एकदा एक कोकरू पाणी पिण्यासाठी ओढ्यावर गेले. तेथे वरच्या बाजूस एक लांडगा पाणी पीत होता. ते पाहून कोकरू ओढयाच्या खालच्या बाजूस येऊन पाणी पिऊ लागले. त्या कोकराला काहीतरी निमित्त काढून मारावे असे लांडग्याच्या मनात आले आणि तो कोकराला म्हणाला, 'अरे, तू पाणी गढूळ केलंस. आता मी आपली तहान कशी भागवू ? माझा असा अपमान तू का म्हणून केलास ? तेव्हा कोकरू घाबरून म्हणाले, 'अरे, असं कसं होईल ? तुझ्याकडून जे पाणी वाहात आलं ते मी प्यायलं. मग मी गढूळ केललं पाणी तुझ्याकडे कसं येईल ?
तेव्हा लांडगा रागावून म्हणाला, 'गेले सहा महिने माझ्या मागे तू मला शिव्या देतो आहेस.'
कोकरू म्हणाले, 'नाही रे ! मी तर फक्त तीन महिन्यांचा आहे. मग मी तुला सहा महिने कशा शिव्या देईन ?' परंतु लांडगा यावर गप्प बसला नाही. तो डोळे वटारून म्हणाला, 'लबाडा, तू मला शिव्या दिल्या नसल्यास तर तुझ्या बापाने दिल्या असतील !' असे म्हणून त्याने त्याचा जीव घेतला.
तात्पर्य
- जो बलवान आणि घातकी आहे, त्याच्यापुढे खरेपणा चालत नाही.