यात्रा झाली, पण--

अंमळनेरची यात्रा झाली. एकादशीस रथ निघाला. पौर्णिमेस पालखी निघाली. हजारों लोक आले. श्रीमंत सखाराम महाराजांचा जयजयकार त्यांनीं केला. अनेक वारकरी जमले. निरनिराळ्या गाद्यांवरचे महाराज एकत्र जमले. कांही शास्त्री पंडित येऊन त्यांनीं आपली पढिक विद्वत्ता दाखविली. सनातन धर्माची महति गायिली गेली. भजनें झालीं. सारें झालें. परंतु या सोहळयांत धर्माचा प्राण होता का ? हा सोहळा भगवंताला मान्य झाला असेल का ? परमेश्वर या समारंभांत होता कीं तो कष्टानें व खेदानें दूर निघून गेला होता ?

हा सर्व समारंभ प्राणाशिवाय कुडीप्रमाणें होता. जोंपर्यंत आपल्या सर्व धार्मिक महोत्सवांत हरिजनांना आपण अभेदानें भाग घेऊं देत नाहीं, तोंपर्यंत हे सारे सोहाळे निर्जीव व अधार्मिक आहेत. संतांच्या पादुकांना हरिजनांना स्पर्श करतां येत नाहीं, तुमच्या मंदिरांत हरिजनांना जातां येत नाहीं, देवाच्या पालखी, रथाला हरिजनांना हात लागूं देत नाहीं तोंपर्यंत देव मेलेला आहे. भारतवर्षांत देवाला जिवंत करावयाचें असेल तर सर्वांना देवाजवळ जाऊं दे.

मुसलमानांच्या मशिदींत सारे समानतेच्या नात्यानें बसतात. तेथें कोणी अमीर नाहीं, फकीर नाहीं. दिल्लीच्या जुम्मा मशिदींत एकदां औरंगजेब बादशहा प्रार्थनेच्या वेळेस जरा उशिरा गेला. औरंगजेबाला पाहतांच लोक पुढें मागें सरूं लागले. बादशहा म्हणाला, 'हलूं नका. जो उशिरां येईल तो मागें बसेल. देवासमोर मी बादशहा नाहीं. मी साधा माणूस आहें. मशिदींत सारे सारखे. रावरंक भेद नाहीं.'

ख्रिश्चनांच्या चर्चमध्यें सारे एकत्र जमतात. सामुदायिक प्रार्थना म्हणतात. कोणाला अस्पृश्य करून मंदिराबाहेर ते ठेवीत नाहींत.

परन्तु हिंदुधर्मांतच हें पाप आहे. आम्ही देवासमोरहि सर्वांना येऊं देत नाहीं. आम्ही देवालाहि एक नबाब बनविलें आहे. आमचा देव सर्वांचा मायबाप म्हणून तेथें उभा नाहीं. कांहीं लोकांच्या मिरासदारीला मान देणारा कोणी सुलतान मूर्तिरूपानें तेथें उभा असतो. ज्याप्रमाणें तुमच्या दिवाणखान्यांत सर्वांना प्रवेश नाहीं, त्याप्रमाणें तुमच्या देवाजवळहि प्रवेश नाहीं.

एखाद्या आईचीं तीन मुलें तिला चिटकून बसून चौथ्या मुलाला तीं तीन मुलें जर येऊं देणार नाहींत, आईजवळ बसूं देणार नाहींत तर त्या आईचें लक्ष कोणाजवळ असेल ? जवळच्या तीन मुलांकडे असेल कीं दूर हांकललेल्या त्या चौथ्याकडे असेल ? चौथ्या मुलासाठीं आईचा जीव थोडाथोडा होईल.

आपण देवाला माउली म्हणतों. माझी विठाई माउली । प्रेमपान्हा पान्हावली  ॥  असें म्हणतों. जर तुमची मूर्ति केवळ दगडाची नसून चैतन्यमय व भावनामय असेल तर त्या मूर्तीचें लक्ष जवळच्या पंड्याबडव्यांकडे, जवळच्या देशमुखदेशपांड्यांकडे, जवळच्या पंचांकडे, जवळच्या सनातनींकडे न राहतां दूर ठेवलेल्या अस्पृश्यांकडेच जाईल. तुम्हांला तुमची विठाई माउली पाहिजे असेल तर हरिजनांना जाऊन मिठी मारा.

ज्ञानेश्वरींत म्हटलें आहें 'तेथ जातिव्यक्ती पडे बिंदुलें.' देवाचें चिंतन करणार्‍यास जातगोत कांहीं आठवतां कामा नये. 'मी' मी कुठला, कोण; याचेंहि स्मरण उरतां कामा नये. तुकाराम महाराज म्हणतात 'जाळिन मी भेद । येथें प्रमाण तों वेद' 'जिकडे तिकडे देखे उभा । अवघा चैतन्याचा गाभा' 'विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म' 'भेदाभेद भ्रम अमंगळ' 'येथें भाग्य कधी लहान होऊन । अवघें देख जन ब्रह्मरूप' संतांना भाग्य पाहिजे होतें. सर्वांना हृदयाशीं धरण्याची त्यांना तहान होती. परन्तु तुम्हीं सारे करंटे. संतांना जें भाग्य पाहिजे होतें, तें तुम्हीं लाथाडून देत आहांत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel