शक्यतो सुनंदा त्याच्यासोबत अशा पार्ट्यांना येत नसे. फक्त एक दोनदा ती आली होती पण तिला ग्रामीण जीवनाची सवय अंगवळणी पडली असल्याने अशा पार्ट्यांना तिला अवघडल्यासारखे वाटे. मध्यन्तरी राजेशची आई त्यांचेकडे राहून गेल्यानंतर तिची एक दूरची काकू दोन महिन्यापासून त्यांचेकडे राजेशच्या इच्छेविरुद्ध येऊन राहात होती कारण सुनंदाला शहरात करमत नव्हते. काकू  राहायला आल्यापासून सुनंदा राजेशवर संशय घ्यायला लागली कारण ती काकू सुनंदाला नेहेमी राजेश नसताना असे काहीतरी सांगायची ज्यामुळे तिला राजेशवर संशय निर्माण होईल!

"या फिल्मी क्षेत्रात काय खरं नसतं बरं! बायका लै लफडेबाज असत्यात! आपला मतलब साध्य करायला त्या कायबी करायला तयार व्ह्त्यात! माझ्या एका दूरच्या चुलत भावाकडून म्या ऐकलंया तसं! तो शुटिंगच्या ठिकाणी स्पॉट-बाय आसतो. त्यो सांगतो की त्यानं लै येळा एका कारमंदी एका फेमस नटीला एका लगीन झालेल्या डायरेक्टर सोबत लव्ह करताना पायलंय, त्या हिरोईनचा नवरा एक जानमाना यापारी हाय, बिझीनेशमॅन! त्याला हे लफडं माहिती नाय! नायतर..." विविध प्रकारे अशिक्षित हातवारे करून बांगड्यांचा खळ खळ आवाज करत ती अशा ऐकीव सुरस आणि चमत्कारिक कथा सुनंदाला सांगायची.

"खरंच कावो काकू असं असतं?" गावभोळी सुनंदा तिच्या बोलण्यात यायची.

"असतं मंजे? बिलकुल असतं! मला तो चुलत भाऊ अजुन काय काय सांगत आसतो! न सांगितलेलं बरं! आन या बायका राजेशसारक्या सध्यासुध्या माणसाला लवकर जाळ्यात ओढत्यात! असं झालं तर तुझा संसार संपलाच की सुनंदे! तू त्याच्यावर लक्ष ठिव! त्याच्या बोलण्या वागण्यात काय बदल होतो का, त्याच्या शर्ट, पॅन्टवर कसला बाईचा लिपस्टिक, लांब केस बारीक तपासत जा, शरीराचा बदललेला वास ओळखत जा म्हणते मी! काय? तुला आता हे सांगायला नको! बाई माणसाला माहित पायजेत या गोष्टी! श्रेयापदा आणि जयदेवी या नट्यांचे पिक्चर पहाते ना तू नेहमी टीव्हीवर? त्यातून शिकत जा ना जरा!"

"व्हय! व्हय व्हय नक्की!", सुनंदा आणखीनच गोंधळून जायची आणि मान डोलवायाची.

"शक्य झालं ना तर त्याला म्हणा ही पत्रकार, टीव्ही सिनेमा वाली नोकरी सोडून दे आणि दुसरीकडे हाफिसात नोकरी कर! 9 ते 5", काकू मोलाचा सल्ला द्यायच्या. त्यांना राजेश सुनंदाच्या संसाराबद्दल काय आकस होता माहीत नाही पण जणू काही त्यांचा चाललेला सुखाचा संसार तिला सहन होत नसावा.

"नाही पण काक्कु! ते तर त्यांचे स्वप्न आहे! ते हे क्षेत्र ही नोकरी कधीही सोडणार नाही! ते मला तसं बोलले होते मागे!", सुनंदा म्हणायची.

मग ती "काक्कु" वेगवेगळे उपाय सांगे आणि मग सुनंदा राजेशच्या मागे तगादा लावायला लागली की दुसरीकडे नोकरी शोधा आणि त्याचेवर संशय घ्यायची. राजेश सुरवातीला वाद टाळण्यासाठी काही बोलायचा नाही पण नंतर वाद व्हायला लागले तेही अगदी मोठ्याने. राजेशला काकूंवर संशय होताच पण त्याचेकडे काही पुरावा नव्हता आणि बोलायला सोयही नव्हती.

सासू सुनेच्या सिरीयलसाठी तो अनेक कथा लिहायचा ज्यात संसारात लावालावी करणारी अनेक स्त्री पात्रे असायची पण तशा प्रकारचं एक जिवंत पात्र त्याच्या घरात आज ठाण मांडून बसलं होतं आणि तो काहीही करू शकत नव्हता! त्याचे जीवन म्हणजे त्याने लिहिलेली कादंबरी थोडेच आहे ज्याला तो हवे तसे वळण देईल?

सध्या तो त्याच्या प्रोफेशनल लाईफ आणि त्याच्या महत्वाकांक्षेकडे जास्त लक्ष देत होता. समिरणने त्याच्या म्हणण्यानुसार हिंदी चित्रपटाचे काम् सुरु केले होते. राजेशने त्या चित्रपटाच्या लेखनाचे काम संपवले होते. चित्रपटाचे शूटिंग जोरात सुरु होते. विशिष्ट दिवशी समिरण त्याला सेटवर बोलवून त्याचे इनपुट्स घ्यायचा. इकडे त्याचे फिल्मी लेखन तसेच टीव्हीवरील त्याचे फिल्मी कार्यक्रम लोकप्रियता मिळवत होते. के के सुमन कडे त्याची आणि त्याच्या टीमची वक्रदृष्टी होतीच!

आजच्या पार्टीत के के सुमन पण येणार होता कारण आता तो म्हणे यापुढे टीव्ही सिरियल्स पण प्रोड्यूस आणि डायरेक्ट करणार होता असे राजेशला त्याच्या टीममधील अशा खबऱ्यांनी सांगितले होते ज्यांना त्याने सेटवर आणि इतर ठिकाणी छोटी मोठी कामे मिळवून दिली होती आणि ज्यात ते खूप खूश होते कारण त्यांना विविध स्टार्सच्या आसपास वावरायला मिळायचे!

सारंग सोमैया हापण आता एका मराठी साप्ताहिकासाठी टीव्ही स्टार्सच्या मुलाखती घेणारा एक पत्रकार बनला होता. त्यानिमित्ताने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच टीव्ही क्षेत्रात त्याचा वावर वाढला होता. या सगळ्या गोष्टी यशस्वीपणे मॅनेज करतांना घरी निर्माण झालेल्या या "साँस बहू टाईप" प्रॉब्लेमचे मात्र त्याचेकडे सोल्युशन नव्हते. कथेत जर असे पात्र असते तर त्याने कदाचित त्या काकूंना सुनंदाचा पती खडे बोल ऐकवून हाकलून देतो असे त्याने लिहिले असते, पण येथे तो तसे करू शकत नव्हता कारण त्याचे परीणाम जेही होतील ते झेलण्याची त्याची तयारी आणि मानसिकता नव्हती...

तर आज तो पार्टीसाठी ग्रीन ब्लेझर अंगावर चढवतच होता आणि ती काकू त्यांच्या हॉल मध्ये टीव्ही बघत बसली होती तेव्हा बेडरूम मध्ये सुनंदा आली आणि राजेशला म्हणाली, "काय गरज होती एवढ्या महाग ब्लेझरवर खर्च करण्याची? खरं म्हणजे सारख्या सारख्या पार्ट्यांना जायची गरजच काय म्हणते मी?"

ऐन पार्टीच्या तयारीआधी अचानक हे प्रश्न आल्याचे बघून प्रथम राजेशला आश्चर्य वाटले आणि मग खात्री झाली की हे काम त्या टीव्ही बघत बसलेल्या खाष्ट बाईचे असणार! त्याने त्या काकूकडे नजर टाकली तर ती राजेशकडे बघून टीव्हीचे रिमोट हातात घेऊन उपहासाने तोंड वाकडे करत हसत होती, जणू काही आता सुनंदाला कंट्रोल करायचे रिमोट तिच्या हातात आहे असे ती दर्शवत होती. म्हणजे आता सुनंदाशी वाद घातला आणि नाही घातला तरी राजेशच्या डोक्याला ताण हा असणारच आहे हे उघड होते!

पण राजेश त्यातल्या त्यात काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून शक्य तेवढ्या संयमाने म्हणाला, "असं बघ सुनंदा, आता विकत घेतलाच आहे हा ब्लेझर तर घालू दे ना मला. मग तो घ्यायची आवश्यकता होती की नव्हती हे नंतर पार्टीहून परतल्यावर आपण ठरवू!"

"हो का? बरंय बुवा तुमचं झगमगतं जग! बरं पण एकटेच तयारी करता आहात,  मला विचारलं नाही की चलतेस का म्हणून?"

"अगं, तुला काल विचारले की आजच्या पार्टीला येणार का तर तू नाही म्हणाली होतीस आणि आता??"

"एकदा नाही म्हटलं तर तेच धरून ठेवलं? परत विचारता येत नाही? एवढी का मी नकोशी झालेय तुम्हाला!"

 "बरं, आता विचारतो! परत विचारतो! चलतेस का?", येथे सावध पवित्रा घेऊन राजेश बोलत होता कारण विनाकारण राजेशने शब्द पकडून काकू "ध चा मा" करून सुनंदाला भडकवायची शक्यता होती.

"मी लक्षात आणून दिल्यावर मग तुम्ही मला आमंत्रण देता? आता तर मी मुळीच येणार नाही तुमच्यासोबत. पण घरी लवकर या! शक्यतो अकरा वाजेपर्यंत परत या!"

"लवकर येणं शक्य नाही सुनंदा! तुला चांगलं माहिती आहे की अशा पार्ट्यांना रात्री उशीर हा होतोच! तू आधी आली आहेस अशा प्रकारच्या पार्ट्यांना एक दोनदा आणि तुला चांगलं माहिती आहे !"

"आली होती म्हणूनच सांगतेय की लवकर या! कुणी आहे का एखादी सटवी तेथे तुम्हाला सोबत करायला? गळ्यात गळा घालून नाचायला? मागच्या वेळेस ती तुमच्या सारखी एक पत्रकार.. काय नाव होतं तिचं? हां! मोहिनी मोने! काय बाई कपडे घालते आणि काय सगळं अंग अंग मिरवते, शी बाई!?" मग तिचा शब्दांचा पेटारा असा काही उघडला की वाक्यांवर वाक्ये राजेशवर आदळू लागली.

थोड्या वेळानंतर, मुंबईतील रस्त्यांवरून नुकत्याच विकत घेतलेल्या कारमध्ये ड्राइव्ह करत राजेश सुटकेचा निश्वास टाकत होता. असे वादविवाद आता रोजचे झाले होते. त्याच्या आयुष्याने थोड्याच कालावधीत वेगळेच वळण घेतले होते. घरातून निघतांना मोठ्याने सुनंदा ओरडली होती ते त्याच्या कानात गाडी चालवतांना सारखं घुमत होतं:

"मी म्हणते सोडून का नाही देत तुमची ही नोकरी! मला आवडत नाही हा तुमचा फिल्मी तमाशा! एखाद्या ऑफिसात 9 ते 5 क्लार्कची नोकरी पकडा! डबा बनवून देत जाईन रोज! टिफिन! रोज खाऊन घरी येत जा...मी म्हणते काय गरज आहे त्या नटव्या सटव्या बायांसोबत नाचायची आणि जेवण करायची??.. आणि ती घोडी काय नांव तिचं? ती साउथची अप्सरा? "माया भैरवी"! पूर्ण पाय आणि अर्धी छाती उघडे टाकणारे कपडे घालून येते पार्टीत! भलती आवडत असेल नाही ती तुम्हाला? चार चार वेळा मुलाखत घेतली होती तिची तुम्ही म्हणून म्हटलं..." अशा प्रकारे ती बऱ्याच असंबंध गोष्टी सुद्धा बडबडत राहिली होती आणि राजेश चढलेला पारा उतरवत घराच्या पायऱ्या उतरू लागला होता.

कार चालवत चरफडत राजेश मनातल्या मनात खूप मोठ्याने विचार करत होता: "अरे, मूर्ख स्त्री! ज्या महत्वाकांक्षेसाठी मी सुप्रियाला सोडलं, ज्यासाठी मी आईचा एकसारखा तगादा ऐकून ऐकून तुझ्याशी लग्न केलं, तीच महत्वाकांक्षा, तेच क्षेत्र सोडून दे म्हणतेस?..आणि तुझं ते संशय घेणं कधी थांबणार? असा बिनबुडाचा संशय आता जर का तू सतत घेत राहिली तर कदाचित तुझ्या संशयाला मी खरे करूनच दाखवेन! साला! याला घरगुती वादळाचा वीट आलाय! त्या इष्टमनकलर काकूचा हात पिरगाळून तिला जाब विचारून घराबाहेर काढलं पाहिजे! घरची भांडणं आता सिनेमास्कोप एवढी जास्ती मोठी व्हायला लागलीत! 70 एम एम!"

विचारांतील संतापामुळे त्याने स्टिअरिंग व्हीलवर जोरात उजवा हात आपटला आणि त्यामुळे गाडी अचानक थोडी उजवीकडे वळून बाजूच्या वेगातल्या कारला थोडी स्पर्शून पुढे गेली. पण पटकन स्टिअरिंग व्हील सावरून मोठा अपघात होण्यापासून त्याने वाचवला. ती मागची कार वेगाने समांतर पुढे आली आणि त्या कारचा पुढचा काच हळूहळू खाली होऊ लागला. आता त्या कारमधला ड्रायव्हर वाद घालणार! नक्की! राजेशनेही काच खाली केला आणि उजवीकडे बघितले. आहे कोण त्या कारमध्ये?

अरेच्च्या! मोहिनी मोने! वाचलो! दुसरं कुणी अनोळखी असतं तर? राजेशच्या कपाळावर आठ्या आणि चेहेऱ्यावर सुनंदासोबतच्या भांडणाच्या निराश रेषा पसरल्या होत्या.

मोहिनी म्हणाली, "अरे! काय रे राजेश काय झालं? अशा प्रकारे गाडी का चालवतोयस्? माझ्या माहितीप्रमाणे शक्यतो तू जास्त पीत नाहीस आणि मला एक सांग की पार्टीच्या आधीच कुणी घरूनच पिऊन निघतं का रे?"

राजेश मनात म्हणाला, "आता हिला कसं सांगावं की हिच्यामुळेच एक काल्पनिक संशय निर्माण होऊन आता सुनंदाशी माझे भांडण झाले आहे!"

आणि मग तो मोठ्याने म्हणाला, "हे मोहिनी, समांतर गाडी चालवू नकोस, एक तर पुढे हो नाहीतर मागे तरी जा! नाहीतर या जास्त ट्राफिक वाल्या रोडवर आणखी अनेक ऍक्सिडेंट व्हायचे! आणि सॉरी, माझेकडून ते चुकून झालं आणि हॅलो, मी काही पिलेलो बिलेलो नाही बरं का, नॉटी गर्ल!" राजेश हसून म्हणाला.

अचानक मोहिनी भेटल्याने त्याच्या डोक्यातला ताण थोडा हलका झाला. मोहिनीने आज अतिशय आकर्षक पोशाख केला होता - खोल गळ्याचा पिवळा टी शर्ट आणि शॉर्ट निळी जीन्स! तिच्याकडे पाहून राजेश क्षणभर देहभान विसरला!

तिची गाडी त्याच्या गाडीच्या पुढे झर्रकन घेत ती म्हणाली, "नो प्रोब्लम्, आपण पार्टीत बोलूया! आणि मी माझ्या गाडीला झालेल्या डॅमेजची वसुली कोणत्या न कोणत्या मार्गे करणार हे विसरू नकोस!" मिश्कीलपणे हसत ती म्हणाली आणि भरपूर वेगात ती त्याच्या खूप पुढे निघून गेली कारण राजेशने आधीच त्याचा वेग कमी केला होता आणि तो आता हळूहळू चालवत होता.

yyyy

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel