॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां पूर्वकथेची संगती । स्मरणपूर्वक आणूं चित्तीं । देउळाच्या जीर्णोद्धाराथा । कैसी प्रीति बाबांस ॥१॥
परोपकारार्थ कैसे श्रमत । कैसे निजभक्तां सांभाळीत । कैसा निजांगें देह झिजवीत । दु:खेंही सोशीत भक्तांचीं ॥२॥
समाधीसमवेत खंडयोग । धोती पोती इत्यादि प्रयोग । कदा करपदशिरवियोग । कदा संयोग पूर्ववत् ॥३॥
हिंदू म्हणतां दिसत यवन । यवन म्हणतां हिंदू सुलक्षण । ऐसा हा अवतार विलक्षण । कोण विचक्षण वर्णील ॥४॥
जात हिंदू कीं मुसलमान । थांग न लागला अणुप्रमाण । उभय वर्गां समसमान । जयांचें वर्तन सर्वदा ॥५॥
रामनवमी हिंदूंचा सण । करवीतसे स्वयें आपण । सभामंडपीं पाळणा बांधवून । कथा कीर्तन करवीत ॥६॥
चौकांत सन्मुख लागे पाळणा । करवूनि घेती रामकीर्तना । तेचि रात्रीं संदल मिरवणा । अनुज्ञा यवनांही देत ॥७॥
जमवूनि जमतील तितुके यवन । समारंभें संदल - मिरवण । उभय उत्सव समसमान । घेत करवून आनंदें ॥८॥
येतां रामनवमीचा दिवस । कुस्त्या लावण्याची हौस । घोडे तोडे पगडया बक्षीस । अति उल्हास द्यावया ॥९॥
सण गोकुळ अष्टमी आला । करवूनि घेती गोपाळकाला । तैसीच ईद येतां यवनांला । निमाजाला अटक ना ॥१०॥
एकदां आला मोहरमाचा सण । आले मशिदीस कांहीं यवन । म्हणती एक ताजा बनवून । करूं मिरवण ग्रामांत ॥११॥
आज्ञेसरसा ताजा झाला । चार दिवस ठेवूंही दिधली । पांचवे दिवशीं खालीं खालीं काढिला । नाहीं मनाला सुख दु:ख ॥१२॥
अविंध म्हणतां विंधित कान । हिंदू म्हणतां सुंता प्रमाण । ऐसा ना हिंदू ना यवन । अवतार पावन साईंचा ॥१३॥
हिंदू म्हणावें जरी तयांस । मशिदींत सदा निवास । यवन म्हणावें तरी हुताश । अहर्निश मशिदींत ॥१४॥
मशिदींत जात्याचें दळण । मशिदींत घंटाशंखवादन । मशिदींत अग्निसंतर्पण । मुसलमान कैसे हे ॥१५॥
मशिदींत सदैव भजन । मशिदींत अन्नसंतर्पण । मशिदींत अर्घ्य - पाद्य - पूजन । मुसलमान कैसे हे ॥१६॥
म्हणावी जरी म्लेंच्छ जाती । ब्राम्हाणोत्तम पूजन करिती । अग्निहोत्री लोटांगणीं येती । त्यागूनि स्फीती सोंवळ्याची ॥१७॥
ऐसे जन विस्मित चित्तीं । पाहूं येती जे जे प्रचीती । तेही तैसेचि आपण वर्तती । मूग गिळिती दर्शनें ॥१८॥
तरी जो सर्वदा हरीसी शरण । त्या काय म्हणावें हिंदू वा यवन । असो शूद्र अतिशूद्र यातिविहीन । जाती न प्रमाण अणुमात्र ॥१९॥
नाहीं जयासी देहाभिमान । असो हिंदू वा मुसलमान । सकल वर्णां समसमान । तया न भिन्नपण जातीचें ॥२०॥
फकीरपंक्तीसी मांसभोजन । अथवा यद्दच्छा मत्स्यसेवन । तेथेंचि तोंड घालितां श्वान । विटे न मन जयाचें ॥२१॥
चालू वर्षाचा धान्याचा सांठा । कृषीवल करितो बांधोनि मोटा । कीं पुढील सालीं आलिया तोटा । वेळीं पुरवठा होईल ॥२२॥
तैसें संग्रहीं गव्हांचें पोतें । दळाया मशिदींत असे जातें । पाखडावया सूपही होतें । न्य़ून नव्हतें संसारास ॥२३॥
सभामंडपीं शोभायमान । सुंदर खासें तुलसीवृंदावन । तेथेंचि एक लांकडी स्यंदन । अति सुलक्षण कांतीव ॥२४॥
होतें कांहीं पुण्य गांठीं । तेणें या सद्वस्तूची झाली भेटी । ऐशी द्दढ सांठवा ह्रदयसंपुटीं । पडेना तुटी आमरणान्त ॥२५॥
कांहीं पूर्वाजिंत सभाग्यता । तेणें हे पाय आले हाता । मनासी लाभली शांतता ॥ निश्चिंतताही प्रपंचीं ॥२६॥
पुढें कितीही सुखसंपन्न । झालों तरी तें सुख न ये परतोन । जें श्रीसाईसमर्थसमागमजन्य । भोगितां धन्य झालों मी ॥२७॥
स्वानंदैकचिद्धन साई । काय वानूं त्याची नवलाई । जो जो रतला तयाच्या पायीं । तो तो ठायींच बैसविला ॥२८॥
अजिन - दंडधारी तापसी । हरिद्वारादि तीर्थवासी । तडी तापडी संन्यासी । त्यागी उदासी बहु येती॥२९॥
बोले चाले हंसे उदंड । जिव्हेस ‘अल्लामालीक’ अखंड । नावडे वाद किंवा वितंड । निकट दंड सर्वदा ॥३०॥
तापस वृत्ति शमी दान्त । वाचा स्रवे पूर्ण वेदान्त । कोणाही न लागला अंत । अखेर पर्यंत बाबांचा ॥३१॥
राव असो वा रंक । समसाम्य सकळां निष्टंक । लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक । उभयांसी एकचि माप तेथें ॥३२॥
कोणाचें बरें वाईट कर्म । जाणतसे जिवाआंतुलें मर्म । सांगूनि देत खूण वर्म । आश्चर्य परम भक्तांना ॥३३॥
जाणपणाचें तें सांठवण । नेणतपणाचें पांघरूण । मानसंपादन जयासी शीण । एवं लक्षण श्रीसाई ॥३४॥
काया जरी मानवाची । करणी अपूर्व देवाची । शिरडींत प्रत्यक्ष देव तो हाचि । भाविती हेंचि जन सारे ॥३५॥
काय बाबांचे चमत्कार । किती म्हणून मी वर्णूं पामर । देवा-देउळांचेही जीर्णोद्धार । बाबांनीं अपार करविले ॥३६॥
शिरडीस तात्या पाटिला हातीं । शनी-गणपती-शंकरपार्वती । ग्रामदेवी आणि मारुती । यांचीही सुस्थिति लाविली ॥३७॥
लोकांपासूनि दक्षिणामिषें । घेत असत बाबा जे पैसे । कांहीं धर्मार्थ वांटीत जैसे । कांहीं तैसेचि ते देत ॥३८॥
कोणासी रोज रुपये तीस । कोणासी दहा, पंधरा पन्नास, । ऐसें मन मानेल तयांस । वांटीत उल्हासवृत्तीनें ॥३९॥
हा तों सर्व धर्माचा पैसा । घेणारासही पूर्ण भरंवसा । विनियोगही व्हावा तैसा । हीच मनीषा बाबांची ॥४०॥
असो कित्येक दर्शनें पुष्ट । कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट । कित्येकांचे गेले कुष्ट । पावले अभीष्ट कितीएक ॥४१॥
न घालितां अंजन पाला रस । कितीक अंध झाले डोळस । आले पाय कितीक पंगूंस । केवळ पायांस लागतां ॥४२॥
महिमा तयांचा अनिवार । कोणा न लागे तयांचा पार । यात्रा येऊं लागली अपार । अपरंपार चौंबाजूं ॥४३॥
धुनीनिकट तेचि स्थानीं । मलमूत्रातें विसर्जूनी । कधीं पारोसें कधीं स्नानीं । नित्य ध्यानीं निरत जे ॥४४॥
डोईस सफेत पागोटें खासें । स्वच्छ धोतर लावीत कासे । अंगांत सदरा कीं पैरण असे । पेहराव ऐसा आरंभीं ॥४५॥
आरंभीं गांवीं वैद्यकी करीत । पाहूनि पाहूनि दवा देत । हातालाही यश बहुत । हकीम विख्यात जाहले ॥४६॥
एकदां एका भक्ताचे डोळे । सुजूनि झाले लाल गोळे । रक्तबंबाळ दोनी बुबुळें । वैद्य न मिळे शिरडींत ॥४७॥
भक्त बिचारे भाविक भोळे । बाबांसी दाखविते झाले डोळे । बिबे ठेंचूनि करविले गोळे । सत्वर ते वेळे बाबांनीं ॥४८॥
कोणी घालील सुरम्याच्या काडया । कोणी गाईच्या दुधाच्या घडया । कोणी शीतळ कापुराच्या वडया । देईल पुडया अंजनाच्या ॥४९॥
बाबांचा तो उपायचि वेतळा । स्वहस्तें उचलिला एकेक गोळा । चिणूनि भरला एकेक डोळा । फडका वाटोळा वेष्टिला ॥५०॥
उदय़ीक डोळ्यांची पट्टी सोडिली । वरी पाण्याची धार धरिली । सूज होती ती सर्व निवळली । बुबुळें जाहलीं निर्मळ ॥५१॥
डोळ्यासारिखा नाजूक भाग । नाहीं बिब्याची झाली आग । बिब्यानें दवडिला नेत्ररोग । ऐसे अनेक अनुभव ॥५२॥
धोती पोती तयां अवगत । नकळत एकान्तस्थळीं जात । स्नान करितां आंतडी ओकीत । धुऊनि टाकीत वाळावया ॥५३॥
मशिदीहूनि जितुका आड ॥ तितुकेंचि पुढें वडाचें झाड । तयाहीपलीकडे एक आड । दों दिवसांआड जात ते ॥५४॥
भर दुपारीं प्रखर ऊन । कोणी न तेथें ऐसें पाहून । स्वयें आडांतूनि पाणी काढून । मुखमार्जन करीत ॥५५॥
असो ऐशिया एका प्रसंगीं । बैसले असतां स्नानालागीं । आंतडी काढूनि लागवेगीं । धुऊं ते जागीं लागले ॥५६॥
अजा मारितां तिची आंतडी । बाह्याभ्यंतर करूनि उघडी । धुऊनि घालिती घडीवर घडी । निर्मळ चोखडी करितात ॥५७॥
तैसीच आपुली आंतडी काढूनी । आंतून बाहेर स्वच्छ धुऊनी । पसरली जांबाचे झाडावरूनी । आश्चर्य जनीं बहु केलें ॥५८॥
ज्यांहीं ही स्थिति डोळां देखिली । त्यांतील कांहीं हयात मंडळी । आहेत अजूनि शिरडींत उरली । म्हणती वल्ली तों अपूर्व ॥५९॥
कधीं लावीत खंडयोग । करीत ह्स्तपादादि विलग । ऐसे मशिदींत जागोजाग । अवयव अलग ते पडत ॥६०॥
देह ऐसा खंड विखंड । देखावा तो भयंकर प्रचंड । पाहूं धांवत लोक उदंड । बाबा अखंड त्यां दिसती ॥६१॥
पाहूनि एकदां ऐसा प्रकार । पाहणारा घाबरला फार । कोणा दुष्टें बाबांस ठार । केलें अत्याचार हा ॥६२॥
मशिदींत ठिकठिकाणीं । अवयव दिसती चारही कोनीं । रात्र मध्यान्ह जवळी न कोणी । चिंता मनीं उद्भवली ॥६३॥
जावें कोणासी सांगावयाला । होईल उलट टांगावयाला । ऐसा विचार पडला तयाला । जाऊनि बैसला बाहेर ॥६४॥
असेल साईचा हा योग कांहीं । हें तों तयाच्या स्वप्नींही नाहीं । पाहोनि छिन्नभिन्नता ही । भीति ह्रदयीं धडकली ॥६५॥
कोणासी तरी कळवावा प्रकार । मनांत त्याचे येई फार । परी मीच ठरेन गुन्हेगार । प्रथम खबर देणारा ॥६६॥
म्हणूनि कोणीसी सांगवेना । येत मनांत असंख्य कल्पना । म्हणूनि पहांटे जाऊनि पुन्हां । पहातां मना विस्मित ॥६७॥
अद्दश्य पूर्वील सर्व प्रकार । बाबा कुशलस्थानीं स्थिर । हें स्वप्न नाहींना ऐसा विचार । येऊनि पहाणार साश्चर्य ॥६८॥
हे योग हे धोतीपोती । बाळपणापासूनि आचरती । कोणा न कळे ती अगम्यगति । योगस्थिति तयांची ॥६९॥
दिडकीस नाहीं कोणाच्या शिवले । गुणानें प्रख्यातीतें पावले । गरीब दुबळ्यांस आरोग्य दिधलें । हकीम गाजले ते प्रांतीं ॥७०॥
हकीम हा तों केवळ परार्था । अति उदास तो निजस्वार्था । साधावया परकीयार्था । असह्यानर्था साहतसे ॥७१॥
ये अर्थींची अभिनव कथा । निवेदितों मी श्रोतियांकरितां । विदित होईल बाबांची व्यापकता । तैशीच दयार्द्रता तयांची ॥७२॥
सन एकोणीसशें दहा सालीं । समय धनतेरस दिवाळी । बाबा सहज धुनीजवळी । बैसले जाळीत लाकडें ॥७३॥
प्रखर तेवली होती धुनी । निजहस्त त्यांतचि खुपसुनी । बाबा बैसले निश्चिंत मनीं । हात भाजूनि निघाला ॥७४॥
माधव नामें तयांचा सेवक । लक्ष गेलें तयाचें साहजिक । देशपांडेही होते नजीक ॥ तेही तात्कालिक धांवले ॥७५॥
जाऊनि मागें मारूनि बैसका । कंबरेसी घट्ट घातला विळखा । बाबांसी मागें ओढोनि देखा । पुसती विलोका मग काय ॥७६॥
हाहा देवा हें काय केलें । म्हणतां बाबा ध्यानावर आले । "एक पोर रे खांकेचें म्हणती निसटलें । भट्टींत पडलें एकाकी ॥७७॥
ऐकूनि निजपतीच्या हाके । लोहाराची रांड रे धाके । मारूनि आपुल्या पोरासी खांके । भाता फुंके भट्टीचा ॥७८॥
फुंकतां फुंकतां लक्ष चुकली । खांकेसी पोर हें ती विसरली । पोर ती अचपळ तेथूनि निसटली । पडतांचि उचलली मीं शामा ॥७९॥
काढावयासी त्या पोरीला । गेलों तों हा प्रकार घडला । भाजूं दे रे हा हात मेला । प्राण रे वांचला पोरीचा" ॥८०॥
आतां या हाताचें दुखणें । कैसा उपाय करावा कवणें । चांदोरकरांसी पत्र घालणें । माधवरावानें ठरविलें ॥८१॥
पत्र लिहिलें सविस्तर । ‘परमानंद’ प्रसिद्ध डॉक्टर । समवेत घेऊनियां सत्वर । आले चांदोरकर शिरडीस ॥८२॥
उपयोगा पडती दाहोपशमना । ऐशीं घेतलीं औषधें नाना । परमानंदसमवेत नाना । साईचरणा पातले ॥८३॥
करुनि बाबांसी अभिवंदन । पुसती कुशल वर्तमान । निवेदिलें आगमन-प्रयोजन । हस्तावलोकन प्रार्थिलें ॥८४॥
आधींच हात पोळल्यापासून । भागोजी शिंदा तूप चोळून । पट्टया बांधीतसे करकरून । पान बांधून प्रत्यहीं ॥८५॥
तो हात सोडोनियां पहावा । परमानंदांसी दाखवावा । दवा उपचार सुरू करावा । गुण पडावा बाबांना ॥८६॥
ही सदिच्छा धरुनि मनीं । बहुत ननांनीं केली मनधरणी । प्रयत्नही केला परमानंदानीं । पट्टया सोडूनि पहावें ॥८७॥
आज उद्या आज उद्यां करूनी । वैद्य आपुला अल्ला म्हणूनी । ह्स्त न दिधला पहावयालागूनी । खेदही न मनीं तयाचा ॥८८॥
परमानंदाचा आणिलेला दवा । तया न लागली शिरडीची हवा । परी साईदर्शनसुहाव । तयां घडावा योग हा ॥८९॥
भागोजीचीच नित्य सेवा । भागोजीनेंच हात चोळावा । तेणें काळें हातही बरवा । होऊनि सर्वां सुख झालें ॥९०॥
ऐसा जरी हात बरा झाला । न कळे बाबांसी येई काय दुकळा । ती प्रात:काळची येतां वेळा । पट्टयांचा सोहळा प्रतिदिनीं ॥९१॥
नसतां हातास कांहींही वेदना । नित्य निष्कारण तयाची जोपासना । घृतमर्दन निष्पीडन जोपासना । आमरणान्त चालविली ॥९२॥
ही उपासना भागोजीची । साईसिद्धा न आवश्यकता जीची । भागोजीस घडविती नित्यनेमाची । भक्तकाजाची आवडी ॥९३॥
पूर्वजन्मींचे महादोष । भागोजी पावला कुष्ट - क्लेश । परी तयाचें ,भाग्य विशेष । साईसहवास लाधला ॥९४॥
लेंडीवरी निघतां फेरी । भागोजी बाबांचा छत्रधारी । रक्तपिती भरली शरीरीं । परी सेवेकरी प्रथम तो ॥९५॥
धुनीपासले स्तंभापाशी । बाबा जेव्हां प्रात:समयासी । प्रत्यहीं बैसत निजारामासी । हजर सेवेसी तैं भाग्य ॥९६॥
हातापायांच्या पट्टया सोडणें । त्या त्या ठायींचे स्नायू मसळणें । मसळल्या ठायीं तूप चोळणें । सेवा करणें भाग्यानें ॥९७॥
पूर्वजन्मींचा महापापिष्टा । सर्वांगीं भरलें रक्तकुष्ट । भागोजी शिंदा महाव्याधिष्ट । परी भक्त वरिष्ठ बाबांचा ॥९८॥
रक्तपितीनें झडलीं बोटें । दुर्गंधीनें सर्वांग ओखटें । ऐसें जयाचें दुर्भाग्य मोठें । भाग्य चोखटें सेवासुखें ॥९९॥
किती म्हणूनि श्रोतयांला । वर्णूं बाबांच्या अगाध लीला । एकदां गांवीं ग्रंथिज्वर आला । चमत्कार झाला तो परिसा ॥१००॥
दादासाहेब खापडर्यांचा । मुलगा एक लहान वयाचा । आनंद साईसवासाचा । निजमातेच्या सह भोगी ॥१०१॥
आधींचि तो मुलगा लहान । ताप आला फणफणून । मातेचें ह्रदय आलें उलून । अस्वस्थमन जाहली ॥१०२॥
उमरावती वसतिस्थान । आलें मनीं करावें प्रस्थान । सायंकाळची वेळ साधून । आली आज्ञापन घ्यावया ॥१०३॥
अस्तमानची करितां फेरी । बाबा येतां वाडियाशेजारीं । बाई जाऊनि पाय धरी । निवेदन करी घडलें जें ॥१०४॥
आधींच स्त्रियांची जात घाबरी । तशांत मुलाची थांबेना शिरशिरी । ग्रंथिज्वराची भीतीही भारी । निवेदन करी घडलें तें ॥१०५॥
बाबा म्हणती मृदु वचन । "आभाळ आलें आहे जाण । पडेल पाऊस पीक पिकोन । आभाळ वितळून जाईल ॥१०६॥
भितां किमर्थ" ऐसें वदून । कफनी कंबरेपर्यंत उचलून । दाविते झाले सकळांलागून । ग्रंथी टवटवून उठलेल्या ॥१०७॥
कुक्कुटीच्या अंडयांएवढे । चार ग्रंथी चोहींकडे । म्हणतीं "पहा हें भोगणें पडे । तुमचें सांकडें मजलागीं" ॥१०८॥
हें दिव्य आणि अलौकिक । कर्म पाहोनि विस्मित लोक । भक्तांलागीं दु:खेंही कैक । भोगिती अनेक संत कैशीं ॥१०९॥
मेणाहूनि मऊ चित्त । सबाह्य जैसें नवनीत । लाभेंवीण भक्तांसी प्रीत । भक्तचि गणगोत जयाचें ॥११०॥
एकदां ऐसा वर्तला प्रकार । नानासाहेब चांदोरकर । निघाले सोडूनि नंदुरबार । पंढरपुरासी जावया ॥१११॥
नाना परम भाग्यशाली । साईंची अनन्य सेवा फळली । भूवैकुंठप्राप्ति घडली । मामलत मिळाली तेथील ॥११२॥
येतांचि हुकूम नंदुरबारीं । जाणें होतें अति सत्वरीं । तांतडीनें केली तयारी । हेतु अंतरीं दर्शनाचा ॥११३॥
सहकुटुंब सहपरिवार । शिरडीसी जाण्याचा झाला विचार । शिरडीच प्रथम पंढरपुर । करूं नमस्कार बाबांसी ॥११४॥
नाहीं कोणासी पत्र पाठविलें । नाहीं निरोप वृत्त कळविलें । सरसामान सर्व आवरिलें । गाडींत बैसले लगबगां ॥११५॥
ऐसे जे हे नाना निघाले । नसेल शिरडींत कोणासी कळलें । परी साईंसी सर्व समजलें । सर्वत्र डोळे तयांचे ॥११६॥
नाना निघाले सत्वर । असतील निमगांवाचे शिंवेवर । तों शिरडींत चमत्कार । घडला साचार तो परिसा ॥११७॥
बाबा होते मशिदींत । म्हाळसापतीसमवेत । आपा शिंदे काशीराम भक्ता । वार्ता करीत बसलेले ॥११८॥
इतुक्यांत बाबा म्हणती अवघे । मिळूनि करूंया भजन चौघे । उघडले पंढरीचे दरवाजे । भजन मौजेनें चालवूं ॥११९॥
साई पूर्ण त्रिकालज्ञाता । कळूनि चुकली तयां ही वार्ता । नाना शिंवेच्या ओढयासी असतां । भजनोल्लासता बाबांसी ॥१२०॥
(भजन)
"पंढरपुरला जायाचें जायाचें । तिथेंच मजला राह्याचें ।
तिथेंच मजला राह्याचें राह्याचें । घर तें माझ्या रायाचें ॥"
स्वयें बाबा भजन म्हणती । भक्त बसलेले अनुवाद करिती । पंढरीचे प्रेमांत रंगती । इतक्यांत येती नानाही ॥१२१॥
सहकुटुंब पायीं लागत । म्हणती आतां आम्हांसमवेत । महाराजांनीं पंढरपुरांत । निवांत निश्चिंत बैसावें ॥१२२॥
तों ही विनंती नकोचि होती । आधींचि बाबांचि उल्हासवृत्ति । पंढरीगमन भजनस्थिति । जन निवेदिती तयांसी ॥१२३॥
नाना मनीं अति विस्मित । लीला पाहूनि आश्चर्यचकित । तयां पायीं डोई ठेवीत । सद्नदित जाहले ॥१२४॥
घेऊनियां आशीर्वचन । उदी प्रसाद मस्तकीं वंदून । चांदोरकर पंढरपुरालागून । निरोप घेऊन निघाले ॥१२५॥
ऐशा गोष्टी सांगूं जातां । होईल ग्रंथविस्तारता । म्हणऊनि आतां परदु:ख-निवृत्तिता । विषय आटोपता घेऊं हा ॥१२६॥
संपवूं हा अध्याय आतां । अंत नाहीं बाबांचे चरिता । पुढील अध्यायीं अवांतर कथा । वदेन स्वहितालागीं मी ॥१२७॥
ही मीपणाची अहंवृत्ती । जिरवूं जातां जिरेना चित्तीं । हा मी कोण न कळे निश्चितीं । साईचि वदतील निजकथा ॥१२८॥
वदतील नरजन्माची महती । कथितील निजभैक्ष्यवृत्ति । बायजाबाईची ती भक्ती । भोजनस्थितीही आपुली ॥१२९॥
सवें घेऊनि म्हाळसापती । तैसेचि कोते तात्या गणपती । बाबा निजत मशिदीप्रती । कैसिये रीतीं तें परिसा ॥१३०॥
पंत हेमाड साईंसी शरण । म्हणवी भक्त-पायींची वहाण । तयासी साईंची आज्ञा प्रमाण । झालें निरूपण येथवरी ॥१३१॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । विविधकथानिरूपणं नाम सप्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्नुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥