आर वाय चितळे.. जनरल मॅनेजर! मोठी पाटी दारावर लागलेली होती. मुंबई सारख्या शहरात डुप्लेक्स म्हणजे एखाद्या लहान गावातला पॅलेस! राजाभाउ चितळे हे मुळचे कोंकणातले. फार वर्षापुर्वी ते इथे मुंबईला येउन सेटल झाले.कोंकणात जन्म घेतलेला हा मुलगा, अगदी ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ मधल्या ’काशी’ प्रमाणे, शाळेत शिकून पहिल्या नंबरात पास झाल्यावर त्याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. घरचा अफाट पैसा, पुढच्या उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात गेले होते चितळे. राजाभाउंना सुमती बाई चितळे म्हणूनच बोलवायच्या आणि ते सुमा!
भारतामधे परत आल्यावर एका प्रतिथयश कंपनीत जनरल मॅनेजरच्या पदापर्यंत पोहोचले. मुंबईतच जन्मलेली आणि मोठी झालेली सुविद्य पत्नी, आणि एक २१ वर्षाची एमबीए करणारी एकुलती एक मुलगी रीना. आटोपशीर काम होतं सगळं. तीन लोकं आणि चांगला सहा खोल्यांचा डुप्लेक्स ! लाइफ इज ब्युटीफुल.. असा काहीसा प्रकार होता.
गावाशी संबंध तर जवळपास तुटलेलाच होता. तरी पण कधीतरी गावाकडची आठवण कधीतरी यायचीच- जाणं झालं नाही तरी जुन्या मित्रांशी संबंध पण जवळपास संपल्यातच जमा झालेले होते. कित्येक वर्षात गावाकडे गेलो नाही ही बोच नेहेमीच लागून रहायची.
भैय्यासाहेब जोशी. त्यांचा लहानपणचा मित्र. हा पण अभ्यासात हुशार पण याने मात्र गावातच राहून असलेली शेती वाडी वाढवायचं ठरवलं होतं. एमएससी झाल्यावर पुन्हा गावाकडे येउन नविन पध्दतीने शेतीचे प्रयोग करणे सुरु केले आणि आता तर प्रतिथयश शेतकरी म्हणून चांगला नावलौकीक मिळवला होता त्यांनी.दोघांचा एकमेकांशी संबंध फक्त दिवाळीच्या ग्रिटींग पुरताच होता.
अधून मधून गावाकडून आंब्यांची पेटी, कोकम चं आगळ, आमसोल वगैरे पाठवायचे भैय्यासाहेब. एक दिवस रात्री भैय्यासाहेब जोशीं चा फोन आला की माझा मुलगा पहिल्यांदा मुंबईला येतोय, तुझं घर मोठं आहे, तेंव्हा तो तुझ्या कडेच दोन तिन दिवस राहिल. इंटर्व्ह्यु झाला की लगेच तो परत गावाकडे येईल.
चितळ्यांचा चेहेरा आनंदाने उजळला की आपल्या मित्राचा मुलगा येणार म्हणून, पण तेवढ्यात त्यांना आपल्या पत्नी सुमतीबाइंची आठवण झाली, आणि मनातल्या मनात तिच्या कपाळावरच्या आठ्या मोजण्याचा प्रयत्न करू लागले.
********************
रोहन, भैय्यासाहेबांचा मुलगा रिक्षातून उतरला आणि, त्या पाटीकडे बघत उभा होता. कोंकणातून एस टीच्या बसने आल्यामुळे मूळे धुळीने त्याचा पांढरा असलेला शर्ट आता कोंकणातल्या लाल मातीने किंचित तांबूस दिसत होता. पायात साधी बाटाची चप्पल, हातामधे व्हिआयपीची हार्ड बॅग- कदाचित त्याच्या वडिलांनी विकत घेतलेली असेल. गावातच राहून शिक्षण पुर्ण केलं होतं पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत चक्क एमए झाला होता तो मराठी मधे प्रथम श्रेणीत. आता इंटर्व्ह्यु साठी इथे म्हणजे मुंबईला आला होता. थोडा बुजल्या सारखा झाला होता. इतक्या मोठ्या शहरात येण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी त्याची.
कोंकणात घरात नेहेमी आई सोबत राहिल्याने अगदी ममाज बॉय सारखा झाला होता रोहन. वडिलांपे्क्षा आई त्याला जास्त जवळची वाटायची. सगळे काका लोकं कोंकण सोडून बाहेर गेल्याने सगळे सण , वार इथे कोंकणातल्या वडीलोपार्जित घरामधेच व्हायचे. आईच्याने एकटीच्याने हे सगळं सोवळं ओवळ्याचं व्हायचं नाही. म्हणून रोहन ला पण आईला मदत करायला सोवळं नेसून पुरण वाटणे, वगैरे कामं करावी लागायची. स्वयंपाक करण्यात पण अगदी एक्स्पर्ट होता रोहन. ज्याला खाण्याची आवड असते त्याला करण्याची नसते असं म्हणतात, पण इथे तसं नव्हतं… रोहन च्या बाबतीत.
तसा कधी तरी पुण्याला मावशीकडे गेला होता , पण त्याला नेहेमी कोंकणातच कम्फर्टेबल वाटायचं. त्या पितळेच्या पाटीवर राजशेखर चितळे हे नांव चकाकत होतं. त्याने घाबरत घाबरत हळूच बेल वाजवली आणि दार उघडायची वाट पाहू लागला.
**********************************
सुमती बाई. जन्मापासून मुंबईकर. तसं यांचं पण मुळ कोंकणातलंच, पण वडील मुंबईला आल्यावर त्यांचं सगळं आयुष्य कोर्ट कज्जात गेलं, पण कोंकणातली इस्टेट काही मिळाली नाही. ह्यांनी इथे आयुष्यभर काबाड कष्ट करुन पैसा कमावला आणि वकिलाच्या बोडख्यावर घातला असं सुमती बाईंच्या आई म्हणायच्या. कदाचित म्हणून असेल की कोंकणातल्या माणसांबद्दल एक वेगळाच आकस होता त्यांच्या मनात.
दार उघडायला त्या स्वतःच दाराशी गेल्या आणि समोर या रोहन ला बघुन त्यांनी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. रोहन ला काय बोलावे हे समजतच नव्हते, तेवढ्यात चितळे खाली उतरले, रोहनला दारात उभा पाहून त्यांना तो कोण असावा , याची त्यांना लगेच कल्पना आली. मित्राचा मुलगा- अगदी जवळच्या मित्राचा मुलगा समोर उभा पाहून त्यांना खूप बरं वाटलं.
सुमतीबाईंना जर आधीच सांगितलं असतं तर त्या त्रागा करतील ,म्हणून त्यांनी सुमतीबाईंना रोहनच्या येण्याबद्दल काहीच कल्पना दिलेली नव्हती.
हलकेच खाकरुन ते म्हणाले, “रोहन नां तु?? ये.. असा आत ये”
“सुमा, अगं हा माझ्या अगदी जवळच्या मित्राचा मुलगा आहे आणि आपल्या कडेच काही दिवस रहाणार आहे . इंटर्व्ह्यु झाला की परत जाईल तो.”
सुमतीबाई काही बोलण्यच्या मनःस्थितीत नव्हत्या. आज सकाळीच फोन आला, स्वयंपाक करणाऱ्या मावशींचा, आज येणार नाही म्हणून. गेल्या कित्येक वर्षात स्वय़ंपाक घरात पाउल पण ठेवलं नव्हतं- आता कुठल्या हॉटेलातुन मागवायचं जेवण याचा विचार सुरु होता, आणि तेवढ्यात हा समोर आला अजून. रागानेच बघितलं सुमती बाईंनी आणि फणकाऱ्याने आत निघुन गेल्या काही एक न बोलता.
चितळे त्याला घेउन गेस्ट रुम मधे गेले. सहज थोडी चौकशी केली की किती शिकलायस म्हणून ? एम ए मराठी फर्स्ट क्लास ऐकल्यावर राजाभाउंचा त्याच्यामधला इंटरेस्ट संपुन गेला.तो उत्साहाने सांगु लागला की त्याचा इथे इंटरव्ह्यु आहे परवा, तेवढ्यात राजाभाउंच्या सेल फोनचीबेल वाजली, आणि ते बरं बरं.. असूं दे हों.. असं म्हणून समोरुन निघून गेले, फोन वर बोलत बोलत.
चितळेंना वाटलं होतं की जर तो टेकनिकली क्वॉलीफाईड असेल तर आपल्याच कंपनित त्याला लाउन घेउ या, म्हणजे भैय्याला पण मदत केल्यासारखं होईल. पण एम ए??.. आणि ते पण मराठी?? कठीण आहे पोराचा निभाव लागणं मुंबईत! आणि ते सरळ चालत निघाले आपल्या खोलीकडे इमेल ला रिप्लाय द्यायला.
**********************
रोहनने आपली बॅग ठेवली एका बाजूला आणि अटॅच बाथरुम मधे शिरला. कपडे काढून नळाखाली उभा राहिला रोहन. थंड गार पाण्याच्य स्पर्शाने एकदम बरं वाटत होतं. आठ तासाचा एसटीचा प्रवास शरीर आंबवणारा प्रवास होता.स्वच्छ धुतलेला पायजामा आणि शर्ट अडकवुन तो खाली उतरला. सुमती बाईंनी डायनिंग टेबलवर ब्रेकफास्ट लावून ठेवला होता.
राजाभाउ पण रोहन यायची वाटच पहात होते. त्यांनी रोहनला बोलावले आणि तो समोर बसला.
चितळ्यांना त्याला काय विचारू अन काय नाही असं झालं होतं. परिक्षेला बसल्याप्रमाणे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं सुरु केलं.भैय्या कसा आहे ? तब्येत कशी आहे सगळ्यांची? आज्जी ??
अरे… ती गेली?? कधी? कसे?? असे अनेक प्रश्न विचारत होते राजाभाउ आणि होता होइल तितके उत्तर देत होता रोहन.
तेवढ्यात रीना धावतच जिन्यावरुन खाली उतरली- अगं ममा.. लवकर दे काहीतरी उशिर होतोय बघ मला.
घाईघाईत थोडं कॉर्नफ्लेक्स आणि दूध घेउन खाणं सुरु केलं. राजाभाउंनी ओळख करुन दिली. हा रोहन – आपल्या भैय्यासाहेबांचा मुलगा. रीना नुसतंच हो म्हणाली आणि थंड प्रतिक्रिया देउन निघुन गेली.सुमतीबाई समोर बसून टोस्टला बटर लाउन राजाभाउंच्या हातात देत होत्या. राजाभाउंच्या लक्षात आलं की आज काहीतरी बिनसलंय सुमतीबाईंचं. चक्क रेगुलर फॅटवालं बटर लावलं होतं टोस्टला. त्यांना बरं वाटलं, रोजच हिचा असा मुड असेल तर कित्ती छान होईल नां?
रीना ने रोहनकडे पाहून मनात म्हटले, कुठला गावचा गावठी मुलगा आलाय हा. घरातपण चांगलं टी शर्ट शॉर्ट्स वगैरे घालायचं तर म्हाताऱ्या सारखे कुर्ता पायजामा घालतोय.
चितळ्यांना आणि सुमा ताईंना अजिबात वेळ नव्हता मुलीकडे लक्ष द्यायला. सुमाताईंची सोशल सर्व्हिस म्हणजे किटी पार्टी वगैर जोरात सुरु होतं. उरलेला वेळ रमी क्लब, जिम, वगैरे वगैरे…आणि आता नेमकी उद्या किटी पार्टी घरी ठेवलेली आणि ती स्वयंपाकवाली बाई सुटीवर!!!!
***************************************************
ग्रॅज्युएशन केलंय मग आता एमबीए म्हणजे एकदम शिंग फुटले होते रीनाला. क्लासमधे मित्र, मैत्रीणी, खूप खूप होते. एक वेगळंच स्वच्छंदी फुलपाखराचं आयुष्य होतं , ती जगत होती .जितका हवा तितका पैसा एकही प्रश्न न विचारता हातात पडायचा . कॉलेज, हॉटेलींग, सिनेमा.. मित्र, पिकनिक्स सगळं काही रेग्युलरली सुरु होतं. स्वतःच्या कोशात गुंतलेली होती ती . जगाशी काही एक घेणं नव्हतं.
सकाळी निघाली कॉलेजला जायला, तर तो मुलगा खाली डायनिंग टेबलवर पप्पांजवळ बसलेला दिसला. गोरा रंग, धारदार नाक, कुरळे केस, त्यांची एक बट कपाळावर आलेली. विंदांच्या कवितेतल्या प्रमाणे त्याच्या कपाळावर ती उर्दू मधे लिहिलेल्या प्रेमकविते प्रमाणे दिसत होती ती बट.. छेः.. तिने मनातले विचार झटकुन टाकले, गावचा येडा मुलगा तो.. जाईलच परत दोन तिन दिवसात, आपण कसला विचार करतोय इथे ..
कॉलेजमधल्या त्या गौरव पेक्षा खूप छान होता दिसायला, पण गौरवची “स्टाइल” नव्हती ह्याच्यामधे. पण याला एक चांगली लिव्हाइस ची जिन्स आणि टिशर्ट अडकवला तर तो कसा दिसेल म्हणुन ती मनातल्या मनात कल्पना करू लागली.
दिल तो पागल है.. दिल दिवाना है.. सेल्फोन ची घंटी वाजली आणि तीने फोन उचलला. मैत्रीण होती, झालं, आता कमित कमी तासभर निश्चिंती!! मैत्रीण सांगत होती की गौरव रीना बद्दल विचारत होता म्हणे. आणि त्याला रीना आवडते असंही बोलला तो तिच्या बॉय फ्रेंड जवळ. आणि हेच सांगायला तिने फोन केला होता. उद्या संध्याकाळी ओबेरॉय मॉल मधे संध्याकाळी भेट म्हणतोय म्हणे सिनेमाला जाउ या .. सगळा गृप येणार आहे ..
********************************