मंबाजी गोसावी त्या स्थळीं नांदतां । गृह प्रवेशतां देखियेले ॥ १ ॥

जाऊनी तयासी मागितलें स्थळ । तो अति चंचळ क्रोध तया ॥ २ ॥

मारावया उठे घातलें बाहेरी । आनंदें वो वरी प्रार्थियेलें ॥ ३ ॥

तेथें राहोनिया भोजनासी गेलों । बहुत पावलों समाधान ॥ ४ ॥

वृत्तान्त पुसीला कोठोनि आलांत । चालतसा पंथ कवण कार्या ॥ ५ ॥

कांहींबाही तया सांगितलें पूर्व । म्हणे रहा सर्व पर्वणीसी ॥ ६ ॥

सोमवरीं आहे अमावस्या पुढें । रहा भक्तिकोडें सुख घ्यावें ॥ ७ ॥

नित्य हरिकथा होतसें देऊळीं । तुकोबा माऊली वैष्णवीची ॥ ८ ॥

रहा येथें तुम्हां भक्षावया धान्य । देऊं हेंही पुण्य आम्हां घडे ॥ ९ ॥

बहिणी म्हणे मग राहिलों देहूस । धरूनी हव्यास तुकोबाचा ॥ १० ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel