श्री भगवान् म्हणाले

सर्व ज्ञानामधे थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा । जे जाणूनि इथे मोक्ष पावले सगळे मुनि ॥ १ ॥

ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्या चि सारखे । जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे ॥ २ ॥

माझे प्रकृति हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो । त्यांतूनि सर्व भूतांची उत्पत्ति मग होतसे ॥ ३ ॥

सर्व योनींमधे मूर्ति जितुक्या जन्म पावती । माता प्रकृति ही त्यांस पिता मी बीज पेरिता ॥ ४ ॥

प्रकृतीपासुनी होती गुण सत्त्व-रजस्-तम । ते निर्विकार आत्म्यास जणू देहांत जुंपिती ॥ ५ ॥

त्यांत निर्मळ ते सत्त्व ज्ञान आरोग्य वाढवी । मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला ही चि लेववी ॥ ६ ॥

रज ते वासना-रूप तृष्णा आसक्ति वाढवी । आत्म्यास कर्म-संगाने टाकिते जखडूनि ते ॥ ७ ॥

गुंगवी तम सर्वांस अज्ञान चि विरूढले । झोप आळस दुर्लक्ष ह्यांनी घेरूनि बांधिते ॥ ८ ॥

सुखात घालिते सत्त्व रज कर्मात घालिते । ज्ञान झाकूनि संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम ॥ ९ ॥

अन्य दोघांस जिंकूनि तिसरे करिते बळ । असे चढे कधी सत्त्व कधी रज कधी तम ॥ १० ॥

प्रज्ञेचा इंद्रिय-द्वारा प्रकाश सगळीकडे । देहांत पसरे तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ ११ ॥

प्रवृत्ति लालसा लोभ कर्मारंभ अशांतता । ही देही उठती तेंव्हा जाणावे रज वाढले ॥ १२ ॥

अंधार मोह दुर्लक्ष अपप्रवृत्ति चहूकडे । देहांत माजली तेंव्हा जाणावे तम वाढले ॥ १३ ॥

वाढले असता सत्त्व जाय जो देह सोडुनी । जन्मतो शुभ लोकांत तो ज्ञात्यांच्या समागमी ॥ १४ ॥

रजांत लीन झाला तो कर्मासक्तांत जन्मतो । तमी बुडूनि गेला तो मूढ-योनीत जन्मतो ॥ १५ ॥

फळ सात्त्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले । रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान-शून्यता ॥ १६ ॥

सत्त्वांतूनि निघे ज्ञान निघे लोभ रजांतुनी । अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमांतुनी ॥ १७ ॥

सत्त्व-स्थ चढती उंच मध्ये राजस राहती । हीन-वृत्तीत वागूनि जाती तामस खालती ॥ १८ ॥

गुणांविण नसे कर्ता आत्मा तो त्यांपलीकडे । देखणा ओळखे हे जो होय माझे चि रूप तो ॥ १९ ॥

देह-कारण हे तीन गुण जाय तरूनि जो । जन्म-मृत्यु-जरा-दुःखी सोडिला मोक्ष गांठतो ॥ २० ॥

अर्जुन म्हणाला

त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते । वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे ॥ २१ ॥

श्री भगवान् म्हणाले

प्रकाश मोह उद्योग गुण-कार्ये निसर्गता । पावतां न करी खेद न धरी आस लोपतां ॥ २२ ॥

राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे । त्यांचा चि खेळ जाणूनि न डोले लेश-मात्र हि ॥ २३ ॥

आत्मत्वे सम जो पाहे सोने पाषाण मृत्तिका । धैर्यवंत सुखे दुःखे स्तुति-निंदा प्रियाप्रिय ॥ २४ ॥

मानापमान जो नेणे नेणे जो शत्रु-मित्र हि । आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला ॥ २५ ॥

जो एक-निष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो । तो ह्या गुणांस लंघूनि शके ब्रह्मत्व आकळू ॥ २६ ॥

ब्रह्मास मी चि आधार अवीट अमृतास मी । मी चि शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखास मी ॥ २७ ॥

अध्याय चौदावा संपूर्ण

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel