भ्रतारें निश्चय केला मनामाजीं । जावें उद्या आजि टाकोनीया ॥ १ ॥
तंव त्यासी व्यथा जाली शरिरास । झाला सात दिवस ज्वाळ देहीं ॥ २ ॥
ओळखीचे जन नायके उत्तर । आपण अहोरात्र तयापासीं ॥ ३ ॥
दिधल्या औषध नेदी तया मान । जीव व्यथा फार पूर्ण सोसी ॥ ४ ॥
एक मासवरी अन्न विवर्जीत । व्यथा हे अद्भुत सोसीतसे ॥ ५ ॥
नाना देव कुळें देवतांची भाष । ठेविल्या विशेष बहु कांहीं ॥ ६ ॥
परी तया व्यथेलागीं न ये गुण । म्हणे तो मरण आलें मज ॥ ७ ॥
काय पांडुरंगा तुकोबासी निंदी । व्यथा तेचि संधि आली मज ॥ ८ ॥
जरी तुकाराम निंदिला त्यागुणें । असेल दुखणें व्यथा मज ॥ ९ ॥
तरी चमत्कार दाखवावा सध्यां । जीवीं विश्ववंद्या तुकारामा ॥ १० ॥
बहिणी म्हणे झाला अनुताप भ्रतारा । पांडुरंग पुरा अंतरसाक्ष ॥ ११ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.