राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक !
राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.
त्यांनी अस्पृश्यांना (त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या) राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकर्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. ‘दलितांच्या सेवेसाठी मला छत्रपतींचे सिंहासन सोडावे लागले तरी पर्वा नाही’ अशी घोषणा त्यांनी केली होती. जातिभेदाला महाराजांचा तीव्र विरोध होता. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांनी बहुजन समाजाची पिळवणूक करणारी कुलकर्णी वतने रद्द केली, तसेच महार कुटुंबांना गुलाम करणारी महार वतनेही रद्द केली.१९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी १९१६ मध्ये निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली. ब्रह्मणेतर चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी महाराजांनी महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत दौरे काढून सभा घेतल्या. राजर्षी शाहूंना ब्रह्मणेतर चळवळीचे उद्गातेच म्हटले जाते. बहुजन समाजाला व (तत्कालीन) शूद्रातिशूद्रांना राजकीय सत्तेतही सन्मानपूर्वक सहभाग मिळावा यासाठी त्यांनी सक्रिय प्रयत्न केले. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला. हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन, अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. त्यांनी आपल्या कार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेलाच, शिवाय सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केले, पाठिंबाही दिला.
‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल’ची स्थापना, शाहुपुरी व्यापारपेठेची स्थापना, गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती, शेतकर्यांच्या सहकारी संस्थांची स्थापना, राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्यांना कर्जे उपलब्ध करून देणे असे उपक्रम त्यांनी आपल्या संस्थानात राबविले, कमालीचे यशस्वी केले. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रांत राजर्षींनी नवनवे प्रयोग केले. शेतीच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी संशोधनाला पाठिंबा दिला, नगदी पिके व तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यासाठी त्यांनी ‘किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ स्थापन केली.
राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला व लोककला या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले. यातून कलाकारांना राजाश्रय मिळालाच पण मुख्य म्हणजे या कलांचा विकास व विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात (व भारतातही) झाला. काही लेखक, संशोधक यांनाही त्यांनी प्रोत्साहनपर सहकार्य केले. त्यांनी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. युवकांमध्ये व्यायामाची आवड उत्पन्न होण्यासाठी त्यांनी आखाडे, तालमी यांना आर्थिक सहकार्य केले, तसेच कुस्तीला प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. कोल्हापूरला ‘मल्ल विद्येची पंढरी’ म्हटले जाते ते यामुळेच.
राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक व कृषी-सिंचन या सर्वच क्षेत्रांतील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉ. आंबेडकरांनी ‘सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ’ अशा समर्पक शब्दांत राजर्षी शाहूंचे वर्णन केले आहे. शाहू महाराजांच्या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना ‘राजर्षी’ ही पदवी बहाल केली.
अशा या द्रष्ट्या, पुरोगामी नेत्याचे ६ मे, १९२२ रोजी मुंबई येथे निधन झाले.