मुख्य गोष्ट
देशभक्ति, धर्मप्रीति, मातृभक्ति वगैरे अनेक शब्द आपण ऐकतों. अमुक मनुष्य मोठा देशभक्त आहे, मातृभक्त आहे, धर्मभक्त आहे असें आपण म्हणतों. याचा खरोखर खोल पाहिलें तर काय अर्थ असतो ?
मी माझ्या आईवर प्रेम करतों. मी मातृमहिमा ओळखतों. मी जर मातृमहिमा खरोखर ओळखीत असेन तर सर्व मातांना नमस्कार करीन. कोणत्याहि मातेचा मी उपमर्द होऊं देणार नाहीं. माझ्या आईच्या सुखासाठीं दुसर्या आईला जर धुळींत मिळवूं इच्छीन तर मातृमहिमा मी यथार्थपणें ओळखला असें म्हणतां येणार नाहीं. माझ्या मातृभक्तीनें इतर मातांचाहि सन्मान करावयास मी शिकलें पाहिजे.
तसेंच धर्माचें. आईच्या दुधावर आपला देह पोसतो. त्याप्रमाणेंच धर्मांतील सद्विचारांच्या दुधानें आपलें हृदय व बुध्दि यांचें पोषण होतें. माझा धर्म मला पूज्य, तसाच त्याचा धर्म त्याला पूज्य. मी माझ्या धर्माचा खरा भक्त असेन, तर दुसर्याच्या धर्माबद्दलहि आस्था ठेवीन. दुसर्याच्या धर्मांची टिंगल करणार्यास धर्माचें महत्त्व समजलें नाहीं. इतर धर्मांविषयींहि सहानुभूति व सद्भाव दाखवावयास जो शिकला त्यालाच स्वत:च्या धर्माविषयीं खरें प्रेम आहे असें समजावें.
तसेंच देशभक्तीचें. मी माझ्या देशावर प्रेम करतों. त्याचा अर्थ मी इतर देशांचा द्वेष करणें असा नव्हे. माझा देश मला प्रिय व पूज्य. तसा त्याचा देश त्याला प्रिय व पूज्य. त्याच्या भावना माझ्यावरून मी ओळखल्या पाहिजेत. भारताचा भक्त दुसर्या देशाचा द्वेष करणार नाहीं. इंग्लंडवर प्रेम करणारा जर हिंदुस्थान धुळीला मिळवतील, तर ती खरी इंग्लंड देशाची भक्ति होणार नाहीं.
उपनिषदांत दोन महावाक्यें आहे. 'तत् त्वमसि व अहं ब्रह्मास्मि' मीहि ब्रह्म आहें व तूंहि ब्रह्म आहेस. मीहि चांगला, तूंहि चांगला. माझा धर्म मला भला, तुझा तुला भला. माझा देश मला प्यारा, तुझा तुला. एकमेकांच्या भावना आपण सांभाळूं या. शत्रूचें निशाण हातांत सांपडलें तर द्वेषानें तें अपमानूं नये. १९०४-५ मधील रूसो-जपानी युध्दांत रशियाचीं जिंकून घेतलेलीं निशाणें जपानी शिपायांनीं फाडलीं नाहींत, अवमानिलीं नाहींत. लढाई असेल. परन्तु निशाण म्हणजे सारी जनता, सारें राष्ट्र. त्याचा अपमान नाहीं कोणी करतां कामा. खर्या भक्तीचा हा जर अर्थ आपण लक्षांत घेऊं तर मग देशभक्ति, धर्मप्रीति ही मारक न होतां सर्वांस तारक होईल. परन्तु हें कोण करणार ?
५ सप्टेंबर, १९३८.