मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांचे नाव घेतले जाते. त्यापूर्वी अध्यात्मात अडकून पडलेल्या, पौराणिक कथा -आख्यानांत रंगून जाणार्या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिले. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिले; कवितेला वास्तवतेचे भान दिले.
इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.
त्यांच्या एकूण फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यातून त्यांनी तोपर्यंत मराठीत कधीही न हाताळले गेलेले विषय- व्यक्तिगत स्नेहसंबंध, स्त्रीपुरुषांमधील प्रेमभावना, कवी व कवित्व, सामाजिक बंडखोरी, उदारमतवाद, मानवतावाद, राष्ट्रीय भावना, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, निसर्ग हे विषय- हाताळलेले दिसतात. ही स्वच्छंदतावादी मनोवृत्ती काव्यातून प्रथमत:च व्यक्त होत असल्याने त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या, तरीही क्रांतिकारक व प्रवर्तक ठरल्या. आज (वर उल्लेख केलेल्या) अनेक विषयांशी संबंधित कवितांचे प्रवाह मराठी साहित्यात दिसतात. या सर्व प्रवाहांचा मूळ स्रोत म्हणजे केशवसुतांची कविता होय.
आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता.त्यातही त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा तुतारी मंडळ स्थापन झाले होते. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे नावाजलेले कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.
त्यांच्या कवितांमधून सामाजिक दु:ख, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा हे विषय जसे आले, तसेच त्यांच्या कवितांमध्ये प्रेमभावनेचा प्रांजळ व नितळ अविष्कारही आलेला दिसतो. उदा. आपल्या पतीचे कुशल विचारणार्या पत्नीला ते म्हणतात ;
करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.
किंवा
आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते, प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे, डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.
अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.
काव्यविषयक दृष्टीकोन, कवितेचा आशय, तिचा अविष्कार या सार्याच बाबतीत क्रांती घडवणार्या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
त्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर ज्या तर्हेने भूमिका पार पाडत होते, तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे निश्चितपणे म्हणता येईल.