मराठी माणसाच्या मनात लावलेल्या स्वाभिमानाच्या वृक्षाचे रूपांतर महाराष्ट्र-विकासाच्या कल्पवृक्षात करणारे हिंदुहृदयसम्राट.
मातीच्या रंगाचं काळीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आयुष्याचं रणांगण करताना सार्थकतेचा आनंद होतो. पण, दुर्दैवानं लाचारीचं व्यसन लागलेले काही लोक मातीच्या ममतेहून सत्तेची महती महान मानायला लागतात. अशा वेळी कोणालाही सत्तेची स्वप्नं पडू लागतात. महाराष्ट्राची नेमकी हीच अवस्था झालेली असताना मातीच्या उद्धारासाठी सज्ज झालेल्या बाळ केशव ठाकरे नावाच्या तरुणाची एक गगनभेदी गर्जना महाराष्ट्राच्या मनावर आणि भारताच्या कानावर आदळली. उपर्यांची दादागिरी नष्ट झाली आणि महाराष्ट्र जागा झाला.
प्रबोधनाची परंपरा असणार्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार त्या काळात आपल्या लेखनातून, वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोकजागरणाची धुरा सांभाळत होते. प्रबोधनकार अन्यायकारक रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला.
सर्वप्रथम एक कलाकार म्हणून -एक व्यंगचित्रकार म्हणून- त्यांनी सामाजिक प्रश्र्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. १९५० मध्ये ते फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाईन या माध्यमातूनही काम करीत असत.
पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे साप्ताहिक (व्यंगचित्रात्मक) काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट, १९६० मध्ये ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. साप्ताहिकासाठीचे हे ‘मार्मिक’ नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचविले. मराठीतील हे पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. ‘मार्मिक’ च्या पहिल्या अंकाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. या समारंभास प्रा. अनंत काणेकरही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता, पण प्रामुख्याने मुंबईत मराठी माणसावर अन्याय होतच होता. या प्रश्र्नाला मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणार्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला. १९६० पासून ते आजतागायत राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत, तसेच इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर मराठी जनांना मार्गदर्शन करत ‘मार्मिक ’ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
महाराष्ट्रात निर्माण झालेले - मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे - व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही. त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला. हर हर महादेवची गर्जना मराठी माणसाच्या मनात पुन्हा एकदा घुमायला हवी आणि प्रत्येक मराठी माणसाने महाराष्ट्राचा स्वाभिमान मनात बाळगायला हवा यासाठी बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दु-विधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब. ही परिस्थिती बाळासाहेबांसारख्या सूक्ष्म निरीक्षकाने ओळखली. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे. हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला. यातूनच मराठी माणूस संघटित झाला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३०ऑक्टोबर,१९६६ रोजी शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला. या मेळाव्यास सुमारे ५ लाख लोकांनी गर्दी केली होती. या मेळाव्यापासूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची प्रचंड गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत शिवतीर्थावरून बाळासाहेब महाराष्ट्राला काय संदेश देतात याकडे जनतेचे, राजकीय नेत्यांचे, पत्रकारांचे, अभ्यासकांचे लक्ष असते.
वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हेदेखील बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. प्रबोधनकार ठाकरे व आचार्य अत्रे यांचा प्रभाव त्यांच्या लेखनात जाणवतो. शिवाय व्यंगचित्रकाराची वेधक - वेचक निरीक्षणदृष्टीही त्यांच्यामध्ये आहेच. ‘सामना’ हे केवळ शिवसेनेचे मुखपत्र नसून जिवंत महाराष्ट्रीय माणसाचा तो हुंकार आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. ‘सामना’ तील संपादक बाळ ठाकरे यांच्या अग्रलेखांची वाट पूर्ण महाराष्ट्र पाहत असतो.
प्रथम मुंबई - ठाणे यासारख्या शहरी भागातच लोकप्रिय असणारी शिवसेना हा-हा म्हणता ग्रामीण महाराष्ट्रातही झपाट्याने पसरत गेली. शिवसेनेने शहरी भागातील नगरसेवक पदे , महानगरपालिकांची महापौर पदे, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत - पंचायत समिती - जिल्हा परिषद स्तरावरील लोकप्रतिनिधित्व अशी सत्तापदे मिळवत सुरुवात केली. पुढील काळात स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब व भा.ज.प. चे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या मुत्सद्दीपणातून शिवसेना-भा.ज.प. युती आकाराला आली. तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौर्यांमुळे १९९५ मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले. हे महाराष्ट्रातील खर्या अर्थाने पहिले कॉंग्रेसेतर सरकार होते. हा सत्तांतराचा चमत्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच घडला.
महाराष्ट्राविषयीचा प्रखर अभिमान व मुंबईवरील प्रेम या विषयांसह हिंदुत्व या मुद्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोखठोकपणे मांडले. बॉंबस्फोट, देशविघातक कृत्ये घडवणार्या धर्मांधांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. मतपेटीचे राजकारण करत मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये. भारताला आपला देश मानणार्या राष्ट्रवादी मुस्लीम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही - असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले. या स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच हिंदुहृदयसम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेनाप्रमुखांमुळेच.
झुणका-भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बॉम्बे चे मुंबई असे नामकरण... अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेबांचीच. व्हॅलेंटाईन डे सारख्या संस्कृतीविघातक पाश्र्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतियांच्या विरोधातील तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही बाळासाहेबांचाच. बाळासाहेबांनी राजकारणात (सत्ताकारणात) जात या घटकाचा अजिबात विचार केला नाही. तसेच त्यांनी तरुणांच्या आकांक्षांना पंख लावले. त्यामुळेच अनेक जातीपातींच्या मराठी तरुणांना विविध सत्तापदे प्राप्त झाली, होत आहेत. हाच इतर पक्षांत व शिवसेनेत आणि इतर नेत्यांत व बाळासाहेबांमध्ये असलेला फरक होय.
जातीपातींचे राजकारण, सहकारी संस्था - साखर कारखाने स्थापन करून केलेले सत्ताकारण, कुटील राजकीय डावपेच असेमहाराष्ट्रातील परंपरागत राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही. तरुणांची मने महाराष्ट्राच्या अभिमानाने भारून टाकणे, जनतेच्या मनातील विचार नेमके ओळखून, त्यांची नाडी Hओळखून ते विचार एकमेवाद्वितीय अशा वक्तृत्व शैलीच्या साहाय्याने मांडणे आणि आक्रमक संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलने अंमलात आणणे - अशी कार्यपद्धती बाळासाहेबांनी अवलंबिली. मनोहर जोशी, सुधीर जोशी, कै. प्रमोद नवलकर, मधुकर सरपोतदार, छगन भुजबळ, सुरेश प्रभु, कै.आनंद दिघे, दत्ताजी नलावडे,.... असे असंख्य नेते बाळासाहेबांनी घडविले. शिवसेनेचे सध्याचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जडणघडणीतही अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांचाच मोठा वाटा आहे. स्वत: प्रत्यक्ष कोणतेही सत्तापद न भूषविता सत्ताकारणाला योग्य ती दिशा देणे ही राजकारणाची - सत्ताकारणाची पद्धतही खास बाळासाहेबांचीच.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.
मराठी असंतोषाचा उद्घोष व मराठी अस्मितेचा जयघोष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या हृदयात दोनच गोष्टी अखंडपणे तेवत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे शिवरायांचे कर्तृत्व आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आक्रमक, प्रेरणादायी असे वक्तृत्व व विचार.