जालें समाधान ब्राह्मणाच्या शब्दें । स्वप्नामाजीं पदें आठविती ॥ १ ॥

परी अंतरींच तुकोबाचें ध्यान । दर्शनावांचोन करितसें ॥ २ ॥

जयाचिया पदें होतसे विश्रांती । तेचि देहाकृति विठ्ठलाची ॥ ३ ॥

विठ्ठलासी तया नाहीं भेदभाव । ऐसे माझें मन साक्ष आहे ॥ ४ ॥

पांडुरंग तुका पांडुरंग तुका । वेगळीक देखा होय केवीं ॥ ५ ॥

कलियुगीं बौद्धरूप धरी हरी । तुकोबा शरीरीं प्रवेशला ॥ ६ ॥

तुकोबाची बुद्धि पांडुरंग रूप । मन तें स्वरूप तुकोबाचें ॥ ७ ॥

तुकोबाचे सर्व इंद्रियचालक । पांडुरंग देख सत्य आहे ॥ ८ ॥

तुकोबाचे नेत्र तेही पांडुरंग । श्रोतृ ते अभंगरूप त्याचे ॥ ९ ॥

तुकोबाचे हात लिहिताती जें जें । तेंचि तें सहजें पांडुरंग ॥ १० ॥

सर्वही व्यापार तुकोबाचे हरी । आपणचि करी अद्वयत्वें ॥ ११ ॥

बहिणी म्हणे रूपें व्यापक 'तुका' वा । ध्यान माझ्या जीवा हेंचि पाहे ॥ १२ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel