॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ श्रीकुलदेवतायै नम: ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नम: ॥ श्रीसद्नुरुसाईनाथाय नम: ॥
आतां हा अध्याय करितां सुरू । जया अत्यंत श्रवणादरू । ऐसा श्रोता लागला विचारूं । गुरु कीं सद्नुरु श्रीसाई ॥१॥
तयाचिया समाधाना । कथूं सद्नुरूच्या संक्षिप्त लक्षणा । जेणें श्रीसाईसमर्थचरणां । मिळतील खुणा सद्नुरूच्या ॥२॥
येयूनि प्राप्त वेदाध्ययन । अथवा साही शास्त्रांचें ज्ञान । जिंहीं करविलें वेदान्तनिरूपण । ज्ञाते न सद्नुरु म्हणती तया ॥३॥
कोणी एक वायु कोंडिती । तप्त मुद्रा धारण करिती । ब्रम्हानुवादें श्रोतयां रिझविती । ज्ञाते न सद्नुरू म्हणती तया ॥४॥
शिष्यां शास्त्रोक्त मंत्रही देती । जप करावया आज्ञा करिती । होईल केव्हां फलप्राप्ती । विश्वास न चित्तीं कोणाही ॥५॥
तत्त्वनिरूपण अति रसाळ । शब्दज्ञान अघळपघळ । स्वानुभवाचा मात्र दुष्काळ । शाब्दिक पोकळ तें ज्ञान ॥६॥
ऐकतेक्षणीं निरूपण नीट । उभय भोगांचा येईल वीट । परी अभुभवाची चवी चोखट । अनुभवी तोच प्रकटवी ॥७॥
असोनि संपूर्ण शब्दज्ञानी । पूर्णानुभवी अपरोक्षदानी ॥ त्याचाचि अधिकार शिष्यप्रबोधनीं । म्हणावें त्यालागोनि सद्नुरु ॥८॥
स्वयें ज्यातें अनुभव नाहीं । तो काय शिष्यातें देईल पाहीं । जया न अपरोक्ष अनुभव कांहीं । सद्नुरु कदाही न म्हणावा ॥९॥
शिष्यापासून घ्यावी सेवा ॥ स्वप्नींही न धरी ऐसिया भावा । उलट शिष्यार्थ निजदेह लागावा । इच्छी तो जाणा सद्नुरु ॥१०॥
शिष्य म्हणजे किंपदार्थ । गुरु काय तो श्रेष्ठांत श्रेष्ठ । ऐसिया अहंभावाविरहित । तोचि सद्नुरु हितकारी ॥११॥
शिष्य तोही पूर्णब्रम्हा । तयाठायींही पुत्रपेम । इच्छी न त्यापासाव योगक्षेम । सद्नुरु तो परम श्रेष्ठ जगीं ॥१२॥
परम शांतीचें जें निधान । विद्वत्तेचा न जेथें अभिमान । सान थोर समसमान । तेंच सद्नुरुस्थान जाणावें ॥१३॥
ऐसीं ही सर्वसाधारणें । सद्नुरूचीं संक्षिप्त लक्षणें । निवेदिलीं म्यां अनन्य - शरणें । श्रोतयांकारणें संकलित ॥१४॥
साईदर्शनें तुष्टले लोचन । तयां भाग्यवंतांलागून । मी काय याहूनि वर्णूं सकेन । सद्नुरुलक्षण हें सत्य ॥१५॥
जन्मोजन्मींचा पुण्यातिशय । गांठींस होता त्याचा संचय । तेणें हे आम्हांस लाधले पाय । या सद्नुरुराय साईंचे ॥१६॥
पूर्ण तारुण्यींही अपरिग्रह । निराधार ना वेस ना गृह । तमाखू चिलीम हा काय तो संग्रह । मनोनिग्रह भयंकर ॥१७॥
वर्षें अष्टादश असतां वय । तेव्हांपासूनही पूर्ण मनोजय । सदा एकांतीं वसावें वसावें निर्भय । लावूनि लय स्वरूपीं ॥१८॥
पाहोनि भक्तांची आवडी शुद्ध । ‘भक्तपराधीन मी’ हें ब्रीद । भक्तवृंदा दावावया विशद । भक्तप्रेमास्पद वर्ते जो ॥१९॥
जय प्रब्रम्हा सनातना । जय दीनोद्धारा प्रसन्नवदना । जय चैतन्यघना भक्ताधीना । दे निजदर्शना निजभक्तां ॥२०॥
जयजया जी द्वंद्वातीता । जयजया जी अव्यक्तव्यक्ता । सर्वसाक्षी सर्वातीता । अकळ अभक्तां सकळिकां ॥२१॥
जय जय भवसंतापहरणा । जय जय भवगजविदारणा । जय जय आश्रितप्रेमपूर्णा । संकटनिरसना सद्नुरुराया ॥२२॥
तुज अव्यक्तीं समरसतां । आकार पावला निराकारता । परी तव भक्तकल्याणकारिता । देह ठेवितांही न सरे ॥२३॥
देहीं असतां जी जी कृति । तोच समरसतां अव्यक्तीं । तेच अनुभव आजही भोगिती । जे तव भक्तीं लागले ॥२४॥
त्वां मज पामरा निमित्त करुनी । निरसावया अविद्यारजनी । प्रकट केला निजचरित्रतरणी । जो भक्तोद्धरणीं समर्थ ॥२५॥
आस्तिक्यबुद्धि श्रद्धास्थिती । हीच भक्तांची ह्रदयपणती । प्रेमस्नेहें उजळिजे वाती । ज्ञानज्योती प्रकटेल ॥२६॥
प्रेमावीण शुष्क ज्ञान । तयाचें कोणा काय प्रयोजन । विनाप्रेम न समाधान । प्रेम अविच्छिन्न असावें ॥२७॥
काय वानूं प्रेममहिमान । तयापुढें तुच्छ आन । गांठीं नसल्या प्रेम गहन । श्रवण वाचन निष्फळ ॥२८॥
प्रेमापाशीं नांदे भक्ति । तेथेंच अवघी शांती विरक्ति । तेथेंच पाठीं तिष्ठे मुक्ति । निजसंपत्तीसमवेत ॥२९॥
प्रेम नुपजे भावावीण । भाव तेथें देव जाण । भावापोटीं प्रेम पूर्ण । भावचि कारण भवतरणा ॥३०॥
गंगोदकासम पवित्र । परम गोड साईचरित्र । तेणेंचि त्याचें सजविलें स्तोत्र । निमित्तमात्र हेमाड ॥३१॥
श्रवण करितां साईसच्चरित । श्रोते वक्ते नित्यपूत । पापपुण्याचा होई घाट । नित्यमुक्त दोघेही ॥३२॥
भाग्यें आगळे ऐकतां श्रोत्र । भाग्यें आगळें वक्तयाचें वक्त्र । धन्य हें श्रीसाईस्तोत्र । अतिपवित्र निजभक्तां ॥३३॥
होऊनियां शुद्धचित्त । सद्भावे जे परिसती चरित । तयांचे ते सकळ मनोरथ । होतील सुफलित सदैव ॥३४॥
परम भावार्थें आदरेंसीं । ऐकती या सच्चरितासी । निजपदभक्ति अनायासीं । लाभे तयांसी अविलंबें ॥३५॥
भक्तिभावें साईचरण । सेवितां करितां साईस्मरण । होईना यथेच्छ इंद्रियाचरण । सहज भवतरण रोकडें ॥३६॥
भक्तचातकां निजजीवन । ऐसें हें साईसच्चरितकथन । श्रोतां श्रवणापाठीं मनन । कीजे आयतन श्रीकृपेचें ॥३७॥
सर्वावस्थीं सावधना । होऊनि श्रोतीं केलिया श्रवण । सहज होय भवतरण । कर्मबंधन तुटोन ॥३८॥
असो मनीं म्हणतील श्रोते । केव्हां हो आरंभ होणार कथेतें । दवडितों त्यांचिया अस्वस्थतेतें । प्रस्तावनेतें करोनि ॥३९॥
पूर्वाध्यायीं झालें कथन । वैर हत्या आणि ऋण । हीं फेडावया पुनर्जन्म । येई निजकर्म भोगावया ॥४०॥
तयांस नाहीं पूर्वस्मरण । परी या संतां कदा न विस्मरण । करिती निजभक्त - संकटनिवारण । असेना जनन कोठेंही ॥४१॥
तैसीच आतां दुसरी कथा । देतां घेतां बसतउठतां । संतांपायीं विश्वास ठेवितां । पावती सफलता निजभक्त ॥४२॥
कर्मारंभ करूं जातां । आधीं हरिगुरुचरण स्मरतां । तेच निवारिती निजभक्तचिंता । कर्मीं निजदक्षता ठेविलिया ॥४३॥
कर्म मात्र मी करणार । समर्थ हरिगुरु फल देणार । ऐसा ज्याचा द्दढ निर्धार । बेडा पार तयाचा ॥४४॥
संत आरंभीं उग्र भासती । तरी त्यांपोटीं लाभेंवीण प्रीति । अल्प धीर पाहिजे चित्तीं । करितील अंतीं कल्याण ॥४५॥
शापताप - संसृतिमाया । सत्संगाची पडतां छाया । ठाय़ींचे ठायींच जातील विलया । म्हणोनि त्या पायां विनटावें ॥४६॥
सविनय आणि अनुद्धत । होऊनि संतां शरणागत । प्रार्थावें त्यां निजगुजहित । देतील चित्त - स्वास्थ्यातें ॥४७॥
अल्पज्ञानाचिया अभिमानीं । संतवचनीं विकल्प मानी । होते त्या आधीं कैसी हानी । विश्वासें निदानीं कल्याण ॥४८॥
शुद्धमनें वा कपटें सर्वथा । खर्या संतांचे चरण धरितां । अंतीं पावे तो निर्मुक्तता । अगाध योग्यता संतांची ॥४९॥
ये अर्थीची बोधक कथा । श्रवण कीजे सावधानता । स्वानंदनिर्भर होईल श्रोता । तैसाचि वक्ता उल्लसित ॥५०॥
वकील अक्कलकोटनिवासी । सपटणेकर नाम जयांसी । परिसा तयांचे अनुभवासी । मन उल्लासित होईल ॥५१॥
वकीलीचा रात्रंदिवस । करीत असतां ते अभ्यास । भेटले विद्यार्थी शेवडे त्यांस । करीत विचारपूस परस्पर ॥५२॥
सहाध्यायीही इतर आले । तेथेंच खोलींत एकत्र बैसले । प्रश्न एकेकां पुसूं लागले । पहाया अभ्यासिलें पाडून ॥५३॥
पहावें कोठें कोणाचें चुकतें । कोणाचें उत्तर बरोबर येतें । करावें संशयनिवृत्तीतें । चित्तस्वस्थतेलागुनी ॥५४॥
शेवडे यांचीं चुकलीं उत्तरें । अंतीं म्हणाले विद्यार्थी सारे । कैसेनि यांची परीक्षा उतरे । अभ्यासिलें अपुरें सर्वचि ॥५५॥
केला जरी त्यांनीं उपहास । शेवडयांचा पूर्ण विश्वास । पुरा वा अपुरा अभ्यास । वेळीं मी पास होणार ॥५६॥
मी न जरी अभ्यास केला । माझा साईबाबा मजला । पास कराया आहे बैसला । करूं मी कशाला काळजी ॥५७॥
परिसतां ऐसिया बोलां । आश्चर्य वाटलें सपटणेकरांला । नेऊनि शेवडयांस एके बाजूला । पुसावयाला लागले ॥५८॥
अहो हे साईबाबा कोण । जयांचे एवढे वर्णितां गुण । जयांवर तुमचा विश्वास पूर्ण । वसतीचा ठाव कवण कीं ॥५९॥
मग त्या साईबाबांची महती । प्रत्युत्तरीं शेवडे कथिती । सवेंचि आत्मविश्वासस्थिती । तयांसी वदती प्रांजळपणें ॥६०॥
सुप्रसिद्ध नगर जिल्हा । त्यामाजील शिर्डी गांवाला । फकीर एक मशिदीं बैसला । असे बहु नांवाजला सत्पुरुष ॥६१॥
संत आहेत जागोजाग । परी तयांचे भेटीचा योग । गांठीस नसतां पुण्य अमोघ । प्रयत्नें हा सुयोग लाभेना ॥६२॥
विश्वास माझा पूर्ण त्यावर । करील तो जें तेंच होणार । वदेल वाचे तेंच घडणार । नाहीं तें चुकणार कल्पांतीं ॥६३॥
कितीही केल्या यंदा प्रयास । परीक्षेत मी होणार नापास । परी पुढील वर्षीं अप्रयास । होणार मी पास त्रिसत्य ॥६४॥
मज हें आहे त्यांचें आश्वासन । तयांवर माझा भरंवसा पूर्ण । होणें न त्यांचें अन्यथा वचन । गांठ मीं बांधून ठेविलीसे ॥६५॥
नवल काय ही तों होईल । होईल परीक्षा याच्याही पुढील । हास्यास्पद हे वाटले बोल । नि:संशय फोट सपटणेकरां ॥६६॥
विकल्पपूर्ण त्यांचें मन । त्यांना हें काय आवडे कथन । असो शेवडे गेले तेथून । परिसा तें वर्तमान पुढील ॥६७॥
पुढें कालें अनुभवांतीं । अन्वर्थ झाल्या शेवडयांच्या उक्ती । दोनीही परीक्षा पास होती । आश्चर्य चित्तीं सपटणेकरां ॥६८॥
पुढें जातां दहा सालें । सपटणेकर उद्विग्न झाले । दुर्दैव एकाएकीं ओढवलें । तंव ते पावले उदासता ॥६९॥
एकुलता एक मुलगा त्यांला । कंठरोगानें निधन पावला । सन एकूणीसशॆं तेरा सालाला । अत्यंत विटला संसारा ॥७०॥
आदिकरूनि पंढरपुर । गाणगापुरादि तीर्थें समग्र । झालीं परी न सुखावे अंतर । वाचिला नंतर वेदान्त ॥७१॥
ऐसा कांहीं काळ लोटतां । चित्तास कांहीं येते का शांतता । म्हणूनि मार्गप्रतीक्षा करितां । आठवला वृत्तांत शेवडयंचा ॥७२॥
शॆवडे यांचा निश्चय स्मरला । साइपदींचा विश्वास आठवला । आपणही जावें श्रीदर्शनाला । वाटलें मनाला तयांच्या ॥७३॥
संतदर्शानीं धरिला हेत । सन कोणीसशें तेरा सालांत । शिर्डीस जाण्याचा झाला बेत । निघाले समवेत बंधूच्या ॥७४॥
निमित्त शेवडे यांचें स्मरण । वंदावया आपुले चरण । साईच तयां करिती पाचारण । तें सावचित्त श्रवण करा ॥७५॥
पंडितराव कनिष्ठ सहोदर । तयां घेऊनियां बरोबर । संतदर्शना सपटणेकर । निघाले सपरिवार शिर्डीस ॥७६॥
असो ते दोघे तेथें आले । येतां श्रींच्या दर्शना निघाले । दुरूनि बाबांचें दर्शन झालें । अत्यंत धाले चित्तांत ॥७७॥
दुरूनि परी ती डोळेभेट । होतांच सत्वर गेले निकट । दोघेही जोडूनि करसंपुट । समोर तिष्ठत बाबांचे ॥७८॥
दोघेही ते अति विनीत । बाबांसन्मुख लोटांगणीं येत । श्रीफल साईचरणीं समर्पीत । शुद्धमावान्वित सप्रेम ॥७९॥
श्रीफल अर्पितां सपटणेकर । समर्थांचिया चरणांवर । ''चल हट'' शब्दें बाबा धिक्कार । करीत सपट्णेकर यांचा ॥८०॥
सपटाणेकर चिंताग्रस्त । बाबा व्हावे कां संतप्त । मनीं म्हणती बाबांचे परिचित । पाहूनि त्यां इंगित पुसावें ॥८१॥
दर्शनें जे व्हावे प्रसन्न । तेच या शब्दें अत्यंत खिन्न । होऊनि सचिंत अधोवदन । बैसले सरकून माघारां ॥८२॥
आतां कोणापासीम जावें । कोणा भक्तालगीं पुसावें । काय बाबांच्या बोलांत असावें । मनोगत पुसावें कोणास ॥८३॥
ऐसा त्यांचा पाहूनि भाव । कोणी त्यांचिया समाधानास्तव । कथितां बाळा शिंप्याचें नांव । शोधिला ठाव तयाचा ॥८४॥
तयालागीं सपटणेकर । निवेदिते झाले वृत्तांत साग्र । म्हणाले बाबा माझा धिक्कार । करिती अत्युग्रवाचेनें ॥८५॥
तुम्ही तरी मजसवें यावें । दर्शन शांतपणें करवावें । कृपावलोकन बाबांचें व्हावें । कोपा न यावें आम्हांवरी ॥८६॥
असो हें बाळानें मान्य केलें । सपटणेकर निश्चिंत झाले । फोटो बाबांचे विकत आणविले । दर्शना निघाले बाबांच्या ॥८७॥
बाळा शिंपी होता संगतीं । फोटो घेऊनि आपुले हातीं । बाळा मग देऊनि बाबांप्रती । बाबांस विज्ञप्ति करिताहे ॥८८॥
काय हें देवा कसलें चित्र । पाहूनि बाबा देती उत्तर । हा फोटो आहे याचा यार । बोटानें सपटणेकर दावीत ॥८९॥
ऐसें बोलूनि बाबा हांसले । मंडळीसही हांसूं आलें । बाबा काय हो इंगित यांतलें । बाळानें पुसिलें बाबांस ॥९०॥
तात्काळ बाळा सपटणेकरां । म्हणे घ्या दर्शन करा त्वरा । मग ते करितां नमस्कारा ''चल हट'' उद्नारां परिसिलें ॥९१॥
तेंच पूर्वील ''चल हट'' । अजून माझी पुरवी पाठ । आतां काय करावी वाट । आश्चर्य उद्भट सपटणेकरां ॥९२॥
मग ते दोघे जोडूनि कर । तिष्ठत असतां बाबांसमोर । ‘निघूनि जा जेथूनि सत्वर’ । आज्ञा त्यां अखेर बाबांची ॥९३॥
वाक्य तुमचें स्वामीसमर्था । अनुश्ल्लंघ्य कोणाही सर्वथा । काय आम्हां पामरांची कथा । निघालों आतां येच घडी ॥९४॥
ऐकोनि आपण महाउदार । दर्शना आलों तों धिक्कार ''चल हट'' शब्दें आमुचा सत्कार । काय हा चमत्कार कळेना ॥९५॥
तेव्हां असावें कृपावलोकन । द्यावें आम्हां आशीर्वचन । व्हावें सत्वर पुनर्दर्शन । ऐसें आश्वासन मागितलें ॥९६॥
ऐसा कोण आहे ज्ञानी । जाणेल काय बाबांचे मनीं । परंतु झालेली आज्ञा मानुनी । गेले स्वस्थानीं माघारां ॥९७॥
ऐसें हें त्यांचें प्रथम दर्शन । तेणें ते दोघे अति उद्विग्न । गेले आपुले गांवा परतोन । यत्किंचित विलंब न करितां ॥९८॥
पुढें आणीक वर्ष गेलें । तरीही न मन स्थिर झालें । पुनश्च गाणगापुर केलें । चित्त भडकलें अधिकचि ॥९९॥
विश्रांत्यर्थ सपटणेकर । गेले माढेगांवीं नंतर । काशीक्षेत्रीं जाण्याचा विचार । केला कीं अखेर तयांनीं ॥१००॥
आतां काशीस निघावयास । उरले अवघे दोनच दिवस । झाला द्दष्टान्त निजकांतेस । राहिला प्रवास काशीचा ॥१०१॥
द्दष्टान्ताचा चमत्कार । कैसा त्याचा अभिनव प्रकार । कथितों व्हावें श्रवणतत्पर । लीलाचरित्र साईंचें ॥१०२॥
झोंपेंत असतां शेजेवर । स्वप्नसृष्टी डोळ्यांसमोर । बाई घेऊनियां घागर । जाई विहिरीवर लक्कडशाचे ॥१०३॥
तेथें एका निंबातळी । डोईस जो फडका गुंडाळी । ऐसा एक फकीर ते वेळीं । म्हणे मजजवळी पातला ॥१०४॥
''कां व्यर्थ श्रमसी बाळ'' । फकीर उद्नारला स्वरें कोमळ । ''भरूनि देतों तुझी ही सकळ । घागर निर्मळ उदकेंसीं'' ॥१०५॥
वाटली भीति फकीराची । घेऊनि घागर रिकामीचि । वाट माघारा धरिली घराची । सवें मागेंमागेंचि फकीर ॥१०६॥
ऐसियेपरि पाहूनि स्वप्न । जागा झालें उघडले नयन । परिसूनि कांतास्वप्ननिवेदन । नेमिलें गमन शिर्डीचें ॥१०७॥
तेच मुहूर्तीं दोघें निघालीं । उदईक शिर्डीग्रामा पातलीं । येतांच मशिदीमाजीं गेलीं । बाबा ते कलीं लेंडीवर ॥१०८॥
बाबा परत येईपर्यंत । बैसतीं झालीं दोघेंही तेथ । बाबांची मार्गप्रतीक्षा करीत । बाबा तंव इतुक्यांत पातले ॥१०९॥
मूर्ति जी देखिली द्दष्टान्तांत । तीच ती पाहूनि नकशिखान्त । बाई जाहली विस्मयान्वित । मग ती न्याहाळीतचि राहिली ॥११०॥
होता बाबांचें पादक्षालन । बाई गेली घ्यावया दर्शन । करोनि साईपदाभिवंदन । बैसली अवलोकन करीतचि ॥१११॥
पाहोनि तियेची विनीतता । उल्लास साईनाथांचे चित्ता । बाबांनीं हळूच आरंभिली कथा । बाईची व्यथानिवारक ॥११२॥
तेव्हां नित्यक्रमानुसार । बाबा आपुलीच व्यथा सविस्तर । निवेदूं लागले प्रेमपुर:सर । तत्रस्थ एक्या तिसर्यास ॥११३॥
पाहूं जातां बाईची कथा । बाईस सांगावयाची असतां । तिच्यासमक्ष तिसर्यास कथितां । परिसिली अतिसावधानता बाईनें ॥११४॥
''माझे हात पोट कंबर । बहुत दिवस दुखे अनिवार । औषधें करितां झालों बेजार । होईना परिहार व्यथेचा ॥११५॥
कंटाळलों मीं औषधें खातां । गुण म्हणून येईना तत्त्वतां । परी मज आश्चर्य वाटे आतां । गेली कीं व्यथा एकाएकीं'' ॥११६॥
ऐसी ही कथा तिजिया कथितां । बाईचा नामनिर्देशही न करितां । तियेचीच ही वार्ता सर्वथा । संबंध हा होता तियेचा ॥११७॥
पुढें मासादोंमासांअंतीं । बाबांनीं आपुली जी वर्णिली होई । त्याच तियेच्या व्यथेची निवृत्ति । झाली तंव प्रतीति पटली तिला ॥११८॥
पूर्ण झाली बाईची कामना । तंव सपटणेकर घेती दर्शना । त्यांची पूर्वील ''चल हट'' संभावना । बाबांनीं पुन्हां केलीच ॥११९॥
न कळे काय माझी चूक । धिक्कारिती मज बाबा अचूक । नमस्कारितां उत्तर एक । मजला ठराविक तयांचें ॥१२०॥
काय कीं माझें पूर्वार्जित । मजवरीच कां रागेजत । इतरांपाशीं माझियादेखत । वर्तत अत्यंत प्रेमानें ॥१२१॥
पाहूं जातां सांजसकाळीं । बाबांपाशीं अवघी मंडळी । आनंदें अनुभवीत नित्य दिवाळी । माझेच कपाळीं ‘चल हट्’ ॥१२२॥
कांहीं माझें कर्म विकोपा । गेलें पावलों धर्मविलोपा । आश्रय झालों अनंत पापा । तेणेंच ही अवकृपा मजवरी ॥१२३॥
आरंभीं मी बाबांविषयीं । होतों कुतर्की तैसाच संशयी । तेणेंच वाटलें ऐसिया उपायीं । बाबाच मज ठायीं पाडीत ॥१२४॥
म्हणूनि केला निजनिर्धार । अनुग्रह बाबांचा होयतोंवर । तेथेंच वृत्ति ठेवूनि स्थिर । रहावें सुस्थिर मानसें ॥१२५॥
त्रिविधतापें तापलेला । वरी साईंच्या दर्शना भुकेला । ऐसा कोण विन्मुख गेला । जो न निवाला अंतरीं ॥१२६॥
तरी ते दिवसीं अति उद्विग्न । गोड न लागे अन्नपान । गोड न लागे गमनागमन । उन्निद्रनयन शेजेवर ॥१२७॥
जवळ नाहीं कोणी अवांतर । बाबाच एकले असती गादीवर । साधूनियां ऐसा अवसर । धरावे चरण बाबांचे ॥१२८॥
करीत निश्चय सपटणेकर । फळासि आला त्यांचा निर्धार । होऊनियां सद्नदितांतर । धरीत चरण बाबांचे ॥१२९॥
पायांवरी ठेवितां शिर । बाबा तयावर ठेवीत निजकर । पादसंवाहन करीत सपटणेकर । आली एक बाई धनगर तों ॥१३०॥
बाई येतांच तेथवर । रगडूं बैसली बाबांची कंबर । बाबा नित्यक्रमानुसार । वार्ता तिजबरोबर करितात ॥१३१॥
वार्तेचा त्या चमत्कार । लक्षपूर्वक सपटणेकर । ऐकतां ती त्याचीच समग्र । अक्षरें अक्षर आढळली ॥१३२॥
जरी होकार धनगरी देत । सपटणेकर आश्चर्यभरित । आपुलेंच वृत्त वैसले ऐकत । तेणें ते चकित अंतरीं ॥१३३॥
गोष्ट ती एका वाणियाची । परी वस्तुत: होती त्यांची । त्यांतरी त्यांचे मयत मुलाची । वार्ता मृत्यूची निघाली ॥१३४॥
कोणी अत्यंत परिचित । नातेवाईक सांगे वृत्त । जन्मापासूनि मरणापर्यंत । तैसें तें साद्यंत कथियेलें ॥१३५॥
बाईलागीं सांगती कथा । तिचा न कथेशीं संबंध तत्त्वतां । ती तों पितापुत्रांची वार्ता । विषय सर्वथा दोघांचा ॥१३६॥
असो ऐसी निजकथा । साईमुखें सपटणेकर ऐकतां । परम विस्मय जाहला चित्ता । बाणली आदरता साईपदीं ॥१३७॥
वाटलें तयां मोठें कौतुक । बाबांला ही कैशी ठाऊक । परी जैसा करतलामलक । तेवीं हें सकळिक बाबांना ॥१३८॥
ब्रम्हास्वरूप स्वयें आपण । तयाचें विश्व कुटुंब जाण । किंबहुना विश्वचि नटला पूर्ण । तीच ही खूण साईची ॥१३९॥
एकात्मतेचा विस्तार । तोच कीं साईचा अवतार । तयास कैंचें आपपर । स्वयें सविस्तर जगरूप ॥१४०॥
विनटला जो परमपुरुषा । तया कैंची द्वैतभाषा । द्रष्टा दर्शन अथवा द्दश्या । नातळे आकाशा जणूं लेप ॥१४१॥
बाबा महान अंतर्ज्ञानी । ऐसें येतांच तयांचे मनीं । बाना काय तयांलागुनी । वदले तें सज्जनीं परिसिजे ॥१४२॥
वोट दावुनि तयांसमोर । बाबा साश्चर्य काढिती उद्नार । ''मारिलें म्हणे मीं याचें पोर । आरोप मजवर हा ठेवी ॥१४३॥
मी लोमांचीं पोरें मारितों । हा कां मशिदीस येऊनि रडतो । बरें मी आतां ऐसें करितों । पोटासी आणितों पुत्र त्याचा ॥१४४॥
जैसा मेलेला रामदास । दिला माघारा त्या बाईस । तैसाच पुनश्च त्याचिये मुलास । आणितों मी पोटास त्याचिया'' ॥१४५॥
ऐसें ऐकूनि सपटणेकर । तिष्ठत लावूनि बाबांकडे नजर । ठेवूनि त्यांच्या मस्तकीं कर । बाबा त्यां धीर देतात ॥१४६॥
म्हणती ''हे पाय पुरातन फार । जाहली तुझी काळजी दूर । पूर्ण भरंवसा ठेव मजवर । कृतार्थ लवकर होसील'' ॥१४७॥
करीत असतां पादसंवाहन । परिसतां बाबांचें मधुरवचन । सपटणेकर सद्नदितनयन । पदाभिवंदन करीत ॥१४८॥
आले अष्टभाव दाटून । नयनीं आनंदाश्रुजीवन । तेणें बाबांचें पादक्षालन । प्रेमें प्रक्षालन मग केलें ॥१४९॥
पुन्हां बाबांनीं मस्तकीं हात । ठेवूनि म्हणाले बैसावें स्वस्थ । तेव्हां सपटणेकर बिर्हाडीं परत । आले आनंदित मानसें ॥१०५॥
नैवेद्याची केली तयारी । देऊनियां निजयुवतीकरीं । पूजा आरती जाहलियावरी । ताट तें सारित बाबांपुढें ॥१५१॥
मग प्रोक्षूनियां पात्रास । करोनि सविधि नेत्रस्पर्श । प्राणापानव्यानादिकांस । अर्पोनि मग बाबांस समर्पिला ॥१५२॥
मग अनुसरूनि नित्यक्रमास । बाबांस होतां हस्तस्पर्श । स्वीकारितां नैवेद्यास । वाटला हर्ष सपटणेकरां ॥१५३॥
मग तत्रस्थ इत्र भक्त । होते बाबांचे पायां पडत । शिरले सपटणेकर त्या गर्दींत । पुनश्च नमस्कारीत त्वरेनें ॥१५४॥
असो ऐसिया त्या घाईंत । मस्तका मस्तका मस्तक आथडत । बाबा तेव्हां सपट्णेकरांप्रत । कैसे अनुवादत संथपणें ॥१५५॥
अरे कशाला वारंवार । नमस्कारावर नमस्कार । पुरे तो केला एकवार । आदरसत्कारपूर्वक ॥१५६॥
असो ते रात्रीं होती चावडी । सपटणेकर अति आवडी । प्रेमें निघाले पालखीअघाडीं । आनंदपरवडी दंडधारी ॥१५७॥
असो ही चावडीमिरवणूक । श्रोतयां पूर्वींच आहे ठाऊक । तरी पुनरुक्ति आवश्यक । विस्तारकारक वर्जियेली ॥१५८॥
असो पुढें ते रात्रीला । ही बाबांची अगाध लीला । बाबा दिसले सपटणेकरांला । जणूं पांडुरंगालाच पाहतों ॥१५९॥
असो पुढें मागतां आज्ञा । जेवूनि जावें झाली अनुज्ञा । न करितां यत्किंचित अवज्ञा । निघाले मग दर्शना ॥१६०॥
इतुक्यांत मग त्यांचिये मना । एकाएकीं उठली कल्पना । बाबा आतां मागतां दक्षिणा । ती मी पुरविणार कैसेनी ॥१६१॥
पैसे गांठीस होते ते सरले । गाडीभाडयाचे पुरतेच उरले । ''दक्षिणा दे'' जर वदले । उत्तर ठरविलें मनानें ॥१६२॥
मागावयाचे आधींच द्यावा । रुपया एक हातीटं ठेवावा । पुन्हां मागतां आणखी अर्पावा । नाहीं म्हणावा तयापुढें ॥१६३॥
अग्निरथाचे भाडयासाठीं । आवश्यक तेचि ठेविले गांठीं । ऐसें बाबांस सांगावें स्पष्टोक्तीं । ठरवोनि भेटीस ते गेले ॥१६४॥
पूर्वील कृतनिश्चयानुसार । रुपया एक ठेवितां हातावर । आणिक एकचि मागितला त्यावर । देतां ते भरपूर अनुवादले ॥१६५॥
म्हणाले ''हा घे एक नारळ । स्वस्त्रियेच्या ओटींत घाल । आणिक मग तूं जाईं खुशाल । सोडूनि तळमळ जीवाची'' ॥१६६॥
पुढें जातां महिने बारा । पुत्र आला त्याचिये उदरा । घेऊनि आठां मासांचिया लेंकुरा । आलीं तीं माघारा दर्शना ॥१६७॥
मुलगा घातला बाबांचे चरणीं । काय संतांची नवल करणी । मग तीं दोघें जोडूनि पाणी । करिती विनवणी ती परिसा ॥१६८॥
या उपकारा साईनाथा । केवीं उतराई व्हावें आतां । आम्हां कांहींच कळेना सर्वथा । ठेवितों माथा चरणांवर ॥१६९॥
हीन दीन आम्ही पामर । कृपा असावी अनाथांबर । आतां येथूनि पुढें निरंतर । चरणीं तव थार असावा ॥१७०॥
जागृतीमाजीं तैसेंच स्वप्नीं । नाना तरंग उठती मनीं । उसंत नाहीं दिवसरजनीं । तरी तव भजनीं लावीं आम्हां ॥१७१॥
असो तो मुलगा पुरलीधर । आणीक दोन भास्कर दिनकर । यांचियासमवेत सपटणेकर । प्रसन्नांतर जाहले ॥१७२॥
मग ते सवें घेऊनि भार्या । करूनि वंदन साई सदया । साधूनि चंचल मनाचे स्थैर्या । होऊनि कृतकार्या परतले ॥१७३॥
कथा संगावी संकलित । होता मनीं आरंभीं हेत । परी बदविता साईनाथ । तेणें हा ग्रंथ विस्तारला ॥१७४॥
तयासी हा हेमाड शरण । पुढील कथेचें अनुसंधान । तात्पर्यार्थ दिग्दर्शन । श्रोतयांलागून करीतसे ॥१७५॥
कथा ती याहूनि बहु गोड । चमत्काराची जया आवड । ऐसिया एका भक्ताचें कोड । पुरविलें नितोड साईंनीं ॥१७६॥
लोक वर्णितां साईंचे गुण । दोषदर्शी देखे अवगुण । स्वयें न स्वार्थपरमार्थपरायण । दोषैकदर्शन हेतु मनीं ॥१७७॥
असतील साईबाबा संत । तरी ते मज देतील प्रचीत । मजला अनुभव आलियाविरहित । मी त्यां यत्किंचित मानींना ॥१७८॥
केवळ परीक्षा पहावयास । गेलियाचीही इच्छा पुरत । हीच कथा पुढील अध्यायांत । श्रवण करोत सच्छ्रोते ॥१७९॥
स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थसच्चरिते । साशंकभक्तानुग्रहकरणं नाम अष्टचत्वारिंशोत्तमोऽध्याय: संपूर्ण: ॥
॥ श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥