना धड ल्यायला. कसे जगावयाचे? श्रमणारे आम्ही. परंतु आम्हीच मरत आहोत. आम्ही सारे पिकवतो आणि हे खुशालचेंडू पळवतात. न्याय, कोठे आहे न्याय?