॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
गताध्यायीं अभिवचन । कीं ये अध्यायीं होईल निरूपण । श्रेय आणि प्रेयलक्षण । सादरें श्रवण तें परस्पर । श्रेय - प्रेय तयापरी ॥२॥
प्रेयार्थ जयाचें मन धांवे । स्वार्थापासाव तो भ्रंश पावे । श्रेय तें विवेकरूप आहे । अविवेकरूप प्रेय कीं ॥३॥
श्रेयाचा विषय केवळ विद्या । प्रेयाचा तो निखळ अविद्या । प्रेय कधीं ना भुलवी सुज्ञां । श्रेय अज्ञां नावडे ॥४॥
जोंवरी कनक - कामिनीहोड । इंद्रियांसी विषयांची आवड । विवेक - वैराग्या नाहीं जोड । प्रेयचि गोड तोंवरी ॥५॥
नीरक्षीराची मिसळ । तेवीं प्रेयश्रेयांची भेसळ । जेवीं दुग्ध तेवढें निवळ । सेविती मराळ मानसीं ॥६॥
तेवींच जे धीर बुद्धिमंत । विवेकी आणि भाग्यवंत । श्रेयासी केवळ लोलंगत । प्रेयासी विन्मुख सर्वदा ॥७॥
तेच पहा मंदबुद्धी । शरीर - पशु - पुत्र - धन - मानादि । योगक्षेमाच्या लागोनि नादीं । प्रेय साधिती एकलें ॥८॥
श्रेय काय प्रेय काय । ज्ञात झालें जरी उभय । तैसाचि ग्रहणव्यवसाय । जरी स्वायत्त पुरुषासी ॥९॥
तरीही प्राप्त होतां उभय । निवड करणें अवघड विषय । करूनि मंदबुद्धीवरी जय । आलिंगी प्रेय तयासी ॥१०॥
सारूं प्रेय आदरूं श्रेय । पुरुषार्थ तो हाचि होय । असतां पयमिश्रित तोय । पयचि घेई हंस जैसा ॥११॥
श्रेय आणि प्रेय हीं दोन । जरी हीं पुरुषाचे स्वाधीन । असमर्थ कराया हें विवेचन । विवेकहीन मंदमति ॥१२॥
श्रेय तें आहे कशांत । आरंभीं जानिलें पाहिजे निश्चित । मग येतां प्रतिबंध मार्गांत । प्रतिकार साद्यंत करूं ये ॥१३॥
येथेंच पुरुषार्थ द्दष्टीपुढां । येवोनि ठाके दत्त निधडा । म्हणोनि श्रेयार्थचि करा झगडा । करोनि धडा बुद्धीचा ॥१४॥
अतर्क्य संसारचक्राचे फेर । अखंड - भ्रमती अष्टौप्रहर । आध्यात्मिकादि त्रिताप प्रखर । दुर्निवार नर साहे ॥१५॥
तेणें आत्यंतिक दु:खकहर । सहन करितां होई जर्जर । शोधी मग तन्निवर्तनपर । सोपीं सुखकर साधनें ॥१६॥
दु:सह हें भवचक्र परिवर्तन । होईल कैसें याचें स्तंभन । तदर्थ असेल काय साधन । हें अन्वेषण आदरी ॥१७॥
थोर भाग्यें हे बुद्धि उपजतां । तेथूनि निपजे पुरुषार्थता । मग तो सदुपायसाधकता । निजस्वार्था वरील ॥१८॥
अनादि अविद्या अथवा माया । शुक्तिरजत मृग्जलवत् वायां । अध्यासरूप महदंतराया । विलया नेलें पाहिजे ॥१९॥
स्वप्नांत सोन्याच्या गारा वर्षती । प्रयत्नें सांठवण केल्या अमिती । वाटे वेळीं कामास येती । हारवून जाती जागृतीं ॥२०॥
द्दष्टाद्दष्ट - भोगवासना । आशा तृष्णा वा कामना । सदैव प्रतिबंधक जाणा । समूळ खाणा या आधीं ॥२१॥
अशक्य दिसाया सूर्यकरें । बुद्धि जेथूनि माघारी फिरे । जेथ वेदश्रुतीचें पाऊल न शिरे । तें निजकरें गुरु दावी ॥२२॥
काम - क्रोध उभयवृत्ति । करूं न देती ज्ञानप्राप्ति । श्रवण - मनन - समाधिविच्छित्ति । हातोहातीं त्या करिती ॥२३॥
दीपाकर्पूरा होतां लगटी । सभवे काय लोटालोटी । उभयत्र भेटी होण्याची खोटी । दीपत्वें उठे कर्पूर ॥२४॥
श्रुतिस्मृतींला अविधित । दुष्कर्मीं लोळे जो अविरत । ज्ञानी असूनि काय हित । विहिताविहित जो नेणे ॥२५॥
तैसाच जो नित्य अशांत । अंत:करण असमाहित । इंद्रियलौल्यें विक्षिप्तचित्त । ज्ञानें निर्वृत होईना ॥२६॥
ज्याचे चित्तास समाधान । जो गुरुपुत्र आचारवान । ज्याचें निश्चल आत्मानुसंधान । ज्ञानसंपन्न तो एक ॥२७॥
हो संसार वा मोक्षगामी । जाणें जरी निजधामीं । होई शरीररथस्वामी । केवळ वाग्मी काय करी ॥२८॥
येथें वाचेसी नाहीं थार । अभ्यास एक सर्वसार । रथस्थानीं योजी शरीर । स्वयें स्थिर बैसे गा ॥२९॥
या निजशरीराच्या रथीं । निजबुद्धीस करीं सारथी । स्वयें स्वामी बैस रथी । स्वस्थचित्त ऐस तूं ॥३०॥
दुर्गमरूप रसमार्गराजी । कंठावया मग सारथी योजी । आवरी मन:प्रग्रहांमाजी । दशेंद्रियवाजी उच्छृंखळ ॥३१॥
घोडे जरी सैरा धांवती । लगाम राखील स्थानावरती । तो निरवून सारतिया हातिं । स्वस्थचित्तीं बैसें तूं ॥३२॥
सारथी कुशल आणि निपुण । तरीच घोडे चालती कसून । तोच मन:प्रग्रहपराधीन । होतां बलहीन होतसे ॥३३॥
विवेकबुद्धीचें सारथ्य जेथ । जो समनस्क समाहितचित्त । तयासीच परमपद प्राप्त । इतर मार्गांत थकतात ॥३४॥
जयाचें सदा अयुक्त मन । तया न कदा समाधान । तया न तत्पदाभिगमन । संसारपरिवर्तन चुकेना ॥३५॥
ऐसें तें पद परम मोठें । वास्तव्य तरी तयाचें कोठें । मनींची आशंका फिटे । प्रकट जैं तें आपैसें ॥३६॥
येथें न चले तर्कवाद । अनुवाद प्रवाद वा संवाद । ईशकृपेनेंच लागेल दाद ॥ इतर वाद ते व्यर्थ ॥३७॥
न चले येथ तर्काची चतुराई । तर्कज्ञमति कुंठित होई । भोळा भावचि सिद्धीस जाई । हेच नवलाई येथील ॥३८॥
सम्यग्ज्ञानासि जे कारण । ते गति आन ते बुद्धीही आन । तो आगमज्ञही वेगळाच जाण । उत्तम ज्ञानदानी जो ॥३९॥
काया अमोलिक चालिली वायां । धनकाम ही दुपारची छाया । जाणोनि हरीची दुर्घट माया । लागें पायां संतांच्या ॥४०॥
संत भवसागरीचें तारूं । तूं हो तेथील एक उतारू । तयांवीण पैलपारू । कोण उतरूं समर्थ ॥४१॥
विवेक - वैराग्य यांची जोड । बांधील तयांची जो सांगड । तो हो कां जडमूढ दगड । अवघड ना त्या भवसिंधु ॥४२॥
षङ्गुणैश्वर्य भगवंताचें । ‘वैराग्य’ हें प्रथमैश्वर्य साचें । असतील जे महद्भाग्याचे । विना इतरांचे वांटया न ये ॥४३॥
विहितकर्म केलियावीण । होईना चित्तशुद्धि निर्माण । चित्तशुद्धि न होतां जाण । ज्ञानसंपादन घडेना ॥४४॥
तस्मात् कर्मचि एक जाण । ज्ञानप्राप्तीचें मूळ कारण । नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठान । तेणेंच क्षाळण मळाचेम ॥४५॥
एवं शुद्ध झालेल्या चित्तीं । विवेक - वैराग्यां उत्पत्ति । शमदमादि साधनसंपत्ति । विदेहमुक्ति ये हातीं ॥४६॥
फलकाम - संकल्पत्यागें । चित्तैकाग्रतेच्या योगें । अनन्यत्वें जो गुरूसी शरण रिघे । पदरीं घे त्या सद्नुरू ॥४७॥
जो बहि:प्रवृत्तिशून्य़ । भाविक भक्त अनन्य । ज्ञानलाभें होई प्रज्ञ । उपाय अन्य चालेना ॥४८॥
तेंही ज्ञान लाभल्यावरी । अधर्ममार्गें आचरण करी । अत्र ना अमुत्र खालीं ना वरी । त्रिशंकूपरी लोळकंबे ॥४९॥
जीवाची जे अज्ञानवृत्ति । तीच खरी संसारप्रवृत्ति । झालिया आत्मज्ञानप्राप्ति । तेच निवृत्ति संसारा ॥५०॥
आत्मज्ञ सदा अहंभावरहित । धर्माधर्म - शुभाशुभविरहित । तयांस तें संसारांतर्गत । हिताहित काय पां ॥५१॥
विराली देहाहंकारवृत्ति । तात्काळ तेथेंच संचली निवृत्ति । तीच जीवाची परमात्मस्थिति । खूण निश्चितीं बांधावी ॥५२॥
प्रवृत्तिठायीं शत्रु मित्र । निवृत्तीचें तों हें विचित्र । मीच मी पाहतां सर्वत्र । शत्रुत्व - मित्रत्व तैं कैंचें ॥५३॥
ऐसिया महासुखापुढें । देह - महद्दु:ख तें बापुडें । तैं कोण ऐहिक सुखा रडे । महत्सुख आतुडे जैं ॥५४॥
ऐहिक दु:खाचे डोंगर । कोसळोत मग तयावर । परी तो न हाले लवभर । गिरिवर केवळ धीराचा ॥५५॥
भगवंत ज्यावरी प्रसन्न होतो । त्यालाच मग तो वैराग्य देतो । त्याशीं विवेकाची सांगड बांधितो । पार उतरवितो भवसागर ॥५६॥
आदर्शीं उमटल्या मुखापरी । स्पष्टात्मदर्शनीं हेतु जो धरी । तया येथें भू कीं ब्रम्हालोक वरी । जागा तिसरी नाहींच ॥५७॥
यागीं होतां देवतातृप्ति । पितृलोकाची होईल प्राप्ति । लाधेल कर्मफलोपभुक्ति । आत्मसंवित्ति लाधेना ॥५८॥
गंधर्व - महर्जनस्तप :--- सत्य । तेथील आत्मदर्शन अति अविविक्त । यालागीं जे आत्मदर्शनासक्त । भूलोक यथोक्त वांच्छिती ॥५९॥
येथें होते चित्तशुद्धि । आदर्शापरी निर्मल बुद्धि । शुद्ध आत्मस्वरूप त्रिशुद्धि । प्रतिबिंबित होतसे ॥६०॥
दुजें स्थान जें ब्रम्हालोक । तेथेंही होतो आत्मावलोक । परी सायास लागती अनेक । कष्टकारक अतितर तो ॥६१॥
सर्पावाणी माया वेटाळी । अक्षी आंतून आंतडीं पिळी । बाहेरही सर्वांग कवटाळी । समर्थ टाळी कोण तिये ॥६२॥
“तुम्ही बसल्या बसल्या पहातां । खिशांत पन्नासपट रुपये असतां । काढा पाहू बाहेर आतां । ब्रम्हा तों खिशांत तुमचेच” ॥६३॥
काढा म्हणतां हात घालिती । गृहस्थ पुडकें खिशांतून काढिती । दहादहांच्या पंचविंशती । नोटा मोजिती पुडक्यांत ॥६४॥
गृहस्थ विरघळले मनींचे मनीं । केवढे महाराज अंतर्ज्ञानी । मस्तक ठेविती तयांचे चरणीं । आशीर्वचनीं उत्कंठा ॥६५॥
मग बाबा म्हणती ते वेळे । “गुंडाळ आपुलें ब्रम्हागुंडाळें । लोभाचें जाहल्यावीण वाटोळीं । ब्रह्मा न मिळे तुजलागीं ॥६६॥
पुत्रपश्चादि - वित्तार्जन । आसक्त यांतचि जयाचें मन । तयास कैंचें ब्रम्हाज्ञान । द्रव्यव्यवधान न सुटतां ॥६७॥
महाकठिण वित्तमोह । तृष्णावर्त दु:खगाह । मद मत्सर मकर दु:सह । एक नि:स्पृह तरेल ॥६८॥
लोभाशीं ब्रम्हाचें अखंड वैर । तेथें ध्याना नाहीं अवसर । कैंची मुक्ति विरक्ती साचार । आचारभ्रष्ट लोभिष्ट ॥६९॥
लोभा ठायीं नसे शांति । ना समाधान ना निश्चिंती । एक लोभ वसतां चित्तीं । जाती मातींत साधनें ॥७०॥
श्रुतिस्मृतीस अविहित । ऐसें निषिद्ध जें दुश्चरित । त्यांतचि सदैव जो आसक्त । असमाहितचित्त तो ॥७१॥
तया नांव ‘विक्षिप्तचित्त’ । सदैव दुष्कर्मीं व्यावृत्त । अखंड विषयकर्दमीं लोळत । हिताहित देखेना ॥७२॥
हो का ब्रम्हाविज्ञानसंपन्न । नाहीं जो फलेच्छेसी निर्विण्ण । तोंवरी वाव तें ब्रम्हाविज्ञान । आत्मसंपन्न नाहीं तो ॥७३॥
कोण कांहीं मागूं येतां । अधिकार पाहती संत प्रथमता । जैसी जयाची योग्यायोग्यता । तैसेंच त्यातें देती ते ॥७४॥
जया मनीं रात्रंदिन । देहाभिमान विषयचिंतन । तया गुरूपदेशाचा शीण । व्यर्थ नागवण उभयार्थां ॥७५॥
चित्तशुद्धि जाहल्यावीण । परमार्थीं रिघूं पाहे जो आपण । ज्ञानगर्वाची ती मिरवण । केवळ शीण तो खरा ॥७६॥
यास्तव रुचेल तेंच बोलावें । पचेल तितुकेंचि अन्न खावें । नातरी व्यर्थ अजीर्ण व्हावें । हें तों ठावें सकळिकां ॥७७॥
माझा भांडार भरपूर आहे । देईन जो जो जें जें चाहे । परी ग्राहकाची शक्ति पाहें । देतों मी साहे तेंच कीं ॥७८॥
ऐकाल जरी हें लक्ष देऊन । पावाल तुम्ही कृतकल्याण । या पवित्र मशिदींत बैसून । असत्य भाषण न करीं मी” ॥७९॥
ही संतवाक्यसुधासरिता । भावार्थें येथें बुडी देतां । अंतर्बाह्य लाधे शुद्धता । क्षाळण होतां मळाचें ॥८०॥
ऐसा साईनाथांचा महिमा । वर्णूं जातां न पुरे सीमा । उपमूं कैसें त्या निरुपमा । शुद्धप्रेमाआधीन तो ॥८१॥
माउली ती सकळांची । विश्रांति आर्तश्रांतांची । कल्पवल्ली आश्रितांची । दीनादुबळ्यांची जी छाया ॥८२॥
संसारावरी पाणी देऊन । गिरिकपाटीं मौन धरून । एकांतवास स्वीकारून । निजकल्याणैकदक्ष जो ॥८३॥
ऐसे संत असती बहुत । केवळ जे साधिती निजस्वार्थ । अथवा केवळ निजपरमार्थ । काय कीं अर्थ इतरांतें ॥८४॥
तेवीं न साईबाबा महंत । नसतां आप्तेष्ट गणगोत । घरदार वा जायासुत । प्रपंचांत राहती ॥८५॥
करतलभिक्षा पांच घरा । तरुतलवास अष्टौ प्रहारा । मांडूनि थिता प्रपंच - पसारा । व्यवहार सारा शिकविती ॥८६॥
साधूनि निज ब्रम्हास्थिति । जनतेच्या कल्याणा झिजती । ऐसे संत महामति । विरळा जगतीं असतील ॥८७॥
धन्य तो देश धन्य तें कुळ । धन्य तीं आईबापें निर्मळ । धन्य त्याचा कुसवा सोज्ज्वळ । प्रसवला निर्मळ हें रत्न ॥८८॥
अनायासें परिस लाधला । पाषाण समजुनी बहुती झुगारिला । शिरडींत या परम भागवताला । कोणीं न ओळखिला बहुकाळ ॥८९॥
जैसें उकिरडां रत्न पडावें । पोरांबाळां सांपडावें । त्यांनीं वाटेल तेथें उडवावें । खुशाल तुडवावें दगडसें ॥९०॥
असो यापरी तो ब्रम्हाचा भोक्ता । आशीर्वचनीं पावे तृप्तता । तीच गत तुम्हां आम्हां समस्तां । बिकट रस्ता सोडावा ॥९१।
जोंवरी बाह्या विषयांचें सेवन । शब्दश्रवण स्पर्शसंवेदन । आमोदाघ्राणन । बाह्यांगदर्शन । तंव न विरोधन विषयार्थां ॥९२॥
झालियावीण इंद्रियनिरोधन । स्वभावप्रवृत्तपरावर्तन । प्रत्यग्रूपाचें अवलोकन । वा तद्बोधन अशक्य ॥९३॥
आधीं व्हावें सर्वैषणाविहीन । मग सद्नुरूसीं अनन्यशरण । ऐसा जो द्दढश्रद्धासंपन्न । आत्मविज्ञाना पात्र तो ॥९४॥
श्रोत्रादि पंचज्ञानेंद्रियें । त्यागिजेतील जैं स्वस्वविषयें । मन संकल्प विकल्प स्वयें । त्यागील निश्चयें जे काळीं ॥९५॥
एवं प्रतिनिवृत्त जैं अंतर । बुद्धिही सांडील निश्चयव्यापार । तेच ते परमगति साचार । निर्विकार ब्रम्हा तें ॥९६॥
बुद्धि होईल निश्चयशून्य । चित्तही जैं पावेल चैतन्य । तैंच तोच एक न तदन्य । आत्म्यातें धन्य जाणील ॥९७॥
होतं विषयांपासून विन्मुख । होतील इंद्रियें आत्मोन्मुख । तेव्हांच प्रकटेल निजसुख । इतर सर्व असुख तें ॥९८॥
जोए विषयविकार - प्रच्छन्न । अतिसूक्ष्म दुर्दर्श आत्मज्ञान । परमानंदप्राप्तीचें साधन । अतिगहन आकळाया ॥९९॥
हिरण्यागर्भपदापर्यंत । इहामुत्रविषय़ीं विरक्त । तोच एक ब्रम्हापदाभिषिक्त । तो एक मुक्त जाणावा ॥१००॥
चित्तास विषयापासून । हळू हळू माघौतें फिरवून । आत्मरूपीं स्थिर करून । आत्मज्ञान जोडावें ॥१०१॥
इहामुत्रफळभॊगविराग । हर्षशोकादि द्वंद्वत्याग । बुद्धिमंतासीच हा भोग । अध्यात्मयोग तो हाचि ॥१०२॥
अधिदैवाध्यात्माधिभौतिकीं । निखिल वडवानल ज्वालादिकीं । संतप्त संसारार्णवोदकीं । कोण कीं सुखी असेल ॥१०३॥
तेणें व्हावया निजसमुद्धरण । व्हावें साईप्रसादसंपन्न । करावें तच्चांरेत्रावलोकन । श्रवण मनन सादरें ॥१०४॥
हें श्रीसाईनाथचरित्र । श्रोतीं सपुत्र - मित्र - कलत्र । परिसतां साधेल इहपरत्र । लीला विचित्र बाबांची ॥१०५॥
सभाग्य श्रद्धाळू श्रोते । तेचि या कथांचे परिसते । परिसतां अति हळुवारचित्तें । शांतते येते शांतता ॥१०६॥
या कथानि:स्यंदनिर्झरें । कर्माकर्मलवण विरे । श्रवणद्वारें नयनीं शिरे । रूप साजिरें साईंचें ॥१०७॥
चरित्रश्रवणें पातकां र्हास । चरित्रश्रवणें । काळावरी कास । चरित्रश्रवणें परमोल्हास । श्रोते निरायास पावती ॥१०८॥
श्रवणें शुद्ध अंत:करण । श्रवणें चुकेल जन्ममरण । श्रवणें श्रोतयां ब्रम्हापण । केवळ ब्रम्हार्पणकर्मानें ॥१०९॥
ऐसा हा साईसेवाकाम । सेवकां सदा करी निष्काम । निजभक्तां श्रीसाईराम । देईल आराम सर्वदा ॥११०॥
भागश: या ग्रंथाचें वाचन । अथवा श्रवण आणि परिशीलन । मनन आणि निदिध्यासन । करा अनुदिन श्रोते हो ॥१११॥
‘आनंदो ब्रम्होति व्यजानात्’ । हे तरी तैत्तिरीय श्रुति विख्यात । तेंच ते बाबा अनुवादत । श्रुतिनिर्णीत भक्तांतें ॥११२॥
‘फिकीर न करावी यत्किंचित । सदा असावें आनंदभरित । चिंता न करावी आमणान्त’ । उपदेश नित्य बाबांचा ॥११३॥
असो ब्रम्हात्त्त्व - निर्धारण । हें या अध्यायाचें धोरण । कीं ही नौका भवतारण । जाईल शरण साईंस त्या ॥११४॥
हितवचन वारंवार । सांगावें करावा परोपकार । बाबा तयाचा करूनि अनुकार । तदनुसार प्रवर्तती ॥११५॥
हें सयुक्तिक कीं अयुक्तिक । हे मतभेद केवळ वैयक्तिक । जेणें सामान्य जनतेसी तोख । तोच कीं रोख ये ग्रंथीं ॥११६॥
हेंचि आहे येथें प्रयोजन । बाबा जाणीत कार्यकारण । जैसें तयाचें मनोप्सित जाण । होष्यमाणही तैसेंच ॥११७॥
गुरुमुखींच्या कथा ऐकाव्या । अतर्क्य लीला अनूभवाव्या । स्मरतील त्या संग्रहीं ठेवाव्या । परिसवाव्या इतरांतें ॥११८॥
साईंचें हे चरित्र बरें । श्रवण करितां अत्यादरें । श्रोतियावक्त्यांचें दैन्य हरे । दुर्दिन ओसरे अवघ्यांचें ॥११९॥
पाहोनि बाबांची अलौकिक लीला । कोण अभागी चकित न झाला । केवळ दर्शनमात्रेंचि निवाला । लीन झाला पदकमलीं ॥१२०॥
विशद चरितें या साईंचीं । प्रशास्त चित्तें ऐकावयाचीं । संधी येतां ऐसी सुखाची । कोणी फुकाची दवडील ॥१२१॥
पुत्र - मित्र - कलत्रावर्त । कामक्रोधाइद्राहयुक्त । नानारोग तिमिंगिलोज्जृंभित । उद्वेलित आशाकल्लोळीं ॥१२२॥
वेळीं उद्वेगाचा झटका । येवोनि जातो घटकोघटका । द्वंद्व माजूनि उडतो खटका । परी न तटका तोडवे ॥१२३॥
स्वयेंच जीवास करावा बोध । कीं तूंच आहेस ब्रम्हा शुद्ध । झालासि देहसंगें बद्ध । नलिकापिनद्ध शुक जैसा ॥१२४॥
भुललासि केवळ मोहमाये । तेणें विसरलासि निजसोये । तुझा तूंच सावध होयें । स्वरूपा ये झडकरी ॥१२५॥
भ्रमामुळें वाढला भ्रमा । देहाभिमानादि संभ्रम । मृगजलसम हें ‘मी मम’ । जाणूनि निर्मम होईं कां ॥१२६॥
या मी - तूंपणाचे प्रपंचीं । गुंतावें कां नीट विवंचीं । सोड आवळले पाय पंची । उड्डाणें उंची विहर कीं ॥१२७॥
मुक्त तेथें बद्धता असे । बद्धतेपाशीं मुक्तता वसे । परत होऊनियां उभयदशे । शुद्ध स्ववशें राहीं बा ॥१२८॥
हें तो साक्षेपतेचें ज्ञान । सुख वा दु:ख सर्वाज्ञान । दवडोनि संपादीं विज्ञान । ब्रम्हाज्ञान पाशींच ॥१२९॥
देहीं जोंवर मी - तूंपणा । तों न तूं निजहिताचा देखणा । तो टाक, पाहीं आपआपणा । कृपणपणा भिरकावीं ॥१३०॥
कुबेरासम धनवंत । भिक्षावृत्ति जरी विचरत । तरी तें केवळ नष्टचरित । विपरीतपण अज्ञानानें ॥१३१॥
करावें नित्य सच्छास्त्रश्रवण । विश्वसें पाळावें सद्नुरुवचन । राहूनि सदा सावधान । अनुसंधान राखावें ॥१३२॥
पाहोनि जन ते आचारपद्धति । निजोद्धार मार्ग चोखाळती । असंख्य जीव उद्धरती । सहज गति त्यांचेनी ॥१३३॥
कदा येईल ऐसी घटका । घडेल भवपाशांतुनी सुटका । जया अहर्निश हा मनास चटका । अवचट तटका तो सोडी ॥१३४॥
साधवेल तो एकान्त साधून । संसार नि:सार ही गांठ बांधून । अध्ययन आणि आत्मचिंतन । यांत चिरंतन असावें ॥१३५॥
भक्तिश्रद्धान्वित मनें । शिष्यें पूर्ण विनयसंपन्नें । शरण साष्टांग गेलियाविणें । ज्ञानकेणें गुरु न दे ॥१३६॥
सर्वस्वीं गुरुशुश्रूषा करावी । बंधमोक्षवृत्तीइ विवरावी । विद्याविद्यादि प्रश्नीं धरावी । गुरुरावीं सफलता ॥१३७॥
आत्मा कोण परात्मा कोण । कोणा न सांगावें गुरूवीण । गुरूही न येतां शरण पूर्ण । देती न कणही ज्ञानाचा ॥१३८॥
गुरूविना इतरें देतां ज्ञाना । संसारनिवर्तक तें होईना । मोक्षफलप्रद लवही असेना । मना ठसेना कदापि ॥१३९॥
तस्मात्. गुरूविना ज्ञान नोहे । विदित सकल विद्वानां हें । ब्रम्हात्मैक्यविषयीं सोये । समर्थ पाय गुरुचे ॥१४०॥
तेथें न करितां अनमान । सांडोनि ताठा अभिमान । होवोनि अखंड दंडायमान । खालवा मान गुरुपदीं ॥१४१॥
दासानुदास मी तुमचा । भरंवसा एक तव पदांचा । धरोनि पावलों म्हणा वाचा । धडा जीवाचा द्दढ करा ॥१४२॥
मग पहा चमत्कार तयाचा । तो गुरुदयार्णव हेलावे साचा । निजशेजीं तरंगाच्या । झेली वरच्यावरी तो ॥१४३॥
शिरीं ठेवी अभयहस्त । इडा पिडा करोनि उध्वस्त । जाळोनि पातकाच्या राशी समस्त । उदी मस्तकीं फांसी तो ॥१४४॥
एवं ब्रम्हार्थिया ब्रम्हानिरू पण । हें तों केवळ निमित्त जाण । जीवशिवैक्यतेची खूण । भक्तां संपूर्ण कथियेली ॥१४५॥
आतां महाराजांची एवढी । अतुल प्रज्ञा विद्या गाढी । असतां थट्टेची काय प्रौढी । काय आवडी निनोदीं ॥१४६॥
सहज शंका घेईल मन । परी पाहतां विचारून । एकचि आहे समाधान । सावधान परिसिंजे ॥१४७॥
मुलांबाळांसवें बोलतां । तयांच्या बोबडया बोलांत रमतां । प्रौढत्वाच्या कथा वार्ता । कधींही होतात काय कीं ॥१४८॥
नसतें प्रेम का तयांवरी । तें काय वर्णूं शकेल वैखरी । परी बोधप्रदान कुसरी । विनोद मस्करी ही एक ॥१४९॥
काय आहे रोग पोटीं । हे काय आहे बाळास द्दष्टी । मातेस पाजावी लागे गुटी । जरी तें हट्टी पिईना ॥१५०॥
कधीं अंजारून गोंजारून । कधीं नेत्र पिंजारून । कधीं चतुर्दशरत्नप्रयोजन । कधीं आलिंगन सप्रेम ॥१५१॥
तींच होऊं लागतां प्रौढ । करावें वाटे तयांचें कोड । परी बुद्धि तीव्र वा बोजड । तैसाच निवाड ज्ञानाचा ॥१५२॥
तीव्र बुद्धीचें तीव्र ग्रहण । उपदेश ठरतां नलगे क्षण । तेंच जडबुद्धीचें विलक्षण । बहुत रक्षण सायास ॥१५३॥
समर्थ साई ज्ञाननिधी । जया भक्ताची जैसी बुद्धी । आधीं निर्धारून पात्रशुद्धि । ज्ञानसमृद्धि वितरत ॥१५४॥
तयांस पूर्ण अंतर्ज्ञान । तयांस आधींच सर्वांची जाण । जयास जैसें योग्य साधन । तयाचें नियमन तैसेंच ॥१५५॥
जैसा जयाचा अधिकार । तयाचा आधींच करूनि विचार । योग्यायोग्यतेनुसार । भक्तांचा भार बाबांना ॥१५६॥
तैसेच आम्ही दिसाया थोर । परी त्या सिद्ध साईसमोर । खरेच आम्ही पोरांहूनि पोर । विनोदीं आतुर सर्वदा ॥१५७॥
विनोदाचे बाबा आगर । जे जे ठायीं जयासी आदर । तें तें यथेष्ट पुरवूनि समग्र । राखीत अव्यग्र भक्तांस ॥१५८॥
सुबुद्ध वा बुद्धिमंद । वाचितां प्रगटेल परमानंद । परिसतां वाढेल श्रवणछंद । मननें स्वानंद - संतुष्टी ॥१५९॥
आवर्तनीं परमार्थबोध । निदिध्यासनीं महदाल्हाद । सौख्य उपजेल अखंड निर्बाध । ऐसी अगाध ही लीला ॥१६०॥
भाग्यें जेणें अनुभव येथिला । यत्किंचितही असेल भोगिला । कायावाचामनें तो खिळिला । अतर्क्य लीला साईंची ॥१६१॥
हेमाड साईपायीं शरण । विनोदमार्गें ज्ञानप्रदान । भक्तकल्याण एक प्रयोजन । निमित्त जाण ब्रम्हार्थियां ॥१६२॥
पुढील अध्याय याहूनि गोड । श्रवणार्थियांचें पुरेल कोड । माझिया जीवींची गुप्त होड । फोड फोडोनि पुरविली ॥१६३॥
मी जाईन माधवापाशीं । बाबांचा निरोप देईन त्यांशी । पावेन कैसा अनुग्रहाशी । साद्यंतेंशीं परिसा जी ॥१६४॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । ब्रम्हाज्ञानकथनं नाम सप्तदशोऽध्याय: संपूर्ण ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥