जुहू येथील फाईव्ह स्टार हॉटेल "गोल्डन सिटीझन" च्या बाराव्या मजल्यावर टेरेसवरील पार्टी लाउंज मध्ये टेलिव्हिजन आणि सिनेक्षेत्रातील तारे तारका जमले होते. कुणी टेबलवर खुर्चीवर बसून तर कुणी उभ्याने खात आणि पीत होते. वर्तमानपत्र आणि टीव्ही पत्रकार आपापल्या कामात मग्न होते. राजेश आणि रागीणीच्या पूर्वायुष्याचा गौप्यस्फोट करणारा सुधीर श्रीवास्तव, सारंग सोमैया तसेच इतर पत्रकार त्यात होते.

सारंगने त्याच्या गावाकडील एका मैत्रिणीला, वीणा वाटवे हीला पार्टीत बोलवून एका हिंदी सिरियलच्या कास्टिंग डायरेक्टरशी तिची भेट घालवून दिली. तसेच तिची ओळख त्याने मिष्टी मेहरानशी करून दिली. तिला छोटासा रोलसुद्धा पुरेसा होता. मिष्टी तिला तिच्या एका शॉर्ट फिल्म मध्ये घेणार होती.

रागिणी आणि सूरज एका ठिकाणी उभे होते. डी. पी. सिंग हे त्या दोघांशी जुजबी बोलणे झाल्यावर दुसरीकडे निघून गेले. रागिणी टेन्स दिसत होती तर सूरज कसल्यातरी विचारांत गढलेला होता. बॅकग्राऊंडला म्युझिक सुरु होते. सोनी आणि भूषण ग्रोवर एकमेकांच्या कमरेभोवती हात घालून एकमेकांच्या डोळ्यात डोळा घालून डान्स करत होते. सुभाष भट आणि त्यांची पत्नी रजनी अनेकांशी ओळख आणि गप्पा करत होते. ते दोघेजण सोनीला आणि के. सचदेवाला भेटले आणि मग गप्पा मारत पुढे निघून गेले. राजेश सोनी आणि रागिणीला एकत्र भेटला पण सुप्रियाचा विषय निघणार असे वाटत असतांना त्याने त्यांच्यातून काढता पाय घेतला. मग तो सारंग सोमैय्याला भेटला. एलेना, नातशा, मिष्टी, जेसिका कर्टिस हे सुद्धा हजर होते.

बाजूला लावलेल्या एका स्टेजवर ऐतिहासिक सिरीयलचा निर्माता आणि काही कलाकार तंत्रज्ञ मंडळी उभी होती. विशेष म्हणजे अचानक बॉलिवूड मधील एका मसल्स मॅनचे म्हणजे अरमान खानचे तेथे आगमन झाले.

त्या ऐतिहासिक सिरीयलमधील राजाची लहानपणाची भूमिका करणारा चौदा वर्षाचा कलाकार सोहम सूरी याने बॉडी बिल्डिंगचे धडे या अरमान खान कडून घेतले होते आणि अरमानला सोहमची ऍक्टिंग खूप आवडायची. वेळ मिळेल तेव्हा तो "राजा विक्रमसेन" ही मालिका जरूर बघायचा.

त्याने माईक हातात घेतला आणि बोलू लागला, "मे आय हॅव युर अटेन्शन प्लिज स्वीट लेडीज अँड नॉट सो स्वीट जन्टलमेंन! प्लीज गीव्ह ऑल ऑफ देम अ स्टँडिंग ओव्हेशन! ऐतिहासिक सिरीयल बनाना कोई आसान बात नही है! बहोत सोचना और पढना पडता है! आजकल तो वैसे भी ये छोटा पर्दा बडे परदे से भी बडा हो गया है!"

थोडे थांबून मग अरमान पार्टीतून निघून गेला. मग नंतर त्या सिरियलमधील मुख्य कलाकारांचे, तसेच प्रोड्युसर, डायरेक्टर, आर्ट डायरेक्टर वगैरे यांचे इंटरव्ह्यू झाले. हा इव्हेंट टीव्ही चॅनेल्स लाईव्ह टेलिकास्ट करत होते. मग स्टेजवर सुभाष भट आले. सगळेजण आता त्यांचेकडे लक्ष देऊन होते.

त्यांनी माईक हातात घेतला आणि बोलू लागले, "आज मैं इस पार्टी में आकर गर्व महसूस कर रहा हूं! मैंने मेरी कई फ़िल्मो में टेलिव्हिजन ऍक्टर्स को चान्स दिया और वे आगे जाकर बडे कलाकार बन गये और बाद में उन्होने कई सुपरहिट फिल्मे दी. आज इस स्टेज पर मैं एक अनौन्समेंट करना चाहता हूं! वो ये है की, BEBQ शो की विनर सोनी बनकर को मैं मेरी आनेवाली म्युजीकल डान्स हॉरर फिल्म में ले रहा हूं!" त्याने सोनीला स्टेजवर बोलावले आणि आणखी एक अनौन्समेंट केली, "को-विनर जेसिका कर्टीस को भी इस फिल्म मी एक रोल दिया जायेगा और "राजा विक्रमसेन" के आर्ट डिरेक्टर निलेश देसाई मेरे फिल्म का आर्ट डिरेक्शन करेंगे और BEBQ का "कास्टिंग डिरेक्टर" इस फिल्म के लिए मेरा असिस्टंट डिरेक्टर रहेगा!"

उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि रागिणीला एक जबरदस्त धक्का बसला आणि रागिणी सूरजसोबत काही बोलणार अगदी त्याच वेळेस तिची नजर चोरून "एक्सक्यूज मी" म्हणून सूरज कुणालातरी भेटायला म्हणून गर्दीत पुढे निघून गेला.

सुधीर पण त्याच्या जागेवरून उठला आणि बाहेरच्या छोट्या डान्स फ्लोरच्या काचेच्या रूमच्या दिशेने जाऊ लागला. मध्ये स्टेजवर पुढे अनेक गोष्टी सुरु होत्या. सेलिब्रेशन झाले. रागिणीच्या मनात एक सुप्त आशा होती की तीच सुभाष भटच्या पुढील हॉरर चित्रपटात असेल पण सोनी? माझ्याच मैत्रिणीला सोनीला चान्स मिळाला हे चांगलेच झाले पण ...? खरे पाहता दोन समकालीन अभिनेत्रींच्या मधून विस्तव जात नाही पण रागिणी आणि सोनी यांच्यातील रिलेशन सौख्याचे होते. त्यामुळे रागिणीला सोनीचा द्वेष किंवा मत्सर वाटला नाही.

"आणि आजकाल सूरजचे वडिल पण माझेपासून दूरदूर राहात होते, ते का? सुभाष भटने सिंग यांचेकडे माझेसाठी चित्रपटाकरता शब्द तर टाकला नसेल? पण तसे असते तर सिंग यांनी मला सांगितले असते! रागिणी विचार करत बसली! कदाचित टीव्हीवरच्या बातमीमुळे आणि माझ्या झालेल्या बदनामीमुळे सिंग आणि सुभाष भट यांनी त्यांचा विचार बदलला असावा का?" रागिणी विचार करत राहिली.

स्टेजवर उशिराने आणखी एक व्यक्ती चढली. ती व्यक्ती नुकतीच पार्टीत आली होती. तो एक टक्कल पडलेला सावळा आणि लठ्ठ माणूस होता. त्याच्या उजव्या गालावर मोठा काळा डाग होता. दरम्यान आता फ्लॅश लाईट्स चमकत होते. तो माणूस अर्धी हिंदी आणि अर्धी मराठीत बोलू लागला, "के के सुमनला आज काही कारणास्तव वेळेवर पार्टीला येणे कॅन्सल करावे लागले लेकिन मैं उनका असिस्टंट और अनके फ़िल्मो का असिस्टंट डिरेक्टर 'आर. रत्नाकर' आज यहां अनौन्स करता हूं की केकेजीने भी विक्रमसेन के प्रॉडक्शन हाऊस के साथ मिलकर एक हिस्टोरीकल सिरीयल बनाने का फैसला किया हैं!...."

राजेश त्याच्या पत्रकारितेच्या कामामधून थोडा ब्रेक घेऊन मोहिनीसोबत ड्रिंक्स घेण्यात मग्न होता तेवढ्यात गंमत म्हणून मोहिनीने कोपराने ढोसून राजेशला स्टेजकडे बघायला लावले, "ए राजेश, ते बघ ना तिकडे स्टेजवर! केकेचा टकला असिस्टंट म्हणतोय केके म्हणे ऐतिहासिक सिरीयल बनवणार!..खि खि खि! लायकी तरी आहे का त्या केकेची? मी सिने वर्तुळात केके बद्दल बरेच काही ऐकले आहे."

राजेशने स्टेजकडे पहिले...

फ्लॅश लाईट्स मध्ये "आर. रत्नाकरचा" टकला चेहेरा चमकला आणि राजेशच्या डोक्यातपण लख्ख प्रकाश पडला...

त्याला आठवू लागले...

विनित आणि तो.

त्याच्या कथेची चोरी.

दिवाळी अंक कार्यालय.

रत्नाकर रोमदाडे नावाचा ऑफिस मधला माणूस.

त्या भाडेकरूने वर्णन केलेला तोच हा रत्नाकर.

उजव्या गालावर मोठा डाग.

सावळा, टाकला आणि लठ्ठ माणूस!!

आर. रत्नाकर.

हाच तो चोर.

याचेकडेच तर पोष्टाने पाठवली होती मी कथा.

हाच सामील असणार कथा चोरीमध्ये...

माझ्यासारख्या अशा कित्येकांच्या कथा याने चोरल्या असतील..

"मोहिनी, एक मिनिट जरा येतोच!", असे म्हणून ग्लास टेबलावर त्याच्या वायरलेस माईक जवळ  ठेवत राजेश गर्दीतून स्टेजच्या जवळ जाऊ लागला.

"अरे, राजेश अचानक काय झाले?" असे मोहिनी म्हणाली पण ते ऐकायला राजेश तेथे नव्हता.

तोपर्यंत इकडे इतर काही पार्टीतले उत्साही पाहुणे काचेच्या रूम मधल्या डान्स फ्लोअरवर डीजेच्या तालावर नाचायला निघून गेले होते.

इकडे स्टेजवर पण म्युझिक सुरूच होते. राजेश स्टेजकडे गर्दीतून वाट काढत पोहोचणार तोपर्यंत रत्नाकरला कसला तरी फोन आला म्हणून तो स्टेजवरून उतरून बाजूच्या अंधाऱ्या टेरेसकडे फोनवर बोलायला जाऊ लागला. त्याचा पाठलाग करायचा म्हणून पुन्हा राजेश स्टेजकडून त्याच्या मागे जायला लागला.

टेरेस बरेच मोठे होते. पण सगळीकडे अंधार होता. रांगेने विविध रोपांच्या कुंड्या लावलेल्या होत्या. टेरेस वरून खाली खोलवर दिसणाऱ्या विविध वाहनांनी भरलेल्या रस्त्यांकडे बघत रत्नाकर केकेशी बोलत होता. राजेश गर्दीतून मार्ग काढत टेरेसकडे जात होता...

पण जातांना बॅकसाईडला एका खिडकीजवळ त्याला असे काही ऐकू आले की तो तिथेच थिजला. कुणीतरी फोनवर संशयास्पद रीत्या बोलत होते.

अंधारात तो माणूस राजेशला नीट ओळखू येत नव्हता पण डान्स फ्लोर रूममधून अधूनमधून येणाऱ्या फ्लॅशलाईट मुळे चेहरा दिसत होता पण त्या व्यक्तीचे राजेशकडे लक्ष नव्हते.

"कोण आहे हा? हो! करेक्ट! सूरज आहे हा! रागिणीचा बॉयफ्रेंड!"

सूरज बोलत होता: "अपनी दिल्ली की टीम का एक पंटर राहुल गुप्ता साला अपनी रागिणी का लव्हर निकला, साला ब्लॅकमेल कर रहा था उसे! चूप करा दिया उसे! अब बार बार फोन नही करेगा उसे! और सुधीर श्रीवास्तव को मैने ही कहां था रागिणी का सब सच टीव्ही पर बताने के लिये! जैसेही रागिणीने मुझे उसके अतीत के बारे में बताया जिसमे राहुल था तो मैने उसे तो चूप कर दिया, लेकीन मैने सुधीर की जबान खोल दी! दोस्त है वोह मेरा! उसे मैने टीव्ही प्रोग्राम बनाने को कहां! सिर्फ एक दिन के लिये! बाद में मेरे कहने पर वो टीव्हीपर रागिणी की माफी मांग लेगा! मग मी रागिणीला सांगणार की कोर्टाच्या कारवाईची धमकी दिल्याने आणि अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याच्या भीतीने सुधीरने माफी मागितली! आणि मी हे का केलं सांगू? रागिणीचा आत्मविश्वास कमी करायचाय मला आणि हळूहळू या इंडस्ट्रीपासून दूर न्यायचे आहे मला तिला! तिने नाही ऐकले तर माझेकडे उपाय आहेत! शेवटचा उपायही आहे! मीच तर सुभाष भटची ऑफर तिच्यापर्यंत पोहचू दिली नव्हती.. हा हा हा!"

सूरज बरेच काही बोलत होता. राजेशला हे ऐकून धक्का बसला. सुप्रियाकडून त्याने सोनी आणि रागिणीबद्दल ऐकलेले होते आणि या क्षेत्रातील पत्रकार म्हणून त्याला बऱ्याच कलाकारांबद्दल माहिती होती. हे सूरजचे ऐकलेले बोलणे रागिणीला जरूर सांगितले पाहिजे असे त्याला त्याचे मन सांगू लागले.

हे ऐकत असतांना राजेशला आठवले की आपण रत्नाकरचा पाठलाग करत होतो. त्याने टेरेसवर नजर फिरवली. तेथे रत्नाकर नव्हता. त्याने लिफ्टकडे पाहिले. रत्नाकर लिफ्टमध्ये बसून खाली जाण्याच्या तयारीत होता त्याचे मागे राजेश जाणार इतक्यात सुनंदाचा कॉल आला. कॉल नाही उचलला तर घरी गेल्यानंतर एका मोठ्या वादविवादाला सामोरे जाण्यापेक्षा तो उचललेला बरा असे म्हणून त्याने कॉल उचलला, तोपर्यंत रत्नाकर लिफ्टमध्ये शिरून खाली निघून गेला.

सुनंदा विचारत होती की तो घरी केव्हा येणार आणि त्याने सांगितले की पार्टी संपल्यावर! तिने तो येईपर्यंत ती जागीच रहाणार असे त्याला बजावले. सुनंदाशी बोलून झाल्यावर त्याने पहिले आता तेथे सूरजही नव्हता.

सूरजचे फोनवरचे बोलणे रागिणीला सांगितलेच पाहिजे! पण कशाला उगाच त्यांच्या पर्सनल मॅटर मध्ये पडायचे? नाही राजेश! हा मामला काहीतरी वेगळा वाटतोय! मला रागिणीला सावध केले पाहिजे! माणुसकी म्हणून! एक पत्रकार म्हणून! सुप्रियाची ती एक रूम पार्टनर होती म्हणून!

हा फूड इंडस्ट्रीचा मालक मला काही बरोबर वाटत नाही!  पण रत्नाकर सुद्धा निसटायला नको! मग त्याने मोहिनीला कॉल केला.

"अरे कुठे आहेस! इकडे ये! डान्स करुया!"

"मोहिनी ! ऐक! पटकन रागिणीला जाऊन भेट आणि तिला सांग की राजेशला तिला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. राजेशला भेटल्याशिवाय जाऊ नकोस असे सांग! प्लीज! का, कसे असे प्रश्न विचारू नकोस!"

"बरं बाबा! सांगते!"

दुसऱ्या एका लिफ्टने राजेश रत्नाकरच्या मागावर खाली गेला. तो इमारतीच्या बाहेर पडला तोपर्यंत रत्नाकर गाडीत बसून निघून गेला.

राजेश विचार करु लागला: "आता लगेच याचा पाठलाग करण्यात काही अर्थ नाही. त्याचा नंबर घेऊन त्याचा ठावठिकाणा मी नक्की शोधणार! रत्नाकर वर टेरेसवरच पकडला गेला असता  तेथेच अंधारात त्याला मी चांगला चोप दिला असता आणि सगळं कबूल करवलं असतं त्याचेकडून पण सूरज ....? ओह नो!  मला रागिणीला सावध केलेच पाहिजे."

तो लिफ्टने पुन्हा वर गेला तेव्हा बहुतेक सगळे लोक डान्स फ्लोरवर गेले होते. सूरज बराच वेळ पार्टीत नव्हता आणि रागिणी थोडी नर्व्हस होवून टेरेसवर बाहेर बघत उभी होती. मोहिनीने तिला राजेशचा  निरोप दिला होता. राजेश लगेचच रागिणी जवळ आला आणि म्युझिकच्या आवाजात तिला मोठ्याने म्हणाला, "मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे."

प्रथम तिला आश्चर्य वाटले पण नंतर ती तयार झाली. ते दोघे टेरेस वर गेले. राजेशने वेळ न दवडता थोडक्यात तिला सूरजचे फोनवरील बोलणे सांगितले. ते बराच वेळ बोलत होते आणि ते इतर कुणाला ऐकू जाण्याची शक्यता तशी कमी होती कारण मोठ्याने म्युझिक सुरु होते आणि जवळपास जास्त कुणी नव्हते आणि जे लोक होते ते म्युझिकच्या तालावर नाचत होते.

शेवटी तो म्हणाला, "मला तुमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसून काहीही करायचे नाही पण मी जे ऐकले आहे ते तुला सांगणे मला आवश्यक वाटले."

असे म्हणून तो जायला निघाला. रागिणीने त्याला काही अडवले नाही.

आता तिच्या डोक्यात विचार चक्र सुरु झाली. अनेक दिवसापासून तिच्या मनात जे काही संशयास्पद विचार येत होते ते खरे ठरत होते. "डी. पी. सिंग" यांची सध्याची वागणूक कदाचित सूरजच्या दबावामुळे तर नाही ना? सुभाष भट यांनी अचानक सोनीला कसा काय ब्रेक दिला? राजेशला मी सांगितले त्यानंतरच राहुलचे कॉल अचानक बंद झाले? त्यानंतरच नेमके सुधीरने टीव्ही वर माझ्यावर प्रोग्राम केला? माझ्या आयुष्यात रोहन नंतर जोडीदाराचे सुख लिहिलेच नाही का? सूरजला आजकाल काय झाले आहे? माझे काही चुकले का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हळूहळू तिला सापडत होती. आता हे सगळे प्रश्न सूरजलाच विचारले पाहिजेत असे ठरवून ती सूरजला शोधायला गेली...

इकडे डान्स फ्लोअर वर डीजे वेगवेगळे आयटम साँग वाजवत होता आणि मोहिनी बेधुंद होऊन नाचत होती.

"आजा मेरे राजा, आजकी रात गुजार मेरी प्यासी बाहों में"

"देखके तेरा अंग अंग, चढ गया मेरे प्यार का रंग रंग"

"दिल मेरा दिल, चाहता है तो एक बस तुम्हे सुबह शाम "

राजेशने एकाकडून रत्नाकरचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि आणखी काही व्यक्तींना भेटून मोहिनीकडे गेला. तिने ड्रिंक्स जरा जास्तच घेतली होती आणि ती जोरात आणि जोशात नाचत होती. आपल्याला सहन होईल आणि आपण स्वतःला कंट्रोल करू शकू एवढेच पिले पाहिजे असा विचार मोहिनीकडे जाताना त्याच्या मनात आला. खरे तर तो तिला बाय करायला आला होता पण तिथे तो पोचेपर्यंत मोहिनी जवळपास शुद्ध हरपून बाजूला असलेल्या सोफ्यावर कलंडली.

ती आईवडिलांपासून वेगळी एका फ्लॅटमध्ये भाड्याने एकटी राहात होती. नुकताच तिचा ब्रेक अप झाला होता आणि त्यामुळे तिने अलीकडे जास्त प्यायला सुरुवात केली होती. या मोहिनीची कथा काही वेगळीच होती. तिला क्रिकेटचे वेड होते आणि ती ट्वेंटी ट्वेंटी आणि वन डे सामने नेहमी बघायला जायची. एका सामन्यादरम्यान संपत साधू या आयपीएल खेळाडूशी तिची ओळख झाली. मग काही सामन्यांदरम्यान एकमेकांना भेटणे सुरु झाले. पण तो खेळाडू कालांतराने काही आंतरराष्ट्रीय सामने खेळायला गेला. मोहिनी तेव्हा तेथे जाऊ शकली नाही. तेथून आल्यापासून संपत वेगळा वागत असल्याचा तिला दिसला. तो तिला टाळू लागला होता. काही दिवसांनी त्याने तिला एका मेसेजिंग एपवर आता "यापुढे मला भेटू नकोस" असे सांगितले. तिने नंतर त्याला भेटण्याचा आणि कॉल करण्याचा प्रयत्न केला पण त्याने रिप्लाय केला नाही. नेमके झाले काय, तिचे काही चुकले काय अशा प्रश्नांची उत्तरे तिला हवी होते पण ती उत्तरेपण तिला मिळाली नाहीत. जीवनातल्या पहिल्या प्रेमात फसवणूक आणि प्रेमभंग झाल्याने ती दुखावली गेली आणि अल्कोहोलच्या आहारी गेली.

नंतर राजेशमध्ये तिला एक चांगला मित्र सापडला. राजेशने तिला जीवनात अशा प्रसंगातून पुढे कसे जायचे याबद्दल तिचा चांगलाच ब्रेनवॉश केला.

सिनेक्षेत्रात केवळ शारीरिक पातळीवर असणाऱ्या आणि नंतर दोनेक वर्षांनी दुसरा पार्टनर शोधायचा, एकमेकांत मानसिकरीत्या अडकायचे नाही अशा प्रकारच्या मानसिकतेच्या काही फ्रेंडशिपच्या जमान्यात राजेश आणि मोहिनी हे मित्र मैत्रीण होते. त्यांची मैत्री शारीरिक पातळीवरची नसून प्लॅटोनिक रिलेशनशिप होती. पण त्यांचे वागणे एकमेकांशी इतके मोकळे होते की आपण मित्र आहोत पण स्त्री-पुरुष आहोत याचा त्या दोघांना विसर पडायचा आणि मग त्या दोघांबद्दल अनेकांच्या मनात संशय निर्माण व्हायचा.

मोहिनीने अनेकदा पर्सनल आयुष्यात राजेशचा सल्ला घेतला होता. तो तिला उपयोगी पडला होता. आता सुद्धा अशा नशाधुंद अवस्थेत राजेशशिवाय दुसरा पर्यात होता का तिला?

"राजेश मला सोडतोस का रे घरी? माझी गाडी उद्या माझ्या ड्रायव्हरला घेऊन यायला सांगेन मी!" ती बरळत होती. बारा वाजले होते. मोहिनीची विनंती अमान्य करून चालणार नव्हते. ती त्याची चांगली मैत्रीण होती. समोर काचेतून त्याला दिसले की रागिणी आणि सूरज एकमेकांशी तावातावाने काहीतरी बोलत होते.

रागिणीला सूरजचे फोनवरचे बोलणे सांगितले ते मी चूक तर केले नाही ना?

नाही राजेश! तू नेमका त्या फोनच्या वेळी तिथे उपस्थित होतास हा निव्वळ योगायोग समजावा का? मला जे योग्य वाटले ते मी केले. पार्टी संपली होती. बारा वाजून गेले होते. सगळेजण आता हळूहळू परत जायला निघाले होते.

yyyy

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel