जयराम समर्थ ज्ञानाचा सागर । साक्ष तें अंतर त्याचें तया ॥ १ ॥
बोलाविलें तेणें हिरंभटाप्रती । माझी तया स्थिती पुसीयेली ॥ २ ॥
सांगितला तेणें वृत्तान्त सर्वही । वर्तला जो कांहीं गृहीं त्याचें ॥ ३ ॥
स्वप्नागत गुरु तुकोबाचे रूपें । स्वप्नींचिये कृपें बोध केला ॥ ४ ॥
सावध होउनी ते मुली बैसली । गायीस गौरविली कुर्वाळूनी ॥ ५ ॥
दुग्ध दोहोनिया घेतलें तियेनें । पाणी आणी तृणें भक्षीतसे ॥ ६ ॥
परी तें मुलीचें रूप पालटलें । पूर्ण तें दाटलें ह्रदय तिचें ॥ ७ ॥
तुकोबाचा छंद अंतरीं लागला । मायबापें तिला सांगताती ॥ ८ ॥
भ्रतार हा तिचा वेडावला राहे । उगाची तो पाहे तियेकडे ॥ ९ ॥
छांदिष्टा होउनी बैसली घरांत । तुकोबासी चित्त लावुनीया ॥ १० ॥
ऐसा हा वृत्तांत हिरंभट सांगे । जयराम निजांगे संतोषला ॥ ११ ॥
बहिणी म्हणे ऐसा निर्धार ऐकोनी । जयराम स्वामींनीं कृपा केली ॥ १२ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.