महाराज माणसं माणिकमोत्यांप्रमाणेच निरखून पारखून घेत असत. त्यांत ते ९९ टक्के यशस्वीही ठरले. पण तरीही दक्षता घ्यायची ती घेतच असत. सिंहगडाला जसवंतसिंहाचा वेढा पडण्यापूर्वी का कोण जाणे , पण सिंहगडावरती फितवा फितुरीचा संशय शिवाजीमहाराजांच्या मनांत डोकावला. त्यावेळी महाराज स्वत: सिंहगडावर जाऊन आले. त्यांच्या पद्धतीनं त्यांनी गडाची तबियत तपासली. अन् त्यांच्या लक्षात आलं की , गडाची तबियत एकदम खणखणीत आहे. नंतर गडाची ही निरोगी तबियत प्रत्ययासही आली. एप्रिल प्रारंभ ते २८ मे ६४ पर्यंत मोगली राजपूत सरदार जसवंतसिंह राठोड सिंहगड घेण्यासाठी गडाला १ 3 महिने धडका देत होता. गड अभेद्यच राहिला. झेंडा फडकतच राहिला. सिंहांना मात्र टेंगळे आली.

स्वराज्याचा हा बिकट डाव खेळत असताना प्रामाणिक निष्ठावंत आणि कष्टाळू अशा प्रजेने आणि सेनेने महाराजांना जी साथ केली , त्याला तोड नाही. प्रजेनंही साथ दिली याला पुरावा काय ? शाहिस्तेखानच्या आणि नंतर मिर्झाराजा जयसिंहाच्या स्वराज्यावरील चाललेल्या अतिरेकी आक्रमणांच्या काळात मावळातील प्रजा सर्व सोसून , शरणागतीचा विचारही मनात न आणता लोहस्तंभासारखी उभी राहिली. प्रजा म्हणजेच जनता , अशी उभी राहिली तरच शिवाजी महाराज , विन्स्टन चचिर्ल , अन् हो चिमिन्ह हे यशस्वी होत असतात.

महाराज शत्रूला विचार करायलाही अवधि देत नव्हते. शाहिस्तेखानावरील छाप्यानंतर पावसाळा सुरू झाला. संपला. या काळात महाराजांचे हेर , बहिजीर् नाईक , त्याच्याबरोबर बहुदा वल्लभदास अन् सुंदरजी परभुजी गुप्त रूपानं सुरतेच्या टेहळणीस महाराजांनी रवानाही केले. या मराठी हेरांनी सुरत चांगलीच हेरून काढली. कोण कोण लक्षाधीश आणि कोट्याधीश आहेत हे तर टिपून पाहिलेच. पण सुरतेची लष्करी आणि आरमारी परिस्थिती त्यांनी बरोबर न्याहाळली. सुरत सुस्त होती. सुभेदार होता इनायतखान. पैसे खाण्यात पटाईत. पैसे खाण्याची त्याची ‘ मेथड ‘ आज आपल्याला नवीन वाटणार नाही. आपण अनुभवी आहोत. बादशाहाच्या हुकुमाप्रमाणे सैन्याची संरक्षक संख्या तो ‘ कॅटलॉग ‘ वर दाखवित होता. पण प्रत्यक्षात फक्त एकच हजार सैन्य त्याच्यापाशी होते. बाकीच्या सैन्याचा सर्व तनखा खानाच्या पोटात गुडूप होता. आता ही गोष्ट बहिजीर्सारख्या कोल्ह्याच्या नजरेतून सुटेल काय ? मराठ्यांच्या हितासाठी अशी चतुराई करून इनायतखानसाहेब मराठी स्वराज्याचीच केवढी सेवा करीत होते , नाही!

शिवाजी महाराज आपल्यापासून काहीशे फर्सुख (आठ मैल म्हणजे एक फर्सुख) लांब आहे. तो इकडं कशाला येईल ? आपण अगदी निर्धास्तपणे पैसे खातखात बादशाहचं राज्य सांभाळीत बसायला हरकत नाही. असा अतिव्यवहार्य विचार करून खान सुभेदारीच्या लोडाला टेकलेला होता. सुरतेतील एकूण संपत्तीचा आणि शांत स्थितीचा तपशीलवार अभ्यास करून मराठी हेर राजगडाला परतलेही होते. आता महाराज सुरतेच्या स्वारीवर सुखरूप कसं जायचं अन् डबोलं घेऊन सुखरूप कसं यायचं याचाही तपशील ठरवित होते. त्रास न होता हे साधायचं होतं. वाटेत कुठे कुठे अडचणी आणि शत्रूचा अडसर येऊ शकेल , शक्यतोवर असाच मार्ग ठरविणे आवश्यक होते. शांततेच्या मार्गाने सर्व काही साध्य करायचे अशी नाहीतरी आमची भारतीय परंपरा आहेच.

राजगड- त्र्यंबकेश्वर-जव्हार-गणदेवी-उधना ते सुरत असा हा सामान्यत: मार्ग होता. साधारणपणे हा मार्ग सह्यादीच्या घाटवाटांतून आणि जंगलातून जाणारा आहे. सुमारे पाच हजार घोडेस्वार आणि संपत्ती लादून घेऊन येण्याकरता सुमारे पाच हजार घोडे महाराजांचे बरोबर निघाले. महाराज सुरत काबीज करायला निघालेले नव्हते. शक्यतो रक्तपात न करताच खंडणी मिळविण्यासाठी ते जात होते. वाटेत जव्हारचा राजा आडवा येतो की काय अशी नक्कीच धास्ती होती. त्याशिवाय लष्करी धास्ती शेवटपर्यंत कुठेच नव्हती. महाराजांनी जी ‘ पुढची ‘ दक्षता घेतली होती ती विचार करण्यासारखी आहे. सुरत तापी नदीच्या खाडीवर आहे. सुरतेच्या उत्तरेस , ईशान्येस आणि पूवेर्स महाराजांनी आपल्या सैन्याच्या लहान लहान तुकड्या सुरतेपासून काही किलोमीटर अंतरावरती ठेवलेल्या स्पष्ट दिसतात. या स्वारांना छबिन्याचे म्हणजेच गस्तीचे स्वार म्हणतात. सुरतेतील आपला कार्यभाग पूर्ण होईपर्यंत उत्तर आणि पूर्व बाजूंनी मोगलांचे कोणी सरदार आपल्यावर चालून येऊ नयेत अशी रास्त अपेक्षा त्यांची होती. पण समजा अहमदाबाद , पाटण , पावागड , सोनगट वा बुऱ्हाणपूर येथे मोगली ठाणी होती. त्या ठाणेदारांनी आपल्याला विरोध करण्यासाठी चाल केली तर ? त्या संभाव्य मोगली हल्ल्यांची वार्ता आपल्याला खूप आधीच अचूक कळावी ही योजना महाराजांनी केलेली होती.

अन् तसेच घडले. महाराज त्र्यंबकेश्वरहून दि. १ जानेवारी १६६४ रोजी जव्हारपाशी सिरपांव येथे पोहोचले. सुदैवाने जव्हारच्या राजाने महाराजांना अजिबात विरोध केला नाही. महाराज उधना उर्फ उटना या ठिकाणी पाच जाने. १६६४ रोजी म्हणजे सुरतेपासून अवघ्या १० कि. मी. वर पोहोचले.

सुरतेचा सुभेदार इनायतखान पूर्ण गाफील होता. जगाचा नियमच आहे , गाफील का जो माल है , वो अकलमंदका खुराक है। सुरत बंदर हे मोगल साम्राज्याचं आथिर्क वर्म होतं. सुरतेत येणाऱ्या मालावर बादशाहला प्रचंड जकातीचे उत्पन्न मिळत असे. सुरत ही जागतिक कीतीर्ची बाजारपेठ होती. येथील जकातीचे उत्पन्न जहाँआरा बेगम ( औरंगजेबाची बहीण) हिला मिळत असे. म्हणजे आता महाराजांनी मोगलांच्या नाकावरच नेम धरला होता.

-शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel