शतकातून एखादाच होणारा असा बंडखोर, निर्भीड, द्रष्टा व सिद्धहस्त नाटककार!
विजय तेंडुलकर हे मराठी नाव असलं तरी या नावानं मराठीपणाच्या सीमा केव्हाच ओलांडल्या आहेत. सामान्य माणसाच्या नि:शब्दतेला आवाज देणारा माणूस अशी बिरुदावली मिरवणार्या तेंडुलकरांनी भारतीय रंगभूमीच्या इतिहासातच नाही तर जागतिक रंगभूमीच्या इतिहासात स्वत:चं स्थान ठळक केलं. फार कमी भारतीय लेखकांना ही गोष्ट साध्य झाली आहे. त्यांची रंगभूमीवरची धगधगती कारकीर्द पाहिली की, खरंच प्रश्र्न पडतो, की तेंडुलकरांनी कशाच्या बळावर एवढा विस्मयकारी प्रवास केला असावा?
विजय धोंडोपंत तेंडुलकर असं साधं, सरळ नाव धारण करणार्या या माणसाकडं ना लौकिक शिक्षणाची शिदोरी होती, ना लेखनाचा कौटुंबिक वारसा! पण हा माणूस जीवनाच्या शाळेत मात्र भरपूर शिकला आणि जे शिकलं, जे अनुभवलं ते लेखनात उतरवत गेला. त्यामुळेच तेंडुलकर नाटकाला वास्तव पातळीवर आणून, मानवी जीवनातील विविध स्तर लेखनातून उलगडून दाखवू शकले.
जीवनाच्या शाळेत शिकत असतानाच तेंडुलकरांना त्यांचे अभ्यासविषय मिळत गेले. त्यातही माणसाचं जगणं हा त्यांचा अधिक जिव्हाळ्याचा विषय. विषयाच्या या वेगळेपणानंच त्यांना वैश्विक पातळीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या मते लेखन हे जगण्यातून येतं. त्यामुळे जगणं महत्त्वाचं!
त्यांचं लिखाण कधी एखाद्या परंपरागत पठडीत अडकलं नाही. त्यांनी आपल्या लेखनातून कधी एखादा सामाजिक प्रश्र्न हातळला नाही की, कधी एखाद्या घडून गेलेल्या घटनेचा तपशील दिला नाही. त्यांच्या लेखनाचा मध्यबिंदू होता मानवी स्वभाव आणि मानवी जीवन! मानवी स्वभावाचे आयाम त्यांच्या ‘गिधाडे’ आणि ‘सखाराम बाईंडर’ मध्ये हिंसेचं रूप घेऊन येतात, तर ‘घाशीराम कोतवाल’ मध्ये प्रच्छन्न लैंगिकतेचं रूप घेऊन येतात. खोट्या साधनशूचितेला लक्ष्य करणार्या ‘शांतता! कोर्ट चालू आहे’ मध्ये तेंडुलकर समाजमनाचा एक वेगळाच पैलू आपल्यासमोर मांडतात.
मराठी नाटकांना नवतारुण्य प्रदान करणारा नाटककार म्हणून तेंडुलकरांना गौरवले जाते. त्यांचे कथाविषय धाडसी होते आणि ते त्यांनी तितक्याच निर्भिडपणे समाजासमोर मांडले. त्या अर्थाने ते काळाच्या खूप पुढे होते. चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी हाताळलेले विषय आजच्या परिस्थितीलाही तंतोतंत लागू पडतात, आणि हीच गोष्ट त्यांचे द्रष्टेपण सिद्ध करते. १९५५ च्या सुमारास संगीत नाटकांच्या साखर झोपेत असणारी प्रेक्षकमंडळी तेंडुलकरांच्या नाटकांनी हादरली. त्या वेळच्या रसिक प्रेक्षकांनीच नाही, तर समीक्षकांनीही तेंडुलकरांवर भरपूर तोंडसुख घेतले. त्यांच्या याच नाटकांमुळे नंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धनी झालेल्या तेंडुलकरांना त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मात्र विखारी टीकेला सामोरे जावे लागले. समाजाकडून झालेल्या या अवहेलनेवर तेंडुलकरांची प्रतिक्रिया बोलकी आणि त्यांच्या लेखनाचा हेतूच स्पष्ट करणारी होती. ते म्हणतात की,माझी लेखनाची गरज मला माझ्यासारखं लिहू द्यावं एवढीच होती. ‘लिहिणं’ ही माझी गरज होती. त्यामागे कुणाचं बरं-वाईट करावं, कशाला वळण द्यावं असला काहीही हेतू नव्हता.
काय खपणार आहे, याचा विचार तेंडुलकरांनी लिहिताना कधीच केला नाही. यापेक्षा सध्या समाजमनाला कोणत्या विचारांची गरज आहे आणि त्यादृष्टीने मानवी सहवेदना कशा प्रकारे सादर करायची आहे, याचे तारतम्य त्यांनी कायमच राखले. म्हणूनच भारतीय रंगभूमीच्या इतिहासातील ते एक सर्वोत्कृष्ट नाटककार ठरले. तेंडुलकरांनी आपल्या वैचारिक बंडखोरीने नाटकातील निव्वळ आशायाच्याच चौकटी मोडल्या नाहीत तर पटकथा, संवाद, नेपथ्य यांनाही ‘नवी भाषा’ दिली.
तेंडुलकरांच्या नाटकाची भाषा हा तर एक स्वतंत्र अभ्यासविषयच आहे. अत्यंत साध्या आणि नेटक्या भाषेतून त्यांचा कथाविषय उलगडत जातो. ही भाषा ऐकायला आणि वाचायला सोपी वाटली, तरी विलक्षण गुंतागुंतीच्या भावना व्यक्त करते. त्यांचे नेमके शब्द अपेक्षित परिणाम साधतात. शब्दरचना एवढी नेमकी व परिपूर्ण की, एकही शब्द अधिक-उणा करता येणार नाही. त्यांच्या भाषेला एक लय आहे, पण म्हणून ती पद्यात्मक नाही, उलट प्रसंगी अतिशय गद्य आणि वास्तव आहे. त्यांच्या चित्रपटाच्या पटकथा आणि नाटकं पाहण्याइतकीच वाचनीयही आहेत. ती वाचताना त्यांची या माध्यमावरची पकड आपल्याला अवाक करते. त्यांच्या नाटकांना दिग्दर्शकाची गरजच भासणार नाही अशी त्यांची रचना असे. काय करायचे आहे याचा सर्व तपशील कंसांत दिलेला. कंसात दिलेल्या या सूचना नटाला मार्गदर्शन तर करतातच, पण त्या कथेचा अविभाज्य भाग असतात आणि कथेचा ओघ पुढे नेण्यास साहाय्य करतात. थोडक्यात, तेंडुलकरांनी नाटक सादर करण्याची, लिहिण्याची आणि चित्रपट कथांचीही भूमिती बदलून टाकली.
तेंडुलकरांची बाह्य प्रतिमा जितकी शांत आणि मितभाषी होती, तितकीच त्यांची नाटके दाहक आणि वास्तव होती. ‘हिंसा’ त्यांच्या चिंतनाचा विषय होता. हिंसा माणसामध्ये उपजतच असते असं त्यांचं मत होतं. त्यांच्या सर्वच नाटकांतून आपल्याला हिंसेचे विविध आविष्कार पाहायला मिळतात.
तेंडुलकरांनी आपल्या लिखाणातून मानवी मनाच्या कुरुपतेचं वर्णन केलं असलं, तरी प्रत्यक्ष जीवनात ते कमालीचे सकारात्मकहोते. याचं स्पष्टीकरण देताना ते एके ठिकाणी म्हणतात की, स्वत:चं आयुष्य जगताना आणि दुसर्यांचं अनुभवताना जे बोलायचं होतं, सांगायचं होतं, ते लेखनातून व्यक्त होत गेलं. गरजेतून जशा वाटा सापडतात, तशीच ही लेखनाची वाट मला अनाहूतपणे मिळाली.
आपल्या लिखाणातून समाजमनाचा वेध घेणार्या या लेखकाचा पिंडही सामाजिकतेचा होता. त्यांच्या मनाचा ओढा चळवळींकडेहोता. नर्मदा बचाव आंदोलन, ग्रंथालीसार‘या सांस्कृतिक चळवळी, विचार स्वातंत्र्य मानणार्या चळवळी, रंगभूमीवरचे वेगवेगळे प्रयोग यात त्यांनी कायमच सक्रिय पुढाकार घेतला. काही काळ ते सेवादलाचे कार्यकर्तेही होते. त्यांच्या विचारातील ही कृतिशील सामाजिकता व व्यापकताच त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर नेऊन ठेवत असे.
तेंडुलकरांनी मराठी नाटकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलं हे तर खरंच, पण ते केवळ नाटककार नव्हते तर उत्कृष्ट दर्जाचे समीक्षक आणि दर्दी रसिकही होते. ते सौंदर्यवादी होते आणि आयुष्यभर लहान-सहान गोष्टीतले सौंदर्य टिपतच जगले. अभिजात कलागुणांचे ते चाहते होतेच, पण विशेष म्हणजे नवविचारांचे आणि आयुष्यातील सर्व प्रकारच्या नवतेचे चाहते होते.अशा विचारांचे, साहित्याचे, कलेचे आणि ती निर्माण करणार्या कलाकारांचे त्यांनी कायम स्वागतच केले.
जानेवारी, १९२८ मध्ये कोल्हापूर येथे जन्मलेल्या तेंडुलकरांचं शिक्षण दहावीपर्यंतच झालं. पण शाळेचं आणि महाविद्यालयाचं शिक्षण नसतानाही माणूस काय पराक्रम करू शकतो, हे त्यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं. १९४८ साली त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. पण त्यांच्या लेखनाला खरा बहर आला १९५५ नंतर. कारकीर्दीच्या सुरुवातीला काही काळ त्यांनी पत्रकारिता केली. सुरुवातीचा काही काळ लोकसत्तामध्ये सहसंपादक म्हणून काम केलं, तर पुढे काही काळ मराठा, नवयुग साप्ताहिक, वसुधा मासिक इथेही नोकरी केली. १९७८-८१ च्या दरम्यान त्यांनी टाटा समाज विज्ञान संस्थेत अध्यापनाचेही काम केले.
आज जगात असा एकही रंगमंच नसेल जिथं तेंडुलकरांची नाटकं झालेली नाहीत. त्यांच्या नाटकांचे आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केले जातात आणि भले-भले नट त्यातून काम करण्यात धन्यता मानतात. हे सर्व पाहिल्यावर वाटतं की, तेंडुलकर मराठी होते हे आपलं भाग्य म्हणावं लागेल.
तेंडुलकरांना मिळालेले मान-सन्मान -
- १९८४ - पद्मभूषण.
- १९७१ - संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार.
- १९९१ - कालिदास पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार.
- कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा पहिला जनस्थान पुरस्कार.
- `अर्धसत्य' - पटकथा लेखनाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार.
- `आक्रोश' - पटकथा आणि संवादाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार.
- ‘देशातील वाढता हिंसाचार’ यावर अभ्यास करण्यासाठी नेहरू शिष्यवृत्ती प्रदान.