भरत उपासनी
 
गोष्टीच्या पुस्तकांची रांग लागली
चाळीस चोरांची अलीबाबा मौज चांगली
अल्लाउद्दीनच्या दिव्याची जादू चांगली
दिवा घासला की पाहिजे ती गोष्ट मिळाली
 
जादूच्या तळ्यातील पाणी चाखू या
सिंदबादसवे सफरीला जाऊ या
राजकुमाराला एक परीराणी भेटली
परीराणीच्या राज्यातली जादू चांगली
 
अजय आमचा चतुर हेर रहस्य शोधतो
त्याच्यासवे आम्हीसुध्दा हेर बनतो
गावाबाहेर अद्भुत गुंफा चला शोधू या
गुंफेतला साधूबाबा आपण पाहू या
 
सिंड्रेलाची गोष्ट आपण छान वाचू या
हिमपरी, सात बुटके आपण पाहू या
राजा,राणी,परीराणी खूप खूप मजा
राजकुमार,राजकन्या,त्यांच्या राज्यात जाऊ या
 
गुहेमध्ये एक राक्षस झोपलेला असतो
झोपेमध्ये खूप खूप घोरतच असतो
घोरण्याचा त्याच्या आपण आवाज ऐकू या
आपल्यामागे धावला तर धूम पळू या
 
एकशिंगी राक्षस खूप त्रास देत असतो
त्याचा जीव म्हणे एका फुग्यात असतो
राजाबरोबर जाऊन आपण फुगा फोडू या
एकशिंगी राक्षसाला ठार मारू या
 
राजा,राणी,परीराणी,राक्षसांच्या गोष्टी
इसाप आणि बिरबलाच्या छान छान गोष्टी
जादूच्या पुस्तकांची रांग लागली
जादूच्या गोष्टींनी सुट्टी रंगली

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel