शाहिस्तेखानाच्या फजितीची वार्ता हिंदुस्थानभर पसरली. महाराजांचे हे ऑपरेशन लाल महाल इतके प्रभावी , चमत्कृतीपूर्ण , धाडसी आणि अद्भूत घडले की , साऱ्या मोगल साम्राज्यात तो एक अति आश्चर्यकारक डाव ठरला. सव्वा लाख फौजेच्या मोगल छावणीत घुसून खुद्द सेनापती शाहिस्तेखानावर पडलेला हा मूठभर मराठ्यांचा छापा म्हणजे ढगफुटीसारखाच भयंकर प्रकार होता. ‘ शिवाजीराजा ‘ म्हणजे , महंमद घोरीपासून (१२ वं शतक) ते थेट औरंगजेबापर्यंत (१७ वं शतक) झाडून साऱ्या सुलतानांच्या तख्तांना भूकंपासारखा हादरा देणारा विस्फोट होता. या सुलतानांपुढे ठाकलेलं ते आव्हान होतं. हे आव्हान म्हणजे केवळ शारीरिक दांडगाई नव्हती. त्यामागे एक विलक्षण प्रभावी तत्त्वज्ञान होतं. परित्राणाय् साधुनाम् त्यात मानवतेचं उदार आणि विशाल असं मंगल आश्वासनही होतं.

लाल महालावरील महाराजांच्या या छाप्यात शाहिस्तेखानची एक मुलगी हरवली. तिचे नेमके काय झालं ते कधीच कोणाला कळलेलं नाही. पण अनेकजण विशेषत: शाही कुटुंबातली माणसं अन् विशेषत: औरंगजेबाची बहीण जहाँआरा बेगम यांची अशी समजूत झाली होती की , सीवाने ही मुलगी पळवून नेली.

हे सर्वस्वी असत्य होतं. पुरावा तर अजिबातच नव्हता. एक गोष्ट लक्षात येते की , स्वत: औरंगजेबाने असा आरोप शिवाजीराजांवर कधीही केलेला , नंतरसुद्धा सापडत नाही. जहाँआराच्या पत्रांत मात्र ती हा आरोप अनेकदा करते. जाणूनबुजून गैरसमज करून घेणाऱ्यांना व देणाऱ्यांना दिव्यदृष्टी देणारा ‘ प्रॉफेट ‘ अजून जन्माला आलेला नाही.

शाहिस्तेखानावर पडलेला भयानक छापा औरंगजेबालाही वाटला नसेल इतका दु:खदायक काही राजपूत सरदारांना वाटला. विशेषत: जसवंतसिंह या जोधपूरच्या सरदाराला वाटला. लाल महालातील हा फजितीदायक छापा घडल्यानंतर (इ. १६६ 3 एप्रिल ६ ) या जसवंतसिंहाने पुण्याशेजाच्या सिंहगडावर हल्ला चढविला. त्याच्याबरोबर त्याचा मेहुणा भावसिंह हाडा (बुंदीमहाराजा) हाही होता. सिंहगडावर मराठी सैन्य किती होते ते नक्की माहिती नाही. पण या मोगली राजपूत सिंहांच्यापेक्षा मराठे नक्कीच , खूपच कमी होते.

या सिंहांना सिंहगड अजिबात मिळाला नाही. त्यांनी गडाला वेढा घातला. आत्ताच सांगून टाकतो की , हा वेढा एप्रिल ६ 3 पासून २८ मे १६६४ पर्यंत चालू होता. सिंहगड अभेद्य राहिला. याच काळात (दि. ५ ते १० जानेवारी १६६४ ) महाराजांचा सुरतेवर छापा पडला. हे मी आत्ताच का सांगतोय ? सुरतेवरच्या छाप्याकरता महाराज ससैन्य याच सिंहगडाशेजारून म्हणजेच जसवंतसिंगच्या सिंहगडला पडलेल्या वेढ्याच्या जवळून सुमारे ५ कि. मी. अंतरावरून गेले. या गोष्टीचा , वेढा घालणाऱ्या या दोन राजपूत सिंहांना पत्ताही लागला नाही. याचा अर्थ असाच घ्यायचा का की , सिंहगडाला झोपाळू मोगल राजपुतांचा वेढा पडला होता अन् त्यांच्या बगलेखालून महाराज सुरतेवर सूर मारीत होते.

मोगलांचे हेरखाने ढिसाळ होते हा याचा अर्थ नाही का! इथे थोडा भूगोलही लक्षात घ्यावा. पुणे ते नैऋत्येला 3 ० कि. मी.वर सिंहगड आहे. सिंहगडच्या असाच काहीसा नैऋत्येलाच २० कि. मी.वर राजगड आहे. महाराज सुरतेसाठी राजगडावरून सिंहगडच्या शेजारून पश्चिमअंगाने , लोणावळा , कसारा घाट , दूगतपुरी , त्र्यंबकेश्वर या मार्गाने सुरतेकडे गेले. त्र्यंबकेश्वरला महाराज दि. 3 १ डिसेंबर १६६ 3 या दिवशी होते. पुण्यातही मोगलांची लष्करी छावणी यावेळी होतीच. राजगड ते सूरत हे सरळ रेघेत अंतर धरले तरी 3 २५ कि. मी. आहे. म्हणजे नकाशात असे दिसेल की , सिंहगडचा वेढा आणि पुण्याची मोगल केंद छावणी याच्या पश्चिमेच्या बाजूने महाराज एखाद्या बाणासारखे दोनशे कि. मी. मोगली अमलाखालील मुलूखांत घुसले. पुणे आणि सिंहगड येथे असलेल्या मोगली छावण्यांना याचा पत्ता नाही.

हे मी सांगतो आहे , यातील मुख्य मुद्दा आपल्या लक्षात आला ना ? अगदी सरळ गोष्ट आहे की , कमीतकमी वेळांत महाराज या धाडसी मोहिमा यशस्वी करीत आहेत , त्या कोणाच्या भरवशावर ? हेरांच्या भरवशावर। हेरांनी आणलेल्या बिनचूक माहितीवर त्यांचे आराखडे आखले जात होते. त्या हेरांच्या कामगिरीचा तपशील आपल्याला मिळत नाही. मोहिमेचे यश आणि मोहिमेचे तपशील लक्षात घेऊनच हेरांनी केलेल्या कामगिरीचा अंदाज आपल्याला करावा लागतो. प्रसिद्धी आणि मानसन्मान यांपासून अलिप्त राहून हे हेर आपापली कामे धाडसाने अन् कित्येकदा जिवावर उदार होऊन अन् कित्येकदा जीव गमावूनही कडव्या निष्ठेने अन् कोणाच्या कौशल्याने करीत होते. अशी माणसे साथीला असली तरच शिवाजीमहाराज सार्वभौम सिंहासन निर्माण करू शकतात. नाहीतर ती अयशस्वी होतात. आठवलं म्हणून सांगतो , पेशवाईच्या अखेरच्या काळात चतुरसिंह भोसले आणि इंग्रजांच्या प्रारंभीच्या काळात क्रांतीकारक उमाजी नाईक खोमणे हे दोन पुरुष शिवाशाहीचा विचार डोक्यात ठेवून धडपडत होते. दोघांनाही अखेर मृत्युलाच सामोरे जावे लागले. पहिला आमच्याच कैदेत तळमळत मरण पावला , दुसरा इंग्रजांच्या कैदेत पडला आणि फाशी गेला. हे दोन अयशस्वी वीर शिवाजी महाराजच नव्हते का ? पण यश आले नाही.

आमच्या तरुणांनी या यशस्वी आणि अयशस्वी शिवाजींचा अभ्यास केला पाहिजे. अज्ञातात राहून स्वराज्याची कामे करणाऱ्या शिवकालीन हेरांचे वाचन , मनन आणि अनुकरणही आम्ही केले पाहिजे. असं केल्यानं काय होईल ? आमच्या आकांक्षांना खरंच गगन ठेंगणे ठरेल!

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel