लेखिका: सौ.शरयू  वडाळकर,
मालेगाव, जि. नाशिक | वयः ६६

आपुलकी, जिव्हाळा, दया, माया आणि आल्हादाच्या रेशमी धाग्यांनी नटलेली वास्तू म्हणजे आपले घर असते. अशा घरास गंगेचे पावित्र्य लाभलेले असते. माझे घर छोटे आणि दोन मजली आहे. वरच्या घरात एका कोपऱ्यात माझी एक आवडती खास जागा आहे. ती म्हणजे माझे देवघर!

देवघरात मोजकेच देव आहेत. त्यात गणपती हे माझे आराध्य दैवत आहे आणि रेणुका देवी ही माझी कुलस्वामिनी आहे. या देवांची मी रोज उपासना करते. रोज तीन तासांची माझी उपासना असते. सुख दु:खाला मोकळीक करून देण्याची ही माझी जागा आहे. देवघरात गणपतीची छोटी आणि सुबक अशी मूर्ती आहे. त्याची मी आवर्तने करते. तसेच देवघरासमोर मी ध्यान धारणा करते. त्यामुळे मला शांती लाभते. त्यामुळे जीवन जगण्याची स्फूर्ती येते आणि जगण्याला उभारी येते आणि एक प्रकारचे स्थैर्य अनुभवास येते. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की भक्तीशिवाय जीवनाला रंग नाही. भक्ती करून मन शुद्ध होते. मग त्या मनात ईश्वराचे प्रतिबिंब पडते आणि जीवनात अनेक चांगले अनुभव येतात आणि ईश्वरावरील श्रद्धा आणखीनच दृढ होते.

समर्पणवृत्ती आणि सात्विक भाव परावर्तीत होण्यासाठी ही जागा म्हणजे देवघर खूप चांगली आहे. उपासना करतांना आपण जी नामजपाची आणि मंत्रांची आवर्तने करतो त्यातून ज्या ध्वनिलहरी उत्पन्न होतात त्यामुळे मनाला स्फूर्ती आणि शांतता मिळते, हे नक्की! अशा या पवित्र कोपऱ्यात मी सकाळ आणि संध्याकाळ या दोन वेळेस रमते.

गणपतीच्या सहवासात असल्याने आपल्या अंगी नम्रता येते आणि अंगी विनयशील वृत्ती बाणावते. तसेच आपला अहंकार दूर होतो. २५ वर्षे साधना करून पवित्र झालेला हा कोपरा मला नवचैतन्य प्राप्त करून देतो. फक्त कोपराच नव्हे तर संपूर्ण परिसर पवित्र होतो. श्रद्धेमध्ये सामर्थ्य आहे. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, "अनन्य भावाने जो मला (म्हणजे सर्वोत्तम परमेश्वराला) शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो! इतर कोणाही देवाची उपासना केली तरी ती मलाच पोहोचते!" हे लक्षात घ्या की, "न मी भक्तं प्रणश्यति" अशी गोपाळकृष्णाची आन आहे.

साधना करून मला जो आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीच करता येणार नाही. "आनंदाचे डोही, आनंद तरंग!" देणारी अशी ही माझी स्फूर्तीदायी जागा आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel