सकाळची दहा साडेदहाची वेळ होती. रेल्वेच्या फलाटावर कामाधंद्याला जाणाऱ्या माणसांची व कॉलेजला जाणाऱ्या मुला-मुलींची गर्दी जमा झाली होती. जो तो आपापल्या नादात...कोणी ट्रेनची वाट बघत ताटकळत उभे होते, कोणी आपापसात गप्पा मारण्यात दंग होते, तर कोणी वर्तमानपत्र वाचून आपला वेळ घालवत होते. निदान दहा मिनिटे हे सर्व असेच चालणार होते. कारण ट्रेन येण्याकरिता अजुनही तितकी मिनिटे शिल्लक होती.
ट्रेनच्या फलाटापासून थोड्या अंतरावर काही माणसे खाली जमिनीवर निद्राधीन झाली होती. तर काही तिथेच बसलेली होती. समूहाने एकत्र असलेली ती माणसे आपला सर्व संसार एकवटून दुर कुठुनतरी प्रवास करून आली असावी हे त्यांनी आणलेल्या मोठमोठ्या बोचक्यांवरुन स्पष्ट होत होते. दहा बाराच्या संख्येने असलेली ती माणसे म्हणजे निदान दोन-तीन कुटुंबे असावीत असा अंदाज त्यांच्याकडे बघितल्यावर येत होता. त्यांची पोरं तिथेच, इकडून-तिकडे धावत होती. खेळत होती. लांबून कुठूनतरी आलेल्या ह्या माणसांनी, शहरात कुणाचाही आधार नसल्याने वास्तव्यासाठी ज्या प्रकारे त्या रेल्वे स्थानकाचा आधार घेतला होता त्यावरून जणू तेच आता त्याचे निवासस्थान झाले असावे याचा प्रत्यय त्यांना बघणाऱ्या गर्दीला येत होता.
रेल्वे स्थानकावर ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची ये-जा सुरु असताना, त्या माणसांनी मध्येच मांडलेल्या आपल्या बस्तानामुळे प्रवाशांना तिथुन ये-जा करताना त्रास होत होता. त्यामुळे बऱ्याच जणांची चीड-चीड होत होती. तरीही आत्तापर्यंत तरी कोणी त्यांना तिथुन 'दुसरीकडे जा!' म्हणून प्रत्यक्षपणे बोलले नव्हते.
रेल्वे स्थानकाचा आश्रय घेतलेल्या त्या समूहामधील एक लहान मुलगा तिथे बाजुलाच असलेल्या स्टॉलमधील विविध खाद्यपदार्थ मूकपणे न्याहाळत बराच वेळ उभा होता. काही वेळाने, जेव्हा त्याच्या मनासारखा, त्याला हवा असलेला पदार्थ त्याला त्या दुकानात दिसल्यावर तो तिथेच लोळत पडलेल्या आपल्या पित्याजवळ गेला. आणि तो पदार्थ घेऊन देण्यासाठी त्याच्याकडे हट्ट करु लागला. सुरुवातीला त्या पित्याने त्याच्या मुलाकडे एकदमच दुर्लक्ष केले. परंतू जेव्हा तो मुलगा त्यांच्याकडे सारखा-सारखा हट्ट करु लागला तेव्हा त्याने त्याच्या थोबाडीत लावून दिली. व मोठ्याने ओरडून, इतर मुलांबरोबर खेळण्यास सांगितले. तसा तो नाराज झालेला मुलगा आपले हात-पाय आपटत मोठ-मोठ्याने रडू लागला. आणि रडता-रडता तिथेच जमिनीवर लोळू लागला. तितक्यात त्यांच्या समूहातील दोन लहान मुले त्याच्याजवळ आली. ते त्याला तिथुन आपल्याबरोबर खेळण्यासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तो काही तिथुन हलण्यास तयार नव्हता. हे पाहून त्या मुलाचा पिता त्या दोन मुलांवर मोठ्याने खेकसून त्याला तिथुन घेऊन जाण्यास सांगू लागला. त्याचे बोलणे ऐकुन त्या मुलांनी रडणाऱ्या मुलाच्या हाता-पायाला धरुन त्याला खेचण्यास सुरुवात केली. ते त्याला ओढत-ओढत तिथुन दुर घेऊन जाऊ लागले. त्यांनी तसे करताच रडणारा मुलगा आपले हातपाय जोर-जोरात झटकू लागला आणि त्याच बरोबर पुर्वी पेक्षाही मोठ्याने रडू लागला. हे सर्व घडत असताना, त्या मुलांकडे लक्ष नसलेला त्या मुलाचा पिता मात्र तेथील एका बोचक्यावर डोके ठेऊन निवांत पडून होता. ह्या सर्व प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांचे लक्ष आपोआपच त्या मुलांकडे वेधले गेले होते. त्यातील काही लोकं तर रडता-रडता, आरडा-ओरडा करत खाली झोपून लोळणाऱ्या मुलाकडे आणि त्याचे हातपाय धरुन त्याला ओढत-ओढत खेचुन नेणाऱ्या मुलांकडे मजा म्हणून बघत होते. त्या मुलाच्या रडण्याचा आवाज त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत होता. कदाचित ते सर्वजण हा सर्व प्रकार त्यांचा वेळ घालवण्यासाठी विरंगुळा म्हणूनच पहात होते. आणि हा सर्व प्रकार असाच सुरु रहावा, जणू हीच त्यांची इच्छा होती हे त्यांच्या गप्पांवरुन लक्षात येत होते.
काही वेळ रडून झाल्यारवर त्या मुलाने आपले रडणे थांबवले. 'त्याला हवी असणारी गोष्ट त्याचा पिता त्याला घेऊन देणार नाही' हे आत्तापर्यंत त्याच्या चांगलेच लक्षात आले होते. म्हणून आता तो मुकाट्याने शांत होऊन तिथेच लोळत पडला होता. ज्यामुळे खालच्या जमिनीवरची धुळ त्याच्या कपड्यांना लागत होती. खरंतर त्याचे कपडे आधीपासून खुप मळलेले असल्याने त्याला आणि त्या माणसांच्या संपूर्ण समूहाला अशा प्रकारे धुळीत-मातीत रहाण्याची सवयच झालेली असावी, हे त्यांच्याकडे बघितल्यावर चटकन कोणाच्याही लक्षात येण्यासारखे होते.
आत्तापर्यंत तिथेच एका बोचक्यावर डोके ठेऊन झोपलेल्या त्या मुलाचा बाप अचानक उठून बसला. आणि त्याच्याच शेजारी गाढ निद्रेत असलेल्या स्त्रीला हात लाऊन, तिला निद्रेतुन जागे करण्याचा प्रयत्न करु लागला. आपल्याच चपलीवर डोके ठेऊन, तिथेच घोरत पडलेल्या त्या स्त्रीला आजुबाजुच्या वातावरणाशी, लोकांच्या गर्दीशी, तिच्या नवऱ्याशी आणि मुलांशीही काहीच देणे घेणे नसल्यासारखी ती या सर्वांपासून अलीप्त होती. तिचा नवरा तिला झोपेतून उठवण्याचा भरपूर प्रयत्न करत होता. पण ती काही जागे होण्याचे नाव घेत नव्हती. यावरुन तीने रात्री कसली तरी नशा केली असावी असेच प्रथम दर्शनी तिची स्थिती पहाता वाटत होते. बऱ्याच प्रयत्नानंतरही ती स्त्री झोपेतून जागी न झाल्याने, त्या माणसाने तीच्या डोक्याखालची चप्पल तीच्या डोक्याखालून जोरात खेचून काढली. तरीही ती अजून झोपलेलीच होती. त्याने तीच्या डोक्याखालील चप्पल काढून घेतल्यावर ती खाली धूळ असलेल्या जमिनीवर डोके ठेऊन पुन्हा घोरु लागली. त्यामुळे आता तिचा चेहरा धुळीने चांगलाच माखला होता. तिच्या श्वासोच्छवासाबरोबरच फलाटावर साचलेली धूळही थोड्या फार प्रमाणात तिच्या नाकातोंडात जात होती. पण तरीही तिला यासर्व गोष्टींची अजुनही जाणीव होत नव्हती. इतक्या गजबजलेल्या परिसरात, इतक्या माणसांच्या उपस्थितीची जराही पर्वा न करता तीने आपले शरीर त्या फलाटावरील जमिनीवर अशाप्रकारे झोकून दिले होते की, जणू तिला आता आपल्या झोपेशिवाय कशाचीही पर्वा नव्हती. इतक्या वेळेपासून त्या स्त्रीला झोपेतून जागे करण्याच्या प्रयत्नात असलेला तिचा पती आता तिच्यावर फारच चिढला होता. त्याने तिच्या मानेखाली आपला एक हात घातला आणि दुसरा हात तिच्या पाठीखाली घालून त्याने तिला जबरदस्तीने उठून बसवले. तसे तिने आपले डोळे थोडेसे उघडले. त्यानंतर काही क्षणासाठी दोघांचे काहीतरी संभाषाण झाले आणि मग पुन्हा एकदा त्या स्त्रीने आपले शरीर पुन्हा तिथेच झोकून दिले. त्यामुळे आता मात्र त्या माणसाचा राग फारच अनावर झाला होता. त्याने त्या स्त्रीची एक चप्पल आपल्या हातात घेतली. आणि जोराने तिच्या मुस्काटात मारली. इतक्या वेळेपासून हा सर्व प्रकार मजा म्हणून बघणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यायावर आता थोडेसे गंभीर भाव दिसू लगले. क्षणाचाही विलंब न करता त्या माणसाने पुन्हा एकदा चपलीने त्या स्रीच्या थोबाडीत मारले. सहाजिकच त्या स्त्रीची झोप आता पूर्णपणे उडाली होती. ती आता नाईलाजाने उठून बसली. आणि त्या माणसाला मोठमोठ्याने शिव्या देऊ लागली. त्याचबरोबर आरडा-ओरडा करत रडूही लागली. आतापर्यंत त्या माणसाने तीच्या थोबाडीत चपलीचे तीन चार फटके मारले होते. त्यामुळे त्याचा राग आता शांत झाला असला, तरी त्या दोघांचे भांडण मात्र अजुनही सुरुच होते. त्यावेळी त्यांच्या त्या भांडणाचा आवाज इतका मोठा होता की, ते जे काही बोलत होते ते अगदी स्पष्टपणे तिथल्या माणसांना ऐकु येत होते. काही मिनीटांनी फलाटावर ट्रेन आली सर्व माणसे पटापट ट्रेनमध्ये शिरली. ट्रेन सुरु झाली. क्षणार्धातच फलाटावरील ते दृष्य मागे जाऊ लागले, तरीही भांडताना त्या स्त्रीच्या मुखातून निघालेले काही शब्द मात्र बऱ्याच जणांच्या कानांमध्ये अजुनही घुमत होते. ते शब्द म्हणजे "त्या वेळी जर माझ्या बापाने तुझ्या सारख्या हैवानाला मला विकले नसते, तर माझ्या जीवनाचे असे वाटोळे झाले नसते."