खानदेशांतील तरुणांनो, निजामहद्द तुमच्याशेजारीं आहे. तीं अजिंठ्याचीं अमर लेणीं तुमच्या जवळ आहेत. तुम्हीं निजाम राज्यांत स्वातंत्र्यसूर्य उगवावा म्हणून उठावले पाहिजे. मागें ३० सालीं खानदेशांतील सत्याग्रही महाराष्ट्रभर पसरले होते. घणसोळी, विलेपार्ले, रत्नागिरी येथें सर्वांआधीं धांवून गेले होते. आतां का मागें रहाल ? स्वातंत्र्याचें रणशिंग फुंकलें गेलें आहे. तुम्हीं तयार रहा. खानदेशांत यंदा धान्याचा दुष्काळ आहे. पिकें बुडालीं आहेत. परंतु स्वातंत्र्यभक्तीचा दुष्काळ कधीं होतां कामा नये. स्वातंत्र्याचें पीक हृदयांत दिवसेंदिवस वाढत चाललें पाहिजे. स्वातंत्र्याच्या पिकाची जोड बाहेरच्या पिकांस मिळत नाहीं, म्हणून बाहेरचें पीक कंटाळलें आहे.

दर वर्षी पीक बरें दिसतें. परन्तु मागून नाहींसें होतें. प्रभु म्हणतो, 'मी द्यावयास तयार आहें. परन्तु तुमचे हात घेण्यास नालायक आहेत. गुलामगिरींत दीडदीडशें वर्षे कुथत बसणार्‍या किड्यांना कशानें चेव येईल तें मला समजत नाहीं. गुलाम असून पुन्हां आपसांत भांडतां. उच्चनीचपणा दाखवतां. नालायक व नादान आहांत तुम्ही.' आपण माणसें आहोंत हें सिध्द करून देण्यासाठीं आपण उठलें पाहिजे.

हैदराबाद व आपण निराळे नाहीं. २३ सालीं नागपूरच्या झेंडासत्याग्रहासाठीं अखिल भारतांतून स्वयंसेवक गोळा झाले होते. हा भारत अखंड आहे. या अखंड भारतांत कोठेंहि लढा झगडा असो. परंतु या क्षणीं तर जवळच बोलावणें आहे. देवाचें बोलावणें आहे हें ज्याच्या कानांत व मनांत शिरेल तो धन्य होय.

ही स्पर्धा नव्हे. तिकडे राजकोट पेटलें म्हणून हैदराबाद पेटवा असा याचा अर्थ नव्हे. दिव्यानें दिवा लागतो. एकमेकांस आधार मिळतो, स्फुरण चढतें. तेजस्वी वल्लभभाई उठावले आहेत, सेनापति उठावले आहेत. तिकडे जवाहीरलाल उठावत आहेत. पेटूं दे भारत, पेटूं दे, महाभारत.

माझा भारत सारा पेटूं दे
देवी स्वतंत्रतेला भेटूं दे

अशीं गाणीं गात चला. कूच करा. उन्हाळ्याचे दिवसांत जसे पहाड शिलगलेले दिसतात. त्याप्रमाणे स्वातंत्र्यवृत्तीनें सारें राष्ट्र पेटलें आहे असें जगाला दिसूं दे, जगदीशाला दिसूं दे.

३० वर्षे हातांत सतीचें वाण घेऊन सेनापति झिजत आहेत. एकच ध्यास, एकच वेड. त्यांनीं रस्ते झाडले, मनें झाडलीं. निम्में जीवन तुरुंगांत व अज्ञातवासांत त्यांचें गेलें. अशांचें उतराई कसें व्हावयाचें ? कांहीं कृतज्ञता, कांहीं वीरपूजा हृदयांत आहे कीं नाहीं ? सेनापतींचा सन्मान म्हणजे स्वातंत्र्याचा सन्मान. दुसरा सन्मान त्यांना नको. महाराष्ट्रा ! सेनापतींना साजेसा वाग.
५ डिसेंबर, १९३८.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to गोड निबंध-भाग १


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
गांवाकडच्या गोष्टी
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
श्यामची आई
मराठेशाही का बुडाली ?
खुनाची वेळ
गावांतल्या गजाली
कथा: निर्णय
लोकभ्रमाच्या दंतकथा
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी