एका सरदाराचा घोडा जरतारी जीन पाठीवर घेऊन लगाम चावीत फुरफुरत वाटेने जात असता ओझ्याने खचून गेलेले एक गाढव त्याला दिसले. त्याला धमकी देऊन तो म्हणाला, 'अरे, सरक, सरक ! नाहीतर मी तुला आता पायाखाली तुडवून टाकेन.' गाढव बापडे दुर्बळ. तेव्हा ते घाईघाईने बाजूला सरकले. पुढे काही दिवसांनी त्या घोड्याला लढाईत गोळी लागली व सरदाराने त्याला एका भाडेकर्याला विकले. मग तो ओझी वाहू लागला. एकदा पाठीवर मोठे गाठोडे घेऊन तो रस्त्याने जात असता त्या गाढवाने पाहिले व त्याला हाक मारून ते म्हणाले, 'काय राव, रामराम ! त्या दिवशी मला पायाखाली तुडविणारे तुम्हीच नाही का ? मी तेव्हाच भविष्य केलं होतं की एखाद्या दिवशी तरी आपला गर्व उतरेल.'
तात्पर्य
- जो गर्वाने मोठेपणा मिळवू पाहतो, त्याच्याजवळ सामर्थ्य असेपर्यंत लोक त्याला नमून असतात. पण तो निर्बल झाला म्हणजे त्याचा उपहासच केला जातो. आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.