शिवाजी राजांनी अफझलखानाचाच केवळ नव्हे , तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या दिल्लीस औरंगजेबाला समजल्या। खरं म्हणजे औरंगजेबानं अफझलखानाच्या मोहिमेच्या काळातच शिवाजीराजांविरुद्ध आपली फौज पाठवायला हवी होती. जर त्याने तशी फौज पाठविली असती , तर महाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असतं. आदिलशाहने तशी विनंती औरंगजेबास केलीही होती की , शिवाजी हे दुखणं तुमचे आमचे आणि आपल्या धर्माचेही आहे. म्हणून तुम्ही आम्हांस मदत करा. निदान याचवेळी तुम्हीही शिवाजीविरुद्ध मोहिम काढा. पण औरंगजेबाने कोणाच्यातरी पराभवाची वाट पाहिली. अन् मग अफझल-पराभवानंतर त्याने शाहिस्तेखानाच्याबरोबर ७८ हजार स्वारांची फौज पाठविली. यात पायदळ आणि तोफखाना वेगळा होताच. हे प्रचंड दळवादळ दख्खनवरती निघाले. त्याच्या दिमतीस या लष्करात ५९ सरदार होते. त्यात एक बाईपण होती. तिचे नाव रायबाघन. या प्रचंड फौजेचा रोजचा खर्च केवढा असेल!

याचवेळी सिद्दी जोहर सलाबतखान या कर्तबगार सरदारांस विजापुराहून आदिलशाहने पन्हाळ्याकडे रवाना केले। त्याची फौज नेमकी किती होती ते माहीत नाही. पण अर्धा लाख असावी. दिल्लीची मोगली फौज आणि सिद्दीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावर चाल करून आल्या. म्हणजेच जवळजवळ दीड ते पावणेदोन लाख सैन्याच्या आणि भल्यामोठ्या तोफखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली. एवढी ताकद स्वराज्यापाशी होती का ? नव्हती. पण हिम्मत मात्र या दोन्ही शत्रूंपेक्षा अचाट होती. महाराज एकाचवेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत. पण दोन शत्रूच चालून आले तर ? तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचे हा निश्चय.

एकूण मराठी सैन्य महाराजांपाशी किती असावे ? नक्की आकडा सांगता येत नाही। पण ते अंदाजे फारफार तर २० हजारापर्यंत असावे. २० हजार! विरुद्ध दीड लाख! इथेच स्वराज्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा लागते. त्यासाठीच राष्ट्रीय चारित्र्य जबरदस्त असावे लागते. ते चारित्र्य मराठ्यांच्यात निश्चितच होते. या दुहेरी आक्रमणांचा शेवटी निकाल काय लागला ? दोघांचाही पराभव , स्वराज्याचा विजय. शत्रूच्या तोफांचा , हत्तींचा , खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्या मिरविणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव. या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार केला पाहिजे. नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग ? ते बळ नव्हेच. ती केवळ गदीर्. पण गुणवत्तेनी श्रीमंत असलेल्या मूठभर निष्ठावंतांची फौज हाताशी असेल , तर गेंड्यांच्या आणि रानडुकरांच्या झुंडीही हुलकावण्या देऊन खड्ड्यात पाडता येतात.

शाहिस्तेखानाने एकूण आपल्या सव्वा लाख फौजेनिशी स्वराज्यावर चाल केली। फौज अफाट पण गती गोगलगायीची. सासवडहून पुण्याला तो दि. १ मे १६६० रोजी निघाला. आणि पुण्यास पोहोचला ९ मे १६६० ला. हे अंतर फक्त नऊ कोसांचे. म्हणजे 3 ० किलोमीटरचे. गोगलगायीपेक्षा खानाचा वेग नक्कीच जास्त होता!

त्या प्रचंड फौजेमुळे सपाटीवर असलेले अन् संरक्षक तटबंदी नसलेले पुणे त्याला चटकन मिळाले। ही मात्र गोष्ट खरी.

शाहिस्तेखानाला आता मोठी काळजी कोणाचीच नव्हती। कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते. भोवती सिद्दी जोहरचा अजगरी विळखा पडला होता. पण त्याला मराठी चुणूक समजलीच. तो शिरवळहून शिवापुराकडे आणि शिवापुराहून गराडखिंडीने सासवडकडे येत असता , मराठ्यांच्या , म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या लहानशा म्हणजेच सुमारे पाचशे मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की , आघाडीवर चाललेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला. गराडे ते सासवड हे अंतर सुमारे १५ किलोमीटर आहे. मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाची हैराणगत केली. (एप्रिल शेवटचा आठवडा १६६० )

खान पुण्यास पोहोचला। त्याने महाराजांच्या लाल महालातच मुक्काम टाकला. मुठा नदीच्या दक्षिण तीरावर त्याचे प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरले. त्याच्या सैन्यात त्याचे खास दिमतीचे हत्ती होते पाचशे! इतर हत्ती वेगळे.

खान आपला जनानखाना घेऊन आला होता। हत्ती होते आणि भलामोठा अवजड तोफखानाही होता. आता सांगा ? मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला खान कसं तोंड देणार होता ? या मोगली (आणि विजापुरी) सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगले नाही. या आमच्या डोंगरी दऱ्याकपाऱ्यांत त्यांच्या हत्तींचा अन् तोफांचा काय उपयोग ? शिवाय गळ्यात जनानखान्याचे लोढणं.

जाता जाता सांगतो , महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात महाराजांनी हत्तींचा कधीही वापर केला नाही. धावता तोफखाना त्यांनी कधीच ठेवला नाही. अन् लढाईवर जाताना कोणीही , अगदी महाराजांनीसुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाही. मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राचा जवळजवळ ४० वर्ष सतत अनुभव आल्यानंतरसुद्धा शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबही संभाजी महाराजांच्या विरुद्ध महाराष्ट्रावर आला , तेव्हा त्याच्याबरोबर आणि जाफरखान वजीराच्याबरोबर , किंबहुना सर्वच सरदारांच्याबरोबर जंगी जनानखाना होता. कधीकधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती , तोफा आणि जनानखान्यानेच केला.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel