पुण्याचा रक्तलांछित १ मे दिन

साम्राज्यवादी भांडवलशाही सरकारें पूर्वी मे-दिनाच्या दिवशीं गोळीबार लाठीमार करीत. जगांत बहुतेक राष्ट्रांतून मे-दिन आतां पाळला जातो. हिंदुस्थानांतहि मे-दिन पाळला गेला. पुण्याला मे-दिनाची मिरवणूक निघाली. त्या मिरवणुकीवर हल्ला झाला. कोणी केला होता तो ? ब्रिटिश सरकारच्या शिपायांनीं ? नाहीं नाहीं. आमच्याच भाऊबंदांच्या लाठ्या आमच्या कपाळीं बसल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक-संघाच्या काठ्या आकाशांतील विमानांना थोड्याच पोंचणार आहेत ! नि:शस्त्र लढा लढणार्‍या आमच्याच माथ्यावर त्या पडावयाच्या आहेत.

पुण्याच्या हिंदु युवक परिषदेनें समाजसत्तावादी लोकांच्या निषेधाचा ठराव केला आहे. या हिंदु युवकांना भारतीय संस्कृतीची थोडीहि कल्पना असती तर असा ठराव ते करते ना. समाजसत्तावाद म्हणजे वेदान्त. सर्वांना पोटभर अन्न मिळणें, अंगभर वस्त्र मिळणें, सर्वांना शिक्षण मिळणें, रहावयास घर असणें म्हणजे समाजसत्तावाद. यांत कोणतें पाप आहे ?

सज्जनगडाची एक जुनी गोष्ट मी ऐकली होती. एकदां समर्थांच्या पुण्यतिथीचा नऊ दिवसांचा उत्सव नेहमींप्रमाणें गडावर होत होता. गडावर येणार्‍या सर्वांना जेवण मिळालें कीं नाहीं, हें पाहून मग गादीवरचे महाराज जेवत. एकदां रात्रीं बारा वाजतां महाराजांचें पोट दुखूं लागलें. पोट कांहीं केल्या थांबेना. महाराज म्हणाले, 'गडावर कोणी उपाशी नाहीं ना पाहून या.' गडावर एक क्षुधेनें काळवंडलेला मनुष्य आढळला. त्याला अन्न देण्यांत आलें. महाराजांचें पोट दुखावयाचें राहिलें.

उपाशी लोकांसाठी ही पोटदुखी आज ज्याला लागली असेल, तो खरा धार्मिक. तो खरा संस्कृतीचा उपासक. संस्कृतीचा खरा उपासक सर्वांना सुखी करूं पाहील. समाजसत्तावाद खरी संस्कृति आणील. भारतीय संस्कृतीला उजळा देईल.

समाजसत्तावादी मित्रांनो ! पुण्याला तुमचेवर काठ्या पडल्या. दिलदार व ध्येयवादी एस.एम.जोशी रक्तबंबाळ झाले. तेजस्वी व ध्येयोत्कट भाऊ फाटक घायाळ झाला. सौ.नर्मदाताई साने यांनाहि लाठी बसली. कृतार्थ झाली सारी मंडळी. मे-दिन पवित्र रक्तानें रंगला. मे-दिनाचें बीज भारतांत नीट पेरलें गेलें. त्याला रक्ताचें खत मिळालें. या बीजाचा महान् वृक्ष होईल व लाठ्या मारणार्‍यांसहि तो छाया देईल.
९ मे, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel