एकदा मांजरे व उंदीर यांची लढाई फार दिवस चालली होती. त्यात प्रत्येक वेळी उंदराचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागले. एकदा सगळे उंदीर जमून पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांना असे समजले की आयत्या वेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो. तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्याने काहीतरी चिन्ह धारण करावे असे ठरले. प्रत्येक सेनापतीने आपल्या डोक्यावर गवताची लहान मोळी बांधावी असे ठरले. त्याप्रमाणे केले गेले. नंतर सगळे सेनापती सैन्यासह लढाईवर गेले. पण मांजरांपुढे उंदराचे काय चालणार ? पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी बिळात शिरले. अशा प्रकारे शिपायांनी स्वतःचा जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली. त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांना बिळात शिरता येईना व शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडले.
तात्पर्य
- मोठेपणाबरोबर माणसाची जबाबदारी व संकटे वाढतात.