॥ श्रीणगेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: । श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
गताध्यायांतीं कथानुसंधान । ठाकूरादिकां महापुरुषदर्शन । कैसें झालें तें करावें श्रवण । एकाग्र मन करोनि ॥१॥
काया तया वक्त्याच्या बोलें । श्रवणीं जें पडतां श्रोता न डोले । अंगींचा रोमांचही न हाले । व्यर्थ गेले ते बोल ॥२॥
जया श्रवणीं न श्रोते रिझले । बाष्पगद्नद कंठ न दाटले । नयनीं प्रेमानंदाश्रु न वाहिले । व्यर्थ गेलें तें कथन ॥३॥
वाणी बाबांची मनोहारिणी । उपदेशाची अलौकिक सरणी । जयांची प्रतिपदीं अभिनव करणी । मस्तक चरणीं तयांचे ॥४॥
न येतां दैव उदयासी । गांठी न पडे साधुसंतांशीं । तो जवळ असतां उशापाशीं । पापराशींस दिसेना ॥५॥
या प्रेमयाच्या सिद्धतेसी । नलगे जावें देशीं विदेशीं । मीच माझिया अनुभवासी । श्रोतियांसी कथितों कीं ॥६॥
पीर मौलाना नामें प्रसिद्धा । होते वांद्रें शहरीं सिद्धा । हिंदू पारशी परधर्मी प्रबुद्ध । घेती शुद्ध दर्शन तें ॥७॥
मी ए शहरचा न्यायाधीश । मुजावर तयांचा नाम इनूस । पाठ पुरविली रात्रंदिवस । यावया दर्शनास तयानें ॥८॥
हजारों लोक तेथें यावे । किमर्थ आपण तेथें जावें । भीदेभाडेच्या भरीं भरावें । आंचवावें निज लौकिका ॥९॥
ऐसें कांहीं मनीं भावावें । दर्शनास कधींही न जावें । आपणचि आपल्या छायेस भ्यावें । दुर्दैव यावें आडवें ॥१०॥
ऐसीं कित्येक वर्षें गेलीं । तेथूनि पुढें बदली झाली । पुढें जेव्हां ती वेळ आली । शिरडी जोडिली अखंड ॥११॥
तात्पर्य हा संतसमागम । अभाग्यास ना तेथें रिगम । होतां ईश्वरी कृपा हा सुगम । अन्यथा दुर्गम हा योग ॥१२॥
येविषयींची गोड कथा । श्रोतां सादर परिसिजे आतां । या संतांच्या अनादि संस्था । गुह्य व्यवस्था कैशा त्या ॥१३॥
यथाकाल - वर्तमान । जया जें जें आवडे स्थान । अवतार घेती कार्याकारण । परी ते अभिन्न परस्पर ॥१४॥
देशा - काल - वस्तु भिन्न । परी एकाची जी ऊणखूण । दुजा संत जाणे संपूर्ण । अंतरीं एकपण सकळिकां ॥१५॥
जैसीं सार्वभौम राजाचीं ठाणीं । वसविलीं असती ठिकठिकाणीं । तेथ तेथ अधिकारी नेमुनी । अबादानी संपादिती ॥१६॥
तैसाच हा स्वानंदसम्राटा । जागोजागीं होऊनि प्रकट । चालवी हा निजराज्यशकट । सूत्रे अप्रकट हालवी ॥१७॥
एकदां एक आंग्लविद्याविभूषित । बी. ए. या उपपदानें युक्त । जे हळू हळू मागे क्रमत । झाले नामांकित अधिकारी ॥१८॥
मिळाली पुढें मामलत । वाडतां वाढतां झाले प्रांत । तयांसी साईबाबांचा सांगात । सुदैवें प्राप्त जाहला ॥१९॥
दिसाया ही मामलत बरी । डोंगरी जैसी दुरुनि साजरी । निकट जातां वेढिली काजरीं । मानें परी ती मोठीच ॥२०॥
गेले ते पूर्वील गोड दिवस । जैं होती या अधिकाराची हौस । प्रजाही मानी अधिकारियास । परस्परांस आनंद ॥२१॥
पुसूं नये आतांचे हाल । सुखाची नोकरी गेला तो काळ । आतां जबाबदारीचा सुकाळ । ओला दुकाळ पैशाचा ॥२२॥
पूर्वील मामलतीचा मान । तैसेंच पूर्वील प्रांतासमान । वैभव आतां ये ना दिसून । नोकरी कसून करतांही ॥२३॥
असो तेंही अधिकारसंपादन । अलोट पैका वेंचल्यावांचून । न करितां सतत अभ्यासशीण । इतर कोण करूं शके ॥२४॥
आधीं होऊं लागे बी. ए. । मग तो नगदी कारकून होये । महिना पगार तीस रुपये । मार्गें ऐसिये ती गति ॥२५॥
यथाकाळ घांटावर जावें । जमीनपाणी काम शिकावें । मोजणीदारांमध्यें रहावें । पास व्हावें परीक्षे ॥२६॥
पुढें जेव्हां एकादी असामी । स्वयें जाईल वैकुंठधामीं । करील आपुली जागा रिकामी । पडेल कामीं ती याच्या ॥२७॥
आतां असो हें चर्हाट । कशास पाहिजे नुसती वटवत । ऐशा एकास साईंची भेट । झाली ती गोष्ट परिसावी ॥२८॥
बेळगांवानिकट देख । ग्राम आहे वडगांव नामक । आलें मोजणीदारांचें पथक । मुक्काम एक तैं केला ॥२९॥
गांवीं होते एक सत्पुरुष । गेले तयांचे दर्शनास । चरणांवरी ठेविलें शीस । प्रसाद - आशीष पावले ॥३०॥
त्या सत्पुरुषांचे हातांत । होता निश्चळदासकृत । ‘विचारसागर’ नामक ग्रंथ । जो ते वाचीत तैं होते ॥३१॥
पुढें कांहीं वेळ जातां । येतों म्हणूनि निघूं लागतां । ते साधू जें वदले उल्हासता । तया गृहस्था तें परिसा ॥३२॥
बरें आतां आपण यावें । या ग्रंथाचें अवलोकन करावें । तेणें तुमचे मनोरथ पुरावे । असावें हें लक्षांत ॥३३॥
तुम्ही पुढें निजकार्येद्देशें । जा्तां जातां उत्तर दिशे । मार्गांत महाभाग्यवशें । महापुरुषासीं दर्शन ॥३४॥
पुढील मार्ग ते दावितील । मनासी निश्चलता ते देतील । तेच मग उपदेशितील । ठसवितील निजबोध ॥३५॥
तेथील मग तें कार्य सरलें । जुन्नरास तेथूनि बदलले । नाणेंघाट चढणें आलें । ओढवलें तें संकट ॥३६॥
मार्ग तेथील अति बिकट । रेडयावरूनि चढती घाट । रेडा हाच तदर्थ शकट । आणिला निकट आरूढाया ॥३७॥
होतील पुढें मोठे अधिकारी । मिळतील घोडे गाडया मोटारी । आज तों घ्या रेडयाची हाजिरी । वेळ साजिरी करा कीं ॥३८॥
घाट चढणें अशक्य पायीं । रेडियावीण नाहीं सोई । ऐसी ती नाणेंघाटाची नवलाई । अपूर्वाई वाहनाची ॥३९॥
मग तयांनीं केला विचार । पालणिला रेडा केला तयार । तयावरी चढविलें खोगीर । कष्टें स्वार जाहले ॥४०॥
स्वार खरे पण होती चढण । रेडियासारिखें अपूर्व वाहन । झोंके हिसके खातां जाण । भरली कणकण पाठींत ॥४१॥
असो पुढें हा प्रवास सरला । जुन्नराचा कार्यक्रम पुरला । मग बदलीचा हुकूम झाला । मुक्काम हालला तेथूनि ॥४२॥
कल्याणास झाली बदली । चांदोरकरांची गांठ पडली । साईनाथांची कीर्ति ऐकिली । बुद्धि उदेली दर्शनाची ॥४३॥
दुसरे दिवशीं आली बारी । झाली चांदोरकरांची तयारी । म्हणती चला हो बरोबरी । करूं वारी शिरडीची ॥४४॥
घेऊं बाबांचें दर्शन । करूं उभयतां तयांसी नमन । राहूं तेथें एक दो दिन । येऊं परतोन कल्याणा ॥४५॥
परी तेच दिनीं ठाणें शहरांत । दिवाणीचे अदालतींत । मुकदमा - सुनावणी निर्णीत । त्यागिली सोबत तदर्थ ॥४६॥
नानासाहेब आग्रह करीत । चला हो आहेत बाबा समर्थ । पुरवितील तुमचा दर्शनार्थ । किंपदार्थ्तो मुकदमा ॥४७॥
परी हें कैंचें तयांस पटे । तारीख चुकवितां भय वाटे । चुकतील केवीं हेलपट्टे । भालपट्टीं लिहिलेले ॥४८॥
नानासाहेब चांदोरकरें । कथिलीं पूर्वील प्रत्यंतरें । दर्शनकाम धरितां अंतरें । विन्घ तें सरे बाजुला ॥४९॥
परी येईना विश्वास जीवा । करितील काय निजस्वभावा । म्हणती आधीं घोर चुकवावा । निकाल लावावा दाव्याचा ॥५०॥
असो मग ते ठाण्यास गेले । चांदोरकर शिरडीस निघाले । दर्शन घेऊनि परत फिरले । नवल वर्तलें इकडे पैं ॥५१॥
वेळीं जरी हे हजर राहिले । दाव्याचें काम पुढें नेमिलें । चांदोरकरही हातचे गेले । खजील अंतरीं ॥५२॥
विश्वास ठेवितों बरें होतें । चांदोरकर सवें नेते । दर्शनाचें कार्य उरकतें । स्वस्थचित्तें शिरडींत ॥५३॥
दाव्यापरी दावा राहिला । साधुसमागमही अंतरला । उठाउठी निश्चय केला । जावयाला शिरडीस ॥५४॥
न जाणों मी शिरडीस जातां । समयीं नानांची भेट होतां । स्वयें निरवितील साईनाथा । आनंद चित्ता होईल ॥५५॥
शिरडीस नाहीं कोणी परिचित । तेथ मी सर्वथैव अपरिचित । नाना भेटतां होईल उचित । जरी व्कचित योग तो ॥५६॥
ऐसे विचार करीत करीत । बैसले ते अग्निरथांत । दुसरे दिवशीं पावले शिरडींत । नाना तैं अर्थात् नाहींत ॥५७॥
हे जे दिनीं यावया निघाले । नाना ते दिनीं जावया गेले । तेणें हे बहु हताश झाले । अति हिरमुसले मनांत ॥५८॥
असो मग तयांस तेथें भेटले । तयांचे दुसरे स्नेही भले । तयांनीं साईंचें दर्शन करविलें । हेतु पुरविले मनाचे ॥५९॥
दर्शनें पायीं जडलें चित्त । घातला साष्टांग दंडवत । शरीर झालें पुलकांकित । नयनीं स्रवत प्रेमाश्रु ॥६०॥
मग ते होतां क्षणैक स्थित । काय तयांसी बाबा वदत । त्रिकालज्ञ मुख करोनि सम्सित । सावचित्त तें परिसा ॥६१॥
"कानडी आप्पाचें तें सांगणें । जैसें रेडिया संगें घाट चढणें । ऐसें न येथील सोपें चालणें । अंग झिजविणें अनिवार्य" ॥६२॥
कर्णीं पडतां खुणेचीं अक्षरें । अंतरंग अधिकचि गहिंवरे । पूर्वील सत्पुरुषवचन खरें । प्रत्यंतरें ठरलें कीं ॥६३॥
मग जोडूनियां उभय हस्तां । साईपदीं ठेविला माथा । म्हणती कृपा करा साईनाथा । मज अनाथा पदरीं घ्या ॥६४॥
आपणचि माझे महापुरुष । निश्चळदासग्रंथोपदेश । आज मज कळला अशेष । निर्विशेष सुखबोध ॥६५॥
कुठें वडगांव कुठें शिरडी । काय ही सत्पुरुष - महापुरुषजोडी । किती ती स्वल्पाक्षरभाषा उघडी । उपदेश - निरवडी कैसी हे ॥६६॥
एक म्हणती ग्रंथ वाचा । पुढें संगम महापुरुषाचा । मग ते पुढील कर्तव्याचा । उपदेश साचा करतील ॥६७॥
देवयोगें तेही भेटले । तेच ते हे खुणांहीं पटविलें । परी तें एकाचें वाचिलें । दुजिया आचरिलें पाहिजे ॥६८॥
तयांसी म्हणती साईनाथ । "अप्पांनीं सांगितलें तें यथार्थ । परी जेव्हां तें येईल कृतींत । पूर्ण मनोरथ तैं होती" ॥६९॥
निश्चलदास - विचारसागर । वडगांवीं भक्तार्थ झाला उच्चार । काळें ग्रंथपाराणानंतर । शिरडींत आचार कथियेला ॥७०॥
ग्रंथ करावा आधीं श्रवण । त्याचेंच मग करावें मनन । होतां पारायणावर्तन । निदिध्यासन होतसे ॥७१॥
वाचिलें तें नाहीं संपलें । पाहिजे तें कृतींत उतरलें । या उपडया घडयावर तोय ओतलें । तैसें जाहलें तें सकळ ॥७२॥
व्यर्थ व्यर्थ ग्रंथवाचन । हातीं न ये जों अनुभवज्ञान । ब्रम्हासंपन्न गुरुकृपेवीण । पुस्तकी ज्ञान निष्फळ ॥७३॥
ये अर्थींची अल्प कथा । दावील भक्तीची यथार्थता । पुरुषार्थाची अत्यावश्यकता । श्रोतां निजस्वार्था परिसिजे ॥७४॥
एकदां एक पुण्यपट्टणकर । नामें अनंतराव पाटणकर । साईदर्शनीं उपजला आदर । आले सत्वर शिर्डीस ॥७५॥
वेदान्त श्रवण जाहला सकळ । सटीक उपनिषदें वाचिलीं समूळ । परी तन्मानस अक्षयीं चंचळ । राहीना तळमळ तयांची ॥७६॥
घेतां साईसमर्थांचें दर्शन । निवाले पाटणकरांचे नयन । करुनि पायांचें अभिवंदन । यथोक्त पूजन संपादिलें ॥७७॥
मग होऊनि बद्धांजुळी । बैसूनि सन्मुख बाबांचे जवळी । अनंतराव प्रेमसमेळीं । करुणाबहाळीं पुसत कीं ॥७८॥
केलें विविध ग्रंथावलोकन । वेदवेदांग - उपनिषदध्ययन ॥ केलें सच्छास्त्र - पुराणश्रवण । परी हें निर्विण्ण मन कैसें ॥७९॥
वाचिलें तें व्यर्थ गेलें । ऐसेंच आतां वाटूं लागलें । अक्षरहीन भावार्थी भले । वाटती चांगले मजहून ॥८०॥
वायां गेलें ग्रंथावलोकन । वायां शास्त्रपरिसीलन । व्यर्थ हें सकळ पुस्तकी ज्ञान । अस्वस्थ मन हें जोंवरी ॥८१॥
काय ती फोल शास्त्रव्युत्पत्ती । किमर्थ महा - वाक्यानुवृत्ती । जेणें न लाधे चित्तास शांति । ब्रम्हासंवित्ति काशाची ॥८२॥
कर्णोपकर्णीं परिसिली वार्ता । साईदर्शनें निवारे चिंता । विनोद गोष्टी वार्ता करितां । सहज सत्पथा लाविती ते ॥८३॥
म्हणवून महाराज तपोराशी । पातलों आपुल्या पायांपासीं । येईल स्थैर्य माझिया मनासी । आशीर्वचनासी द्या ऐशा ॥८४॥
तंव महाराज झाले कथिते । एका विनोदपर आख्यायिकेतें । जेणें अनंतराव समाधानातें । पावले साफल्यते ज्ञानाच्या ॥८५॥
ती अल्पाक्षर परमसार । कथा कथितों व्हा श्रवणतत्पर । विनोद परी तो बोधपर । कोण अनादर करील ॥८६॥
बाबा देत प्रत्युत्तर । "एकदां एक आला सौदागर । तेव्हां एक घोडें समोर । घाली लेंडर नवांचें ॥८७॥
सौदागर निजकार्यतत्पर । लेंडिया पडतां पसरिला पदर । बांधून घेतां घट्ट्त्या समग्र । चित्तैकाग्र्य लाधला" ॥८८॥
हें काय वदले साईसमर्थ । काय असावा कीं मथितार्थ । लेंडिया संग्रही सौदागर किमर्थ । कांहींही अर्थ कळेना ॥८९॥
ऐसा विचार करीत करीत । अनंतराव माघारा येत । कथिलें संभाषण इत्थंभूत । केळकरांप्रत तयानें ॥९०॥
म्हणती सौदागर तो कोण । लेंडियांचें काय प्रयोजन । नवांचेंच काय कारण । सांगा उलगडून हें मजला ॥९१॥
दादा हें काय आहे कोडें । मी अल्पबुद्धी मज तें नुलगडे । होईल बाबांचे ह्रदय उघडें । ऐसें रोकडें मज कथा ॥९२॥
दादा वदती मजही न कळे । ऐसेंच बाबांचें भाषण सगळें । परी तयांच्याच स्फूर्तीच्या बळें । कथितों आकळे जें मज ॥९३॥
कृपा ईश्वरी तें हें घोडें । हें तों नवविधा भक्तीचें कोडें । विनाभक्ति न परमेश्वर जोडे । ज्ञाना न आतुडे एकल्या ॥९४॥
श्रवण - कीर्तन - विष्णुस्मरण । चरणसेवन-अर्चन - वंदन । दास्य - सख्य - आत्मनिवेदन । भक्ति हे जाण नवविधा ॥९५॥
पूर्ण भाव ठेवूनि अंतरीं । यांतून एकही घडाली जरी । भावाचा भुकेला श्रीहरी । प्रकटेल घरींच भक्ताच्या ॥९६॥
जपतपव्रत योगसाधन । वेदोपनिषद - परिशीलन । उदंड अध्यात्मज्ञान - निरूपण । भक्तिविहीन तें फोल ॥९७॥
नको वेदशास्त्रव्युत्पत्ती । नको ज्ञानी हे दिगंतकीर्ति । नको शुष्कभजनप्रीती । प्रेमळ भक्ति पाहिजे ॥९८॥
स्वयें आपणा सौदागर समजा । सौद्याच्या या भावार्था उमजा । फडकतां श्रवणादि भक्तीची ध्वजा । ज्ञानराजा उल्हासे ॥९९॥
घोडयानें घातल्या लेंडया नऊ । सौदागर आतुरते धांवत घेऊं । तैसाच नवविधा भक्तिभावु । धरितां विसांवु मनातें ॥१००॥
तेणेंच मनास येईल स्थैर्य । सर्वांठायीं सद्भाव गांभीर्य । त्यावीण चांचल्य हें अनिवार्य । कथिती गुरुवर्य सप्रेम ॥१०१॥
दुसरे दिवशीं अनंतराय । वंदूं जातां साईंचे पाय । "पदरीं बांधिल्यास लेंडया काय" पृच्छा ही होय तयांस ॥१०२॥
अनंतराव तेव्हां प्रार्थिती । कृपा असावी दीनावरती । सहज मग त्या बांधिल्या जाती । काय ती महती तयांची ॥१०३॥
तंव बाबा आशीर्वाद देती । ‘कल्याण होईल’ आश्वासिती । अनंतराव आनंदले चित्तीं । सुखसंवित्ति लाधले ॥१०४॥
आतां आणीक अल्पकथा । श्रोतां परिसिजे सादरचित्ता । कळेल बाबांची अंतर्ज्ञानिता । सन्मार्गप्रवर्तकता तैसीच ॥१०५॥
एकदां एक वकील आले । येतांक्षणींच मशिदी गेले । साईनाथांचें दर्शन घेतलें । पाय वंदिले तयांचे ॥१०६॥
सवेंच मग देऊणा । बैसले बाजूस वकील तत्क्षणा । तेथें चालल्या साई - संभांषणा । आदर श्रवणा उपजला ॥१०७॥
बाबा तंव तिकडे मुख फिरविती । वकीलांस अनुलक्षून वदती । बोल ते वर्मीं जाऊन खोंचती । वकील पावती अनुताप ॥१०८॥
"लोक तरी हो लबाड किती । पायां पडती दक्षिणाही अर्पिती । आणीक आंतून शिव्याही देती । काय चमत्कृती सांगावी" ॥१०९॥
ऐकून हें वकील स्वस्थ राहिले । कीं ते निजांतरीं पूर्ण उमजले । उद्नार अन्वर्थ हें तयां पटलें । तात्पर्य ठसलें मनासी ॥११०॥
पुढें जेव्हां ते वाडयांत गेले । दीक्षितांलागीं कथिते झाले । कीं जें बाबा लावूनि बोलले । सार्थचि वहिलें तें सर्व ॥१११॥
येतांच मजवर झाडिला ताशेरा । तो मज केवळ दिधला इशारा । कुणाची थट्टानिंदादि प्रकारा । देईं न थारा अंतरीं ॥११२॥
शरीरप्रकृति होऊनि अस्वस्थ । मुन्सफ आमुचे जाहले त्रस्त । राहिले रजेवर येथें स्वस्थ । आपुली प्रकृती सुधरावया ॥११३॥
वकीलांच्या खोलींत असतां । मुन्सफांसंबंधें निघाल्या वार्ता । अर्थोअर्थीं संबंध नसतां । ऊहापोहता चालली ॥११४॥
औषधावीण या शरीरापदा । टळतील का लागतां साईंच्या नादा । पावले जे मुन्सफीचे पदा । तयां हा धंदा साजे कां ॥११५॥
ऐसी तयांची निंदा चालतां । चालली साईंची उपहासता । मीही तयांतचि होतों अंशता । तिची अनुचितता दर्शविली ॥११६॥
ताशेरा नव्हे हा अनुग्रह । व्यर्थ कुणाचा ऊहापोह । उपहास - निंदादि कुत्सित संग्रह । असत्परिग्रह वर्जावा ॥११७॥
आणीक एक हें प्रत्यंतर । असतां शंभर कोसाचें अंतर । साई जाणें सर्वाभ्यंतर । खरे अंतर्ज्ञानी ते ॥११८॥
आणिक एक झाला निवाड । असोत मध्यें पर्वत पहाड । कांहीं न साईंच्या द्दष्टीआड । गुप्तही उघड त्यां सर्व ॥११९॥
असो पुढें तेव्हांपासुनी । केला निश्चय वकीलांनीं । अत:पर निंदा - दुरुक्तिवचनीं । खडा कानीं लाविला ॥१२०॥
आपण कांहींही कुठेंही करितां । येई न साईंची द्दष्टी चुकवितां । येविषयीं जाहली निश्चितता । असत्कार्यार्थता विराली ॥१२१॥
उदेली सत्कार्य - जागरूकता । मागें पुढें साईसन्निधता । समर्थ कोण तया वंचिता । निर्धार चित्ता हा ठासला ॥१२२॥
पाहूं जातां या कथेसी । संबंध जरी त्या वकीलासी । तरी ती सर्वार्थी आणि सर्वांसीं । बोधक सर्वांसी सारिखी ॥१२३॥
वकील वक्ते श्रोते समग्र । आणिक साईंचे भक्त इतर । तयांचाही ऐसाच निर्धार । व्हावा मी साचार प्रार्थितों ॥१२४॥
साईकृपामेघ वर्षतां । होईल आपणां सर्वांची तृप्तता । ये अर्थीं कांहीं नाहीं नवलता । सकळां तृषार्तां निववील ॥१२५॥
अगाध साईनाथांचा महिमा । अगाध तयांच्या कथा परमा । अगाध साईचरित्राची सीमा । मूर्त परब्रम्हावतार ॥१२६॥
आतां पुढील अध्यायीं कथा । परिसावी सादर श्रद्धाळू श्रोतां । पुरवील तुमच्या मनोरथा । देईल चित्ता स्थैर्यता ॥१२७॥
भक्तांची भावी संकटावस्था । ठाऊक आधींच साईसमर्था । थट्टामस्करी विनोद वार्ता । हंसतां खेळतां टाळिती ॥१२८॥
भक्तहेमाड साईंस शरण । जाहलें हें कथानक संपूर्ण । पुढील कथेचें अनुसंधान । संकटनिवारण भक्तांचें ॥१२९॥
कैसे साई कृपासागर । भक्तांचीं भावी संकटें दुर्धर । आधीं जाणूनि करिती परिहार । इशारा वेळेवर देउनी ॥१३०॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । अनुग्रहकरणंनाम एकविंशोऽध्याय: संपूर्ण" ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥