शरयू वडाळकर
मालेगांव, वय-६६
संसाराचा गाडा चालवता चालवता लिहायला वेळ मिळालाच नाही.
आता मुलींची लग्ने झाली.
थोडा मोकळा वेळ मिळाला असे वाटते... तेव्हा मी काही उखाणे लिहिले आहेत, ते वाचून आपला अभिप्राय कळवा.
जुन्या काळातले काही अनुभव पण मी तुमच्या सोबत लवकरच शेअर करणार आहेच.
मनोगत वरचे हे माझे पहिलेच लिखाण.
१९७५ च्या आसपासचा काळ. पूर्वीच्या आठवणींना उजाळा देता देता आमच्या काळचे उखाणे ही आठवतात.
(१) सुदाम्याचे पोहे केले कृष्णाने भक्षण...
--- राव म्हणतात, संकटकाळी मी करीन देशाचे रक्षण.
(२) रामनामाने समुद्रावर दगड तरंगले...
--- रावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले.
(३) प्रभू रामचंद्राला बोरे अर्पून, शबरीने जीवन केले कृतार्थ...
--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवनाला नाही उरत अर्थ"
(४) संस्कृत मध्ये पाण्याला म्हणतात उदक...
--- रावांना आवडतात खुप मोदक
(५) निसर्गसौंदर्याने बहरलेला खंडाळ्याचा घाट...
--- रावांनी धरली परमार्थाची वाट.
(६) कोकणात नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष...
--- राव म्हणतात, "श्रद्धेविना जीवन रुक्ष".
(७) श्रावणात प्राजक्ताला येतो बहर...
--- राव म्हणतात, "महाराष्ट्रात पावसाने केला कहर".
(८) ढग भरून आले म्हणजे मोराला होतो आनंद...
--- रावांना आहे पुस्तके वाचनाचा छंद.
(९) महादेवाच्या गळ्यात नागाचा वेढा...
--- रावांना आवडतो केशरी पेढा.
(१०) वृंदावनात कृष्ण वाजवत होता बासरी
--- रावांनी आणली आणली मला ५ तोळ्याची सरी.
(११) जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजे मोक्ष
--- रावांचे नाव घेते, आहे कुलदेवतेची साक्ष.
(१२) खुप प्रसिद्ध आहेत कबीराचे दोहे
--- रावांना आवडतात कांदे पोहे.
(१३) अर्जुन व कृष्णाची प्रसिद्ध आहे जोडी...
--- रावांना आहे परमार्थाची गोडी.
(१४) महाभारतात एकलव्याची आहे गाथा...
--- राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवावा माथा.
(१५) कोल्हापूरची मिरची आहे झणझणीत...
--- रावांचा आवाज आहे खणखणीत.
(१६) कमळाभोवती भ्रमराचे गुंजन...
--- राव करतात हरीचे भजन.
(१७) आम्रतरूवर कोकिळेचे गुंजन...
--- राव करतात गणेशाचे पूजन.
(१८) राधा होती हरिभजनात तल्लीन...
--- राव म्हणतात आपण व्हावे ईश्वराशी लीन.
(१९) कृष्णाने केले कालीयामर्दन...
--- राव धरतात रामाचे चरण.
(२०) सर्व क्षेत्रात स्त्रीयांनी आपल्या कर्तुत्वाचा उमटवलाय ठसा
--- राव म्हणतात अविरत प्रयत्न करण्याचा तू घे वसा
(२१) गणेशाला प्रिय दूर्वांची जूडी...
--- रावांना आहे परमार्थाची गोडी.
(२२) संत जनाबाईने दळीता कांडीता विठ्ठलास आळविले...
--- रावांच्या चरणी मी जीवनपुष्प वाहिले.
(२३) श्रावणात दिसतो आकाशात इंद्रधनुष्य...
--- राव म्हणतात, प्रभू राम विश्वामित्राचे शिष्य.
(२४) हिरडा, आवळा, बेहडा याची असते आयुर्वेदात भरती..
--- रावांची राहू दे निरंतर किर्ती.