आरती आरती करूं गोपाळा ।
मीतूंपण सांडोनी वेळोवेळां ॥ ध्रु० ॥
आवडीं गंगाजळें देवा न्हाणिलें ।
भक्तींचे भूषण प्रेमसुगंध अर्पिलें ॥
अहं हा धूप जाळूं श्रीहरीपुढें ।
जंव जंव धूप जळे तंव तंव देवा आवडे ॥ आरती० ॥ १ ॥
रमावल्लभदासें अहंधूप जाळिला ।
एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥
सोहं हा दीप ओंवाळूं गोविंदा ।
समाधी लागली पाहतां मुखारविंदा ॥ आरती० ॥ २ ॥
हरिखें हरीख होतो मुख पाहतां ।
प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥
सद्भावालागीं बहु हा देव भूकेला ।
रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला ॥ आरती० ॥ ३ ॥
फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।
तया उपरी नीरांजनें मांडिलीं ॥
पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।
विश्व हें लोपलें तया प्रकाशातळीं ॥ आरती० ॥ ४ ॥
आरतीप्रकाशें चंद्रसूर्य लोपले ।
सुरवर नभीं तेथें तटस्थ ठेले ॥
देवभक्तपण न दिसे कांहीं ।
ऐशापरी दास रमावल्लभा पायीं ॥ आरती० ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.