॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
मागील अध्यायीं जाहलें कथन । कैसे साई हिंदू वा यवन । कय त्या शिरडीचें भाग्य गहन । जें निजस्थान बाबांचें ॥१॥
कैसे बाबा आरंभीं पोर । पुढें जाहले वेडे फकीर । कैसी बनविली बाग सुंदर । मूळच्या उखर स्थळाची ॥२॥
कैसा कालेंकरून पुढाअ । त्याचि जागेवर जाहला वाडा । धोती पोती खंडयोग गाढा । वर्णिला निधडा बाबांचा ॥३॥
झिजवूनियां निजकाय । बाबांनीं साहिले कैसे अपाय । भक्तकैवारी साईराय । वर्णूं मी काय तयांतें ॥४॥
आतां ऐका नरजन्माचें महिमान । साईंच्या भैक्ष्यवृत्तीचें वर्णन । बायजाबाईंचें संतसेवन । बाबांचें भोजनकौतुक ॥५॥
तात्या बाबा म्हाळसापती । तिघे कैसे मशिदीं निजती । कैसे खुशालचंदाचे गृहा जाती । रहात्याप्रती समर्थ ॥६॥
प्रत्यहीं उदय प्रत्यहीं अस्त । वर्षोनुवर्षें जाहलीं फस्त । अर्धा जन्म निद्रितावस्थ । उरलाही स्वस्थ भोगवेना ॥७॥
बाळपणीं क्रीडासक्त । तरुणपणीं तरुणीरक्त । वृद्धापकाळीं जराग्रस्त । सदैव त्रस्त व्याधींनीं ॥८॥
जन्मासी येऊनि पुष्ट होणें । श्वासोच्छ्वास करीत राहणें । दीर्घायुष्यवरी वांचणें । हें काय कोणें या जन्मीं ॥९॥
परमात्मप्राप्ति हेचि साची । इतिकर्तव्यता नरजन्माची । नातरी श्वानसूकरादिकांची । जीविकाचि काय उणी ॥१०॥
श्वानेंही आपुलीं पोटें भरिती । प्रजोत्पादन यथेष्ट करिती । तेथें नरदेहाचीच काय महती । साम्यस्थिती उभयतां जैं ॥११॥
पिंडपोषण आणि मैथुन । हेंचि जरी नरदेहाचें साधन । हेंच जरी या जन्माचें पर्यवसान । तरी तो नरजन्म निरर्थक ॥१२॥
आहार - निद्रादि चतुष्टय । यांतचि होतां आयुष्यक्षय । मग श्वानां - मानवां भेद काय । करा निर्णय विवेकें ॥१३॥
हीच जरी नरदेहसफलता । तरुजन्मीं काय न्य़ूनता । भस्त्राही करी श्वासोच्छवासता । शरीरपुष्टता श्वानांही ॥१४॥
मनुष्यप्राणी मुक्त आहे । तो निर्भय तो स्वतंत्र पाहे । तो शाश्चत ही जाणीव राहे । सफलता हे जन्माची ॥१५॥
आला कोठूनि आहे कोण । नरजन्माचें काय कारण । एथील बीज जाणे तो प्रवीण । त्यावीण शीण मग सारा ॥१६॥
जैसी नंदादीपाची ज्योती । एकचि दिसे आदिअंतीं । परी वेगळी क्षणाक्षणाप्रती । तैशीच स्थिति देहाची ॥१७॥
बाल्यतारुण्य - वार्धक्यावस्था । या तों प्रकट जनां समस्तां । परी येती जाती स्वभावता । कोणा न कळतां कदाही ॥१८॥
दिसे तीच तत्क्षणीं नासे । अपरिमित तरी एकचि भासे । तैसाचि देह जो या क्षणीं असे । क्षणांतीं नसे पूर्वील ॥१९॥
देह मळमूत्रांची न्हाणी । श्लेष्म - पूय - लाळींची घाणी । मरण ठेविलें क्षणोक्षणीं । कुलक्षणी मोठा हा ॥२०॥
जें हें कृमिकीटकांचें घर । नाना रोगांचें आगर । अश्वत्थ आणि क्षणभंगुर । तें हें शरीर मानवी ॥२१॥
मांसशेणित - स्नायूंचा गाडा । तो हा अस्थि - चर्मांचा सांगाडा । मूत्र - पुरीष दुर्गंधीचा राडा । जीवाचा खोडा प्रत्यक्ष ॥२२॥
त्वचा मांस रुधिर स्नायू । मेद मज्जा अस्थि वायू । अमंगल अंगें उपस्थ पायू । ते अल्पायु हे काया ॥२३॥
ऐसा अमंगल आणि नश्वर । नरदेह जरी क्षणभंगुर । तरी मंगलधाम श्रीपरमेश्वर । हातीं येणार एणेंचि ॥२४॥
सदैव लागलें जन्म - मरण । कल्पनेचेंचि भय दारुण । नाहीं लागतां कानाला कान । प्राण हा निघून जाईल ॥२५॥
कोण लक्षी दिवसराती । किती येती आणिक जाती । मार्कंडेयाच्या आयुष्यें जन्मती । तयांही कालगति चुकेना ॥२६॥
ऐशिया क्षणभंगुर नरदेहीं । पुण्यश्लोक कथावार्ताही । गेला काळचि पडे संग्रहीं । तद्विरहित तो व्यर्थ ॥२७॥
हीच जाणीव झालिया निश्चित । हेंचि जन्मा आल्याचें हित । परी हा विश्वास नाहीं पटत । अनुभवाव्यतिरिक्त कोणाही ॥२८॥
परी यावया हा अनुभव । करूं लागे अभ्यास विभव । तरी शाश्वत सुखार्थी हा जीव । तेणें हें वैभव साधावें ॥२९॥
दारा सुत वैभव वित्त । पृथ्वी समुद्रवलयांकित । ईश्वरकृपें इतुकेंही प्राप्त । तरी तो अतृप्त मानसीं ॥३०॥
शाश्वत सुख आणि शांति । हेंचि ध्येय ठेवूनि चित्तीं । भूतीं भगवंत हे एक उपास्ति । परमप्राप्तिदायक ॥३१॥
त्वचा मांस रुधिर हाडां । जोडूनि केला हा देहसांगाडा । परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा । ममत्व सोडा तयाचें ॥३२॥
मानावा तो केवळ चाकर । नका बैसवूं त्या डोक्यावर । लाड न पुरवा निरंतर । नरकद्वार करूं नका ॥३३॥
निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । तैसेंच तात्पुरतें लालन पालन । लावा आध्यात्मिक उन्नतीलागून । जन्ममरण चुकवावया ॥३४॥
जन्ममरणादि अनर्थात्मक । प्रतिक्षण विनाशोन्मुख । कैसें क्षणिक याचें सुख । निरंतर असुख जो ॥३५॥
जैसी विद्युल्लता पाहीं । आतां आहे आतां नाहीं । क्षणिक सागर - तरंगता ही । विचार कांहीं करावा ॥३६॥
देहगेहापत्य स्त्री जन । हीं सर्व नाशिवंत जाणून । मातापित्यांसी खांदां वाहून । स्वयें जो आपण उमजे ना ॥३७॥
मेल्यामागें खुशाल मरे । फिरे जन्म - मरणांचे फेरे । परी तें कोण्या गुणें आवरे । विचार न करी क्षणभरी ॥३८॥
करितां नित्य कुटुंबाची भर । आयुष्य जातसे भराभर । काळ आयुष्यगणनातत्पर । कर्तव्यविसर त्या नाहीं ॥३९॥
भरतां अखेरची घडी । मग तो थांबेना एक चिपडी । धीवर जैसा जाळें ओढी । मरणीं तडफडी जीव तैसा ॥४०॥
महद्भाग्याचिया परवडी । वेंचूनियां पुण्यकोडी । लाधली नरदेहाची जोडी । घडीनें घडी साधावी ॥४१॥
करूं जातां भगीरथ युक्ति । या नरदेहाची नाहीं प्राप्ति । केवळ अद्दष्टें ये अवचटा हातीं । व्यर्थचि मातींत मिळवा ना ॥४२॥
पुढील जन्मीं करूं म्हणतां । एकदां हा हातींचा जातां । पुढें हाचि येईल ही निश्चितता । ऐसें मानिता तो मूर्ख ॥४३॥
कितीएक पापी देहवंत । होऊनि शुक्र -बीजसमन्वित । योनिद्वारासी होती प्राप्त । शरीरग्रहणार्थ निजकर्में ॥४४॥
कितीएक ते त्याहूनि अधम । असतां जंगमवर्गीं जन्म । मागुती स्थावरभाव परम । यथाकर्म प्राप्त त्यां ॥४५॥
जेणें जैसें उपार्जिलें ज्ञान । जयाचें जैसें कर्मानुष्ठान । तदनुसार तया शरीरग्रहण । श्रुतिप्रमाण हा योग ॥४६॥
‘यथाप्रज्ञं हि संभवा’ । वदे श्रुति माय अतिकणवा । जैसा जयाचा विज्ञानठेवा । जननही जीवा तैसेंच ॥४७॥
अतर्क्य ईश्वरी विंदान । अशक्य तयाचें संपूर्ण ज्ञान । अंशमात्रें लाधे जरी कवण । एक तो धन्य नरदेह ॥४८॥
परमभाग्यें हा नरजन्म । महत्पुण्यें ब्राम्हाणवर्ण । ईशकृपें साईचे चरण । लाभ हा संपूर्ण अलभ्य ॥४९॥
आहेत जरी नाना योनी । मानवचि श्रेष्ठ सर्वाहुनी । आलों कोठुनी निर्मिलें कोणीं । विवेक - श्रेणी मानवीच ॥५०॥
इतर योनी हें न जाणती । उपजती तैसा नाश पावती । भूत भावी वर्तमान गति । ईश्वरस्थिति नेणती ॥५१॥
म्हणोनि हा नरदेह निर्मून । ईश्वर झाला आनंदसंपन्न । कीं विवेकवैराग्यातें वरून । नर मद्भजन करील ॥५२॥
विनाशी नर करितां साधन । होईल अविनाशी नाराणय । नरदेहासम साधनसंपन्न । दुजा न आन ये सृष्टीं ॥५३॥
गारुडी स्वयें मोठा चतुर । खेळ न करी अज्ञानियासमोर । आणे कुशलतेचें वर्मसार । तो प्रेक्षकसंभार अपेक्षी ॥५४॥
तैसाचि पुश - पक्षी - वृक्षसंभार । जीवजंतु निर्मूनि अपार । सखेदाश्चर्य परमेश्वर । लीलानि:सार गमली त्या ॥५५॥
अफाट हा ब्रह्मांडविस्तार । चंद्र सूर्य तारा भार । निर्मित्याच्या कौतुकाचा विचार । लवभर कोणीही करीना ॥५६॥
हा सर्व खेळ करण्याआंतु । माझा जगदीशाचा काय हेतु । ये अर्थींची निश्चयमातु । एकही जंतु जाणेना ॥५७॥
माझी अतुल वैभवसमृद्धि । जाणील ऐसा कुशाग्रबुद्धि । प्राणी निर्मिला नाहीं तदवधि । विफल त्रिशुद्धि मम कार्य ॥५८॥
ऐसें जाणूनि जगदीशें । निर्मिला प्राणी मानववेषें । कीं जो सारासार बुद्धिवशें । मज सामर्थ्यें जाणील ॥५९॥
अगाध माझें वैभव । तैशीच माझी शक्ति अपूर्व । माझ्या मायेचा हा खेळ सर्व । आश्चर्यपूर्वक तो जाणे ॥६०॥
तोचि करील ज्ञानसंपादन । मच्चिंतन आणि मदवलोकन । तोचि होईल आश्चर्यसंपन्न । होईल तैं पूर्ण खेळ माझा ॥६१॥
प्रेक्षकांची जी आनंदसंपन्नता । तीचि मज माझे खेळाची साङ्गता । पाहूनि माझी जगन्नियंतृता । नर कृतार्थता मानील ॥६२॥
काम्यकर्में द्रव्योपार्जन । एतदर्थ न शरीरपोषण । यावज्जीव तत्त्वज्ञानसंपादन । हेंच जीवनसाफल्य ॥६३॥
तत्त्व तेंचि जें अभेदज्ञान । तेंचि उपनिषह्व्रम्हाज्ञान । तेंचि परमात्मोपासन । तेंचि तो भगवान भक्तांचा ॥६४॥
गुरु ब्रम्हा नव्हेत दोन । झालें जया हें अभेद ज्ञान । हीच भक्ती घडतां जाण । मायातरण सुगम जें ॥६५॥
जे श्रद्धावंत पुरुष योग्य । संपादिती ज्ञान वैराग्य । हें आत्मतत्त्वचि निजभोग्य । भक्त सभाग्य ते जाणा ॥६६॥
स्वस्वरूपाचें जें अभावन । तें अज्ञान निरसल्यावीण । स्वयें कृतार्थ मानी जो आपण । प्रतिबंध विलक्षण हा एक ॥६७॥
ज्ञान आणि अज्ञान । दोनी हे विकार अविद्याजन्य । कांटियानें कांटा फेडून । तैसीं उडवून द्या दोनी ॥६८॥
ज्ञानानें दूर करा अज्ञान । ज्ञानाज्ञानातीत होऊन । निर्मळ स्वस्वरूपावस्थान । हें एक पर्यवसान नरजन्मा ॥६९॥
न करितां स्नेहाची रांगोळी । अज्ञानतमाची काजळी । ‘मी मम’ या वातीची होळी । ज्ञान न पाजळी निजप्रभा ॥७०॥
नरदेहगत जें जें कार्य । असो निवार्य वा अनिवार्य । हें तों सर्व बुद्धिकर्तव्य । निश्चयप्राय जाणावें ॥७१॥
नाहीं आपणा दुजें काम । स्वस्थ भोगावें ऐश्चर्य आराम । अथवा चिंतावें रामनाम । होऊं निष्काम निश्चिंत ॥७२॥
शरीरेंद्रिय - मन - बुद्धी । या तों सर्व आत्म्याच्या उपाधी । इहींचि आत्मा भोक्तृत्व आपादी । स्वयें अनादि अभोक्ता ॥७३॥
आत्म्याचें भोक्तृत्व औपाधिक । स्वयें अभोक्ता स्वाभाविक । शास्त्रन्याय अन्वय - व्यतिरेक । प्रमाण देखा ये अर्थीं ॥७४॥
हे एक जाणोनि निजवर्म । बुद्धीसि सोंपावेम प्राप्तकर्म । तिचे हातीं मनाचे धर्म । स्वयें निष्कर्म वर्तावें ॥७५॥
स्वधर्माचें अनुष्ठान । सदैव आत्मानात्मचिंतन । हेंचि नरजन्माचें पर्यवसान । समाधान स्वरूपीं ॥७६॥
नाहीं नरदेहापरी आन । चारी पुरुषार्थ साधाया साधन । जो नर अभ्यासपरायण । तो नारायणप्द पावे ॥७७॥
म्हणूनि झालें न जों शरीरपतन । आत्मज्ञानार्थ करा यत्न । नरजन्माचा एकही क्षण । उपेक्षून टाकूं नका ॥७८॥
समुद्रींचें क्षारोदक । मेघाहातीं पडतां देख । होतें जैसें गोड पीयूख । तें सुख जडतां गुरुपाय़ीं ॥७९॥
ऐशिया नरदेहाची सद्नती । गुरुविना नकळे कवण्याप्रती । गुरूचि जेव्हां धरती हातीं । तैंचि उद्धरती जड जीव ॥८०॥
मंत्र तीर्थ देव द्विज । ज्योतिर्वेद आणि भेषज । तैसेचि सातवे गुरुराज । भावना काज यां अवघियां ॥८१॥
जयांच्या ठायीं जैशी भावना । सिद्धीही तैशीच त्याप्रमाणा । वेग जैसा अधिक उणा । सिद्धीही जाणा तैशीच ॥८२॥
बद्धास करिती मुमुक्षु संत । मुमुक्षूचा करिती मुक्त । अव्यक्ताचे होऊनि व्यक्त । परोपकारार्थ हें करिती ॥८३॥
कार्य नव्हे जें व्याख्यानें पुराणें । सुकर होई तें सत्पुरुषाचरणें । तयाचें हालणें चालणें । उपदेशणें नि:शब्द ॥८४॥
क्षमा शांति नि:संगता । भूतदया परोपकारता । इंद्रियनिग्रह निरहंकारता । यांचा आचरता दुर्लभ ॥८५॥
जें न लाभे पढतां ग्रंथ । सुलन तें पहातां एक क्रियावंत । करी जें न तारागण अनंत । संपादी भास्वत एकला ॥८६॥
तैसेचि हे उदार संत । सहज क्रिया त्यांच्या अनंत । करिती जीवांसी बंधमुक्त । सौख्य अत्यंत देतात ॥८७॥
यांतीलचि एक साईमहंत । ऐश्वर्यवंत श्रीमंत । परी फकीरासम आचरित । आत्मनिरत सर्वदा ॥८८॥
अनवच्छिन्न जयाची समता । मी माझें ही नाहीं वार्ता । जीवमात्रीं सदा सदयता । भूतीं भगवंतता मूर्तिमंत ॥८९॥
सौख्यें जयासी नाहीं हरिख । दु:खें जयासी नाहीं शोक । सरिसे जया रावरंक । हें काय कौतुक सामान्य ॥९०॥
जयाची भ्रूविक्षेपलहरी । क्षणांत रंकाचा राव करी । तो हा घेऊनि चौपालवी करीं । दारोदारीं हिंडतसे ॥९१॥
धन्य ते जन जयांचे द्वारीं । बाबा होऊनि भिक्षेकरी । ‘पोरी आण गे चतकुर भाकरी’ म्हणूनि पसरी निजकर ॥९२॥
घेई टमरेल एके करीं । दुजिया हातीं चौपदरी । स्वयें फिरे दारोदारीं । नियमित घरीं प्रतिदिनीं ॥९३॥
भाजी सांबारें दूध ताक । पदार्थ तितुके सकळिक । टमरेलांत ओतिती लोक । पहा हें कवतीक खाण्याचें ॥९४॥
शिजला भात अथवा भाकरी । घ्यावया पसरली चौपदरी । पातळ पदार्थ मग कैसीही परी । टमरेलाभीतरीं रिचविती ॥९५॥
पदार्था - पदार्थाची घ्यावया चवी । लालसा कोठूनि व्हावी । रसासक्ति जिव्हे न ठावी । जीवीं उठावी कैसेनी ॥९६॥
झोळींत पडलें जें जद्दच्छेनें । तृप्त असावें तयाच्याच सेवनें । रुचकर कीं बेचव हें नेणे । चवीचि रसने नाहीं कीं ॥९७॥
प्रहर दिवसा वस्तीलागुनी । भिक्षा मागत प्रतिदिनीं । तेणें उदरपूर्ति करूनी । समाधानी वर्तत ॥९८॥
भिक्षा तरी काय नियमित । इच्छेस येईल तेव्हां मागत । कधीं बारा वेळ एका दिवसांत । भिक्षेस जात गांवांत ॥९९॥
एणेंपरी जें अन्न आणीत । मशिदींतील कुंडींत ठेवीत । कावळे कुत्रे त्यांतचि खात । कधीं न हांकीत तयांना ॥१००॥
मशीद - आंगण झाडणारी । त्यांतूनि दहाबारा भाकरी । घेऊनि जाई आपुले घरीं । कोणी न वारी तिजलागीं ॥१०१॥
कुत्र्यां मांजरां हडहड करणें । स्वप्नांतही जो कदा नेणे । तो काय गरीब दुबळ्यां नको म्हणे । धन्य जिणें तयांचें ॥१०२॥
आरंभीं हा वेडा फकीर । येचि नामें जनां महशूर । तुकडे मागूनि भरी जो उदर । कैंचा बडिवार तयाचा ॥१०३॥
फकीर परी हाताचा सढळ । निरपेक्ष आणि स्नेहाळ । बाह्य चंचल अंतरीं अचळ । कळा अकळ तयाची ॥१०४॥
ऐसियाही त्या कुग्रामांत । जात्या अतीव दयावंत । होते कांहीं भाग्यवंत । ते त्या महंत मानीत ॥१०५॥
तात्या कोते यांची आई । नांव जिजेचें बायजाबाई । पाटींत भाकर्या घेऊनि डोयीं । रानांत जाई दुपारा ॥१०६॥
कोस कोस रान धुंडावें । दाट झाड झुडूप तुडवावें । वेडया फकीरास या हुडकावें । पायां पडावें तयाच्या ॥१०७॥
काय तिच्या त्या सत्त्वाची थोरी । ओली कोरडी भाजी भाकरी । रानीं वनीं दुपारीं तिपारीं । भरवी न्याहारी बाबांतें ॥१०८॥
ऐसें तिचें तपाचरण । वावाही न विसरले आमरण । केलें तिच्या पुत्राचें कल्याण । पूर्ण स्मरणपूर्वक ॥१०९॥
उभयतां त्या स्त्रीपुरुषांचा । फकीरापायीं द्दढभाव साचा । फकीरचि देव त्या उभयतांचा । भावार्थियाचाच देव कीं ॥११०॥
फकीरानें ध्यानस्थ असावें । बायजाबाईनें पान मांडावें । पाटींतील अन्न वाढावें । खाववावें प्रयत्नें ॥१११॥
‘फकीरी अव्वल बादशाही । फकीरीही चिरंतन राही । अमीरी क्षणभंगुर पाहीं’ । सदा बबांनीं म्हणावें ॥११२॥
पुढें बाबांनीं रान त्यागिलें । गांवांत येऊनि राहूं लागले । मशीदींत अन्न खाऊं आदरिलें । कष्ट चुकविले आईचे ॥११३॥
ऐसा हा नेम तेव्हांपासुनी । जैसा चालविला त्या उभयतांनीं । तैसाचि तो तयांचे मागुनी । तात्यांनींही चालविला ॥११४॥
धन्य धन्य ते संत सदैव । जयांचे ह्रदयीं वासुदेव । धन्य तया भक्तांचें सुदैव । समागमवैभव ज्यां त्यांचें ॥११५॥
तात्या महाभाग्यवान । म्हाळसापतीचेंही पुण्य गहन । बाबांचे समागमाचा मान । समसमान भोगीत ॥११६॥
तात्या आणि म्हाळसापति । मशिदींतचि शयन करिती । बाबांचीही अनुपम प्रीती । दोघांवरती सारखी ॥११७॥
पूर्वपश्चिमे उत्तरेस । डोया तिघांच्या तीन दिशांस । पाय परस्परांचे पायांस । मध्यबिंदूस भिडविती ॥११८॥
ताणूनि ऐशिया पथार्या । गोष्टी वार्ता चालती सार्या । एकास येतां निद्रेच्या लकेर्या । तयास दुसर्यानें जागवावें ॥११९॥
तात्या घोरूं लागतां । उठावें बाबांनीं अवचितां । करोनि तयांसी उलथापालथा । दाबावा माथा तयांचा ॥१२०॥
घेऊनि समवेत म्हाळसापती । बिलगती दोघे तात्यांप्रती । आवळूनि धरिती पाय दाबिती । पाठही रगडिती तयांची ॥१२१॥
ऐशीं सबंध चवदा सालें । बाबांसवें तात्या मशिदींत निजले । काय भाग्याचे ते दिवस गेले । स्मरणीं राहिले अखंड ॥१२२॥
घरीं ठेवूनियां मायबापें । बावांच्या आवडीं मशिदीं झोंपे । प्रेम तें मापावें कवण्या मापें । मोल या कृपेचें कोण करी ॥१२३॥
पुढें वडील पंचत्व पावले । तात्या घर - संसारांत पडले । झाले घरधनी स्वयें दादुले । निजूं लागले निजगृहीं ॥१२४॥
असो ऐसा निष्ठावंत भाव । तयासीचि साईचा अनुभव । अनाहूत उभा स्वयमेव । भक्त नवलाव पाहूं ये ॥१२५॥
तैसेचि रहात्यांत एक गृहस्थ । खुशालचंद नामें विख्यात । होते बाबांचे भक्त धनवंत । नगरशेट गांवींचे ॥१२६॥
प्रसिद्ध पाटील गणपत कोते । जैसे बाबांचे फार आवडते । चुलते खुशालचंदांचे होते । तैसेचि बाबांतें प्रिय बहु ॥१२७॥
जरी जातीचे मारवाडी । बाबांलागीं मोठी आवडी । परस्परांच्या घडोघडी । भेटी सुखपरवडी ते घेत ॥१२८॥
हरीच्छेनें कांहीं कालें । वडील शेठजी पंचत्व पावले । तरीही न बाबा विरसले । प्रेम पहिलें दुणावलें ॥१२९॥
पुढेंही खुशालचंदांवरती । वाढत गेली बाबांची प्रीति । आदेहान्त दिवसराती । कल्याणा जागती तयांचे ॥१३०॥
कधीं गोरथीं किंवा हरयथीं । सवें घेऊनि प्रेमाचे सांगाती । तेथूनि दीड मैलावरती । रहात्याप्रती जात बाबा ॥१३१॥
ग्रामस्थ लोक सामोरे येत । ताशे वाजंत्री सवें घेत । बाबांस गांवाचे वेशीवर भेटत । लोटांगणीं येत प्रेमानें ॥१३२॥
मग तेथूनि गांवाआंत । बाबांस समारंभें नेत । अति प्रेमें वाजत गाजत । आनंदभरित मानसें ॥१३३॥
खुशालचंद आपुले सदनीं । बाबांस मग जात घेऊनी । तेथें अल्पाहार करवुनी । सुखसनीं बैसवीत ॥१३४॥
मग त्या जुन्या पुराण्या वार्ता । आठवूनि कथिती उभयतां । परस्परांच्या आनंद चित्ता कोणास वर्णितां येईल तो ॥१३५॥
एणेंप्रमाणें आनंद - विहार । पूर्ण होतां फळाहार । बाबा मग स्वानंनिर्भर । सहपरिवार परतती ॥१३६॥
एकीकडे हें रहातें गांव । दुसरीकडे तें निमगांव । या दोहोंच्या मध्यें ठाव । शिरंडी गांग वस्तीचा ॥१३७॥
जरी या मध्यबिंदूपासून । या दोन गांवांबाहेर प्रयाण । स्थूळ देहें केलें न आनिर्वाण । तरी तयां जाण सर्वत्र ॥१३८॥
नाहीं इतर कोठें प्रयाण । नाहीं आग्निरथाचें दर्शन । तरी त्या रथाचें गमनागमन । वेळ प्रमाण त्यां ठावें ॥१३९॥
साधावया गाडीची वेळ । भक्तांनीं करावी तयारी प्रबळ । आज्ञा मागू जातां जवळ । म्हणावें उतावीळ कां झालां ॥१४०॥
बाबा न करितां आतां तांतडी । चुकेल माझी मुंबईची गाडी । नोकरीवरी येईल धाडी । साहेब काढील मजला कीं ॥१४१॥
साहेब येथें नाहीं दुसरा । कशास व्हावी इतुकी त्वरा । जा खा भाकर तुकडा जरा । जाईं दुपारा जेवुनी ॥१४२॥
ऐशी कोणाची आहे प्राज्ञा । कीं त्या वाणीची करील अवज्ञा । लहाना थोरा शहाण्या सुज्ञा । अनुभवविज्ञान सकळां हें ॥१४३॥
ज्यानें ज्यानें आज्ञा मानिली । गाडी तयाची कधीं न चुकली । परी जयानें ती अवमानिली । प्रचीती घेतली रोकडी ॥१४४॥
एकामागून एक अभिनव । संख्याविरहित ऐसे अनुभव । अनेकांचे अनेक अपूर्व । संक्षेपपूर्वक सांगेन ॥१४५॥
हेमाड साईपदीं शरण । पुढील अध्यायीं हेंचि निरूपण । भक्त परततां गांवालागून । बाबांचें आज्ञापन हों लागे ॥१४६॥
आज्ञा होई तो तो जाई । आज्ञा नाहीं तो तो राही । अवमानितां पडे अपायीं । पुढील अध्यायीं दिग्दर्शन ॥१४७॥
तैसेंचि मधुकरी वृत्तीचें धारण । साईंस किमर्थ भिक्षान्नसेवन । पंचसूनादि पातकक्षालन । कथानिरूपण पुढारा ॥१४८॥
म्हणूनि श्रोतयां चरणीं प्रार्थना । करितों आग्रहें क्षणक्षणा । कराया साईचरित्र - श्रवणा । निजकल्याणाकारणें ॥१४९॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । श्रीसाईसमर्थावतरणं नाम अष्टमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्नुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥