सकाळी दहा वाजता आईने बनवलेलं भाजणीचं थालीपीठ हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यासोबत खातांना राजेश आईला म्हणाला, "मस्त झालंय थालीपीठ आणि ठेचा! आणि सोबत ताजं दही असल्याने झकास बेत आहे. आता दुपारी तीनेक वाजेपर्यंत तरी भूक लागणार नाही. मी नाश्टा झाला की धर्मापूरला जाऊन येतो जरा."

"अरे राजेश! काय नुसता फिरत असतोस? आजच्या दिवस आराम केला असतास, मग उद्या गेला असतास. आज आपल्या गावातल्या नदीवरच्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरात संध्याकाळी जाऊ आपण!"

"आई! मी येतांना तुला फोन करीन मग तू ये तिथे. मला आज धर्मापूरला जाणे जरुरीचे आहे!!"

"जा बाबा जा! मी सांगितले तरी तू तुझ्या मनाप्रमाणेच करणार आहे ते माहित आहे मला! पण संध्याकाळी लवकर ये! उद्या गोडंबे काका आणि त्यांची सुनंदा येणार आहेत आपल्याकडे! तू येणार आहेस म्हणून बोलावून घेतले मुद्दाम त्यांना! तुला आधीच सांगितले असते तर तू मुंबईहून आलाच नसतास इकडे! टाळाटाळ केली असतीस!"

"अगं आई, हे काय चालवलंयस तू? मी तुला मागच्या वेळेस सुद्धा सांगितले होते की मी लग्न करणार नाही आहे. सुनंदाशी तर नाहीच!"

"आता बास झालं राजेश! एक शब्द बोलू नको! आतापर्यंत ऐकत आले तुझं पण आता मी तुझं ऐकणार नाही! मी गोडंबे काकांना शब्द दिलाय. तुझं लग्न होईल तर त्या सुनंदाशीच!"

"आई मला थालीपीठ खाऊ दे!"

"अरे आरामात खा! अजून दोन थालीपीठ घे आणि पोटभर खा! पण, खाल्ल्यावर मी तुला पुन्हा हेच सांगणार आहे की सुनंदा आपली सून होईल! इतर काही ऐकू नकोस पण हे मात्र माझे तुला ऐकावेच लागेल!"

"अगं आई, मला तुलाही घेऊन कायमचा मुंबईत जायचा विचार आहे. ती आणि तिचे कुटुंब खूप खेडवळ आहेत! त्यांना माझी ही अशा प्रकारची नोकरी आवडणार नाही. मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राबद्दल गावाकडे बरेच समज गौरसमज आहेत! आणि मी जरी तिला लहानपणापसून बघितले आहे तरीही तीच्याकडे मी त्या भावनेने बघितले नाही!"

"मला बहाणे नकोत! त्या भावनेने बघितले नाहीस ना? मग लग्न झाल्यावर बघ त्या भावनेने! तुला माहीत आहे ना आपण वचन दिलंय त्यांना?"

"वचन बिचन या सगळ्या लहानपणच्या गोष्टी आहेत! आम्ही मोठे झालो आता. विसरा ती वचनं!!"

"अरे त्या गोष्टी लहानपणाच्या असल्या म्हणून काय झालं? काळानुसार वचन हे वचनच राहते! आणि गोडंबे काकांनी आपल्याला किती मदत केली आहे माहित आहे ना तुला? त्याची परतफेड नको करायला?"

"अगं आई वेळोवेळी तू आणि मी पण त्यांच्या मदतीला धावून गेलोच आहोत की!" राजेशने आठवण करून दिली.

"हे वचन तुझ्या बाबांनी दिलं आहे हे ठावूक असूनही तू असा का वागतोस राजेश?" आई अर्धे रडून आणि अर्धे संतापून पदराने डोळे पुसत बोलली.

"थालीपीठ हळूहळू बेचव का होते आहे बरं? दही पण जरा जास्तच आंबट आहे! " उपरोधाने राजेश म्हणाला.

"हो का? सुनंदा थालीपीठ बनवेल तेव्हा चव परत येईल हळूहळू! काळजी करू नकोस हं बाळा!" आईसुद्धा दुप्पट उपरोधाने म्हणाली.

काही केल्या आई आणि तिची सुनंदा पाठ सोडणार नव्हती त्यामुळे शांततेने थालीपीठ पूर्ण खून संपवल्यानंतर मनातला चढणारा संताप दाबून टाकत राजेश शक्य तितक्या हळू ताटावरून उठला. हो किंवा नाही न म्हणता मौन राहून तो कपडे घालू लागला.

कधी कधी कुणी हो म्हणायचे असले तरी मौन बाळगतात आणि कुणी नाही म्हणायचे असले तर मौन पत्करतात. कुणाकुणाला हो किंवा नाही यापैकी काहीच म्हणायचे नसते तेव्हा मौन राहतात. पण समोरचा त्या मौनाचा स्वत:च्या सोयीनुसार अर्थ घेतो. राजेशच्या आईनेही त्याच्या मौनाचा होकारार्थी अर्थच गृहीत धरला, भले त्याने आताच स्पष्ट संवादातून स्पष्ट नकार पोहोचवला का असेना!

एकदाचा पाठीवर सॅक घेऊन तो राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी मध्ये बसला. बसमध्ये तुरळक गर्दी होती....

त्याने खिडकीजवळची जागा पकडली. कंडक्टर कडून तिकीट काढले आणि खिडकीतून बाहेर बघू लागला. गाडी सुरु झाली. खिडकीतून गार वारा येत होता.

आईच्या सकाळच्या लग्नासंदर्भातील चर्चेचे त्याच्या मनात विचार आले येऊ लागले.

"मी माझ्या लिहिलेल्या कथांमध्ये माझ्या मनाप्रमाणे सभोवतालाचे जग आणि पात्रे तयार करतो आणि ती सगळी पात्रे माझ्या हुकुमानुसार जगतात आणि मरतातसुद्धा! पण, खऱ्या जगातील एक पात्र म्हणजे मी मात्र पूर्ण माझ्या अधीन नाही. मला लग्नासारखा निर्णय आईच्या मर्जीनुसार आणि हुकुमानुसार घ्यावा लागतोय! पण ती सुद्धा कुणाच्या तरी खेळातले एक पात्र आहे? जगाला नियंत्रित करणाऱ्या कुणीतरी शक्तीच्या हातातले ती आणि मी सुद्धा पात्रच आहोत. पण त्याला इलाज नाही. लहानपणी दिल्या गेलेल्या काही वचनांमुळे आणि दिलेल्या शब्दांमुळे, कुणाच्या उपकाराच्या ओझ्यामुळे आणि कर्जामुळे आपण कधीकधी परावलंबी होतो."

खिडकीतून चांगला वारा येत होता. झोप येण्यासारखा हा वारा होता पण मनातील विचार त्याला झोपू देत नव्हते....

राजेशचे विचारचक्र पुन्हा सुरु झाले, "पण मला एक समजत नाही की एखादा व्यक्ती आपल्याला मदत करतो तर खरं, पण त्यामागे त्याची भविष्यातली दूरदृष्टी असू शकते, पण आपल्याला हे आधी त्याची मदत स्वीकारतांना कळत नाही. कसे कळेल? कुणाचे मन थोडेच वाचता येते? काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय कुणी आजकाल मदत करतच नाही का? मदतीच्या उपकारापायी परतफेडीची कुठेतरी अपेक्षा असतेच असते! असायला हवी की नको? ते ठरवणारा मी तरी कोण? आणि त्यातल्या त्यात मी आणि माझे कुटुंब मदत ‘घेणारे’ आहोत त्यामुळे ‘देणाऱ्याने’ अपेक्षा ठेवाव्यात की नको आणि काय ठेवाव्यात हे मी कसे ठरवू शकेन?"

सहजपणे राजेशची नजर बाजूला गेली तेव्हा त्याला दिसले की बाजूच्या सीटवर एकजण "जीवनाचे शिल्पवृक्ष" हे रा. म. मालवणकर यांचे पुस्तक वाचत होता.

त्यानेही ते वाचले होते. पुस्तक बघितल्याने आणी त्यातील काही प्रसंग त्याला वाचल्याचे आठवल्याने त्याचे लग्नाच्या विषयाकडून ध्यान हटले आणि मन भूतकाळात गेले. रात्री आठवलेल्या प्रसंगांच्या पुढचे त्याला आठवू लागले.

(क्रमश:)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel