सारीं राष्ट्रें जंगल कमी नाहीं ना होत या गोष्टीकडे लक्ष देत असतात. मागें एकदां इटली देशांत १० लाख झाडें लावण्याचा संकल्प झाला होता. १९३२ मध्यें अमेरिकेचा स्वातंत्र्यदाता जॉर्ज वॉशिंग्टन याच्या २०० व्या जन्मदिवशीं अमेरिकेंत लाखों झाडें लावलीं गेलीं. कारण वॉशिंग्टन यास झाडांचें प्रेम होतें. अफाट जंगलें असलेल्या अमेरिकेला झाडें लावण्याची आवश्यकता वाटते. मग हिंदुस्थानला किती असेल ?
ज्यानें जें झाड लावलें, त्याचें त्यानें पालन केलें पाहिजे, त्या झाडाला पाणी घातलें पाहिजे, हें माझ्या हातचें अमुक फुलझाड, हें माझ्या हातचें निंबाचें झाड, हा माझ्या हातचा शिरीष, हा माझ्या हातचा आम्रवृक्ष असें ज्याला म्हणतां येईल तो धन्य होय. परमेश्वर झाडें लावीतच असतो. तो वार्याकडून झाडांचें बीं दशदिशांस फेंकतो व मेघांच्या पखालींतील पाणी घालून त्यांना वाढवतो. मानवांनीं हा धडा घ्यावा म्हणून मुकेपणानें हें काम तो करीत असतो. थोर लोक कृतीनें शिकवतात. थोरांहून थोर तो परमथोर जगत्पिता, जगद्गुरु हें कृतीनें शिकवीत आहे. त्याच्यापासून धडा घेईल तो त्याचा लाडका होईल.
एका अमेरिकन कवीनें झाडांना हिरवीं मंदिरें 'Green Temples of God.' असें म्हटलें आहे. किती गोड हें वर्णन. जें झाड स्वत: तापून जगाला छाया देतें, स्वत:चें आंबट फळ जवळ ठेवून तें पिकल्यावर, गोड केल्यावर आपोआप अनासक्त रीतीनें खालीं सोडतें, ज्या झाडाचा सारा बहर, ज्याचें जगणें मरणें विश्वासाठीं, त्या झाडाखालीं परमेश्वर नसेल तर कोठें असेल ? बाहेरच्या दगडी मंदिरांत हरिजनांना जातां येत नाहीं. परंतु हिरव्या मंदिरांत तो येतो, या मंदिरांत झोंपतो. झाड सर्वांना छाया देतें. जणूं ईश्वराचेंच हें रूप. पापी या, पुण्यवंत या, हिंसक या, अहिंसक या, सर्वांचे स्वागत हा उदार हिरवा राणा करीत असतो.
भारतीय संस्कृति तर झाडांखालींच वाढली. देवाशीं गुणगुण करण्यासाठीं उंच जाणार्या झाडाखालीं त्यांचे संदेश ऋषींनीं ऐकले. वृक्षांचा माथा वर आकाशाला भेटूं पाहतो, पाय पाताळाला पोंचूं पाहतात, शाखा दशदिशांना मिठी मारूं पाहतात अशा या झाडांखालीं वाढलेली भारतींय संस्कृतिहि परमोच्च, परमोदार, परम गंभीर व खोल, अतिविशाल अशी झाली आहे. भारतीय संस्कृतींत फुलांचा वास आहे, फुलांची पवित्रता आहे. भारतीय संस्कृति त्यागधर्म शिकवते, यज्ञधर्म शिकवते. कारण वृक्ष म्हणजे मूर्तिमंत महान् यज्ञ. भारतीय संस्कृतीच्या उपासकांनीं तरी वृक्षाला विसरूं नये. बेल लावा, तुळशी लावा, दूर्वा लावा, वड-पिंपळ, आम्र-बकुल, लावा. झाडाखालीं बसा. झाडाखालीं जेवा. आंवळीभोजनासारखीं व्रतें आपण निर्मिलीं आहेत. घरांत काय रोज बसतां व जेवतां ? घर म्हणजे कबरस्थान. चोहों बाजूनें कोंडणार्या भिंती. घरांतील रहाणें म्हणजे डबक्यांतील रहाणें. तेथें मी व माझें. तेथें दृष्टि संकुचित होते. म्हणून मानवांनीं मधून मधून वनभोजन करावें. विशाल आकाशाचे खालीं, यज्ञमूर्ति झाडांच्या संगतींत जेवावें. जीवनांत जरा विशालता येईल, व्यापक दृष्टि येईल, भारतीय संस्कृतींत वृक्षाचा अपार महिमा आहे. पत्रावळीवर जेवणें पवित्र मानलें गेलें आहे. तेथें सृष्टीचा जणूं जिवंत संबंध आहे.
त्यांच्या मनांत असमाधान रहाणार. प्रत्यक्ष झगड्याशिवाय त्यांना दुसरें कांहीं नको आहे. अहिंसेचा संपूर्ण साक्षात्कार नसल्यामुळें हें होत आहे.
संस्थानिक उद्दामपणें वागत आहेत. त्याला सार्वभौम ब्रि. सरकारच कारण आहे. ब्रि. सरकार नीट कान टोंचील तर संस्थानिकांची वर्तणूक निराळी होईल. महात्माजी लिहितात 'एखाद्या माणसास संस्थानिकांनीं भेटूं नये असें साम्राज्य सरकारला वाटत असेल तर संस्थानिक त्याला भेटणार नाहींत. संस्थानिक ब्रि.सरकारचीं बाहुलीं आहेत.'
ब्रि. हिंदुस्थानांत कांहीं प्रांतांत कांग्रेस मंत्रिमंडळें आहेत. परन्तु मंत्र्यांना जनतेचें सर्वांगीण हित करतां येणें अशक्य आहे. पैसे हातीं नाहींत. ब्रिटिश सरकारच्या हातांत तिजोरी. म्हणून ब्रि. हिंदुस्थानांतील जनताहि असंतुष्ट आहे. जोंपर्यंत ब्रि. सरकार लुटारू म्हणून राहणार तोंपर्यंत जनता सुखी कशी करतां येणार ?