इटली पहिल्या मोहिमेमुळे नेपोलियनचा दरारा वाढला. या मोहिमेनंतर त्याचे नाव ला पेटीट कापोरल (छोटा कार्पोरल) त्याच्या छोट्या चणीमुळे व युद्धभूमीवरील त्याच्या शौर्यामुळे पडले खासकरुन आर्कोल च्या पुलावरील लढाईत त्याने दाखवलेले शौर्याने संपुर्ण फ्रेंच सेना प्रेरित झाली व अक्षरशः पराभवाच्या खाईतुन विजयश्री खेचुन आणली. त्याने वाटेमध्ये लोबार्डि येथे ऑस्ट्रियन्स चा पराभव केला. व पुढे इटली मध्ये रोम पर्यंत जाउन धडकला व फ्रेंच राज्य कर्त्यांच्या आदेशाविरुद्ध जाउन त्याने पोपला राज्यकारभारतुन निलंबित केले. त्यानंतर १७९७ च्या सुरुवातीला ऑस्ट्रियावर हल्ला चढवला व त्यांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे इटलीच्या उत्तर भागावर पुर्णपणे फ्रेंचाचे वर्चस्व स्थापन झाले. त्यानंतर व्हेनिस वर आक्रमण करून त्यांना शरण येण्यास भाग पाडले व व्हेनिसची हजार वर्षे चालत आलेला एकछत्री अंमल संपुष्टात आणला. १७९७ च्या अंतापर्यंत नेपोलियन ने अनेक छोटे मोठे भाग फ्रेंच हद्दीत आणले. अश्या प्रकारे इटलीच्या मोहिमेने नेपोलियनची युरोपवर सद्दी चालु झाली ज्याचा प्रभाव संबध युरोपवर पुढील दीड दशक राहिला.
नेपोलियनने या मोहिमेने दोन मुख्य गोष्टी साध्य केल्या त्या म्हणजे सैन्यामध्ये नेपोलियन या नावाची जादुई पकड व अनेक राज्ये काबीज केल्यामुळे फ्रेंच राज्यकारभारात वरचष्मा.