जो समाज गरिबांचें स्मरण करीत नाहीं तेथें कोठला सहकार ? खादी न वापरणारा गरिबांशीं असहकार करतो. आजच्या या मंगल कार्यांत हा सहकार मला दिसत आहे. त्याचप्रमाणें दुसरी एक महत्त्वाची गोष्ट येथें मला दिसत आहे. येथें पडदा नाहीं. पावित्र्य पडद्यांत वाढत नाहीं. आपण परकी गुलामगिरीशीं झगडत आहोंत. त्याबरोबरच घरांतील गुलामगिरीशीं झगडलें पाहिजे. आपणांत अनेक प्रकारची गुलामगिरी आहे. हरिजनांवरची गुलामगिरी, श्रीमंतांची गरिबांवरील गुलामगिरी, पुरुषांची स्त्रियांवरील गुलामगिरी, अनेक प्रकारची गुलामगिरी आहे. स्त्रियांना आत्मा आहे हें आपण विसरून गेलों. एके काळीं स्त्रिया शिकत. त्यांची मुंज होई. त्या वाटेल तेवढें शिकत. जन्मभर ब्रह्मचारी व्रतानेंहि रहात. त्यांना वेदांचा अधिकार होता. परन्तु पुढे बालविवाह आले. पति हाच गुरु. त्यानें शिकवावें. किती पति पत्नीला ज्ञान देतात ? पत्नी भाकर देते, किती पति तिला विचाराची भाकर देतात ? देशांत काय चाललें आहे, कोणते नवीन विचार, कोणतीं नवीन ध्येयें उत्पन्न होत आहेत, कोणी सांगतो का ? पत्नी म्हणजे जणुं पतीची करमणूक. तिनें कां शिकावें हिशेब ठेवतां येईल, थर्मामीटर लावतां येईल, पत्र लिहितां येईल म्हणून; हा उपयुक्ततावाद ठीक आहे. परन्तु स्त्रियांनीं कां शिकावें ? त्यांना आत्मा आहे म्हणून. त्यांना हृदय व बुध्दि यांच्या भुका आहेत म्हणून. परन्तु ही दृष्टि कोठें आहे ? बार्डोली तालुक्यांत स्त्रिया सभेला नसतील तर सरदार वल्लभभाई बोलत नसत. विचारांची भेट स्त्रियांना घडली पाहिजे. मातेभोंवतीं मुलें-बाळैं वाढणार. त्या माता का अज्ञानांत ठेवावयाच्या ?
पडदा दूर करणें म्हणजे हीं अज्ञानाचीं बंधनें दूर करणें. जाऊं दे प्रकाश आत्म्याजवळ. ईश्वरानें सुंदर डोळे दिले, त्याच्यावर का पट्टे बांधावयाचे ? डोळे असून नीट चालतां येत नाहीं. चालतांना कोण अडचण. आगगाडींतून सृष्टिसौंदर्य पाहातां येत नाहीं. हळूच जरा घुंगट दूर करून त्या बिचार्या पाहतात. अरेरे, आम्ही आमच्या मायबहिणींचे डोळे जणुं काढले, फोडले. त्यांना अंतर्बाह्य आंधळें केलें. त्यांस ज्ञानापासून दूर ठेवलें. ईश्वराच्या सृष्टीपासून दूर ठेवलें, घरें म्हणजे तुरुंग झाले. जणुं स्त्रियांना खायला दिलें, दोन दागिने दिले, दोन वसें दिलीं, कीं झालें कर्तव्य ! स्त्रियांच्या आत्म्याचा केवढा हा अपमान !
आजच्या या विवाहांत हें अमांगल्य दूर करून खरें मांगल्य निर्मिलें आहे. प्रतिज्ञेच्या श्लोकांत नारी ही नरापेक्षां कमी नाहीं असें म्हटलें आहे. सावित्रीच्या गाण्यांत 'स्त्रिया यशाची शक्ति, भ्रताराची करिती भक्ति' असें म्हटलें आहे. विवाह मंत्रांत वधुवरांस सुंदर उपमा दिल्या आहेत. वर हा आकाश आहे तर वधू ही पृथ्वी आहे. आकाश दूर असलें तरी क्षितिजाजवळ पृथ्वीला अखंड चिकटलेलें आहे. पति दूर असला तरी तो पत्नीच्या हृदयाकाशांत सदैव आहे, ती पतीच्या हृदयांत आहे. कधीं कधीं आकाशांत ढग येतात; वादळें येतात. आकाश कडाड गर्जना करतें. परन्तु पृथ्वी शान्त रहाते. ती क्षमाशील असते. पृथ्वीला माहीत असतें कीं हे ढग जातील; हीं वादळें थांबतील. आकाशाचा खराखुरा शाश्वत असा अभंग निळा रंग पाठीमागें आहे. कधीं कधीं पृथ्वीहि संतापते. भूकंप होतात. पर्वत आग पाखडूं लागतात. परन्तु आकाश शान्त असतें. पति रागावला तर पत्नी शांत, पत्नी रागावली तर पति शांत. आकाश व पृथ्वी यांच्या उपमांत अनंत अर्थ भरला आहे. वधू-वर जर अशी विशाल दृष्टि घेतील तर संसार सुखाचा होईल. परस्परांनीं परस्परांस सांभाळावें. संयम शिकून संगीत निर्मावें. मंत्रांत म्हटलें आहे : वधूवर म्हणजे ऋग्वेद व सामवेद. ऋग्वेदाचे मंत्र संगीतांत बसवले म्हणजे सामवेद होतो. सामवेद म्हणजे साम्य-वेद, समानता निर्मिणारा वेद. संगीतानें हृदयांत शांति, एक प्रकारची समाधि निर्माण होते. असें संगीत वधूवरांनीं सहकार्यानें, एकमेकांच्या सदिच्छा संभाळून निर्माण करावें. फुलांचे हार, सुतांचे हार वधूवरें अर्पण करतात. सूत परस्परांभोंवतीं गुंडाळतात. हें प्रेमाचें सूत्र आहे. पतंग आकाशांत उंच उडतो व आपण त्याची मौज बघतों. पतीचा पतंग उडविणारा पत्नीचा प्रेमाचा धागा. पतीच्या त्या पतंगाला कोण उडवतें ? तो बारीकसा डोळ्याला न दिसणारा धागा. तो धागा त्याला जरा खेंचतो, परन्तु वर उडविण्यासाठीं खेंचतो. जगाला डौलानें उंच विहरणारा पतंग दिसतो. धागा दिसत नाहीं. पतीची प्रतिष्ठा, पतीला मान, पति जगांत वावरतो, त्याला बाजारांत किंमत ! परन्तु समाजांत पतीचा पतंग उंच उडावा म्हणून पत्नी प्रेमाच्या धाग्यानें त्याला बांधते. हा सूक्ष्म परन्तु अभंग प्रेमतंतु जगाला दिसत नाहीं, परंतु हा धागा नसेल तर पतंग उडणार नाहीं. स्वत: दूर नामानिराळी राहून, घरांत राहून, तेथून प्रेमाच्या धाग्यानें पतीचा पतंग ती उंच उडवूं पहाते. पतीनें उंच जावें अशी स्त्रीची इच्छा असते. पुन:पुन्हां त्यानें गोते खावे, खालीं यावें, असें तिला वाटत नाहीं. पतीच्या मोठेपणांत तिचा मोठेपणा. होम करणें म्हणजे ध्येयार्थ जीवन देणें. गृहस्थाश्रम म्हणजे असें हें खरेंखुरें महाकाव्य आहे. हें महाकाव्य आहे; हा आश्रम आहे. सद्गुण व संयम शिकण्याची ही महान् पाठशाळा आहे. येथें सहकार्य आपण शिकतों. सहनशीलता शिकतों. आणि असा हा संसार वेळ आली तर राष्ट्राच्या महान् संसारात होमावयाचा. पति, पत्नी, मुलें सर्वांचा महान् कार्यासाठीं होम. हरिश्चंद्र, रोहिदास, पडलीं सारीं बाहेर. श्रियाळ, चांगुणा, चिलया राहिलीं उभीं सत्त्वासाठीं. कुटुंबासाठीं स्वत:चा त्याग, प्रांतासाठीं गांवाचा, देशासाठीं प्रांताचा, जगासाठीं देशाचा व सत्यासाठीं आत्म्यासाठीं सर्व दुनियेचा त्याग, असा हा उत्तरोत्तर वाढता त्याग आहे. पावित्र्य म्हणजे चिरयज्ञ. आपण सर्व विधींत होम करतों. समिधा देतों. आपले देह म्हणजेच या समिधा. त्यांचा ध्येयासाठीं होम करावा लागतो. वधूवरांनीं यासाठीं एकमेकांस धीर देऊन तयार करावयाचें. शेवटीं महान् जीवनासाठीं आपलीं लहान निर्मळ जीवनें आनंदानें अर्पावयाचीं. असो. आजचा हा मंगल विवाह वधूवरांस, आप्तेटांस, शेजार्यांस, समाजास सुखावह होवो. मी आशीर्वाद नाहीं देऊं शकत, कारण ती माझी शक्ति नाहीं. परन्तु माझी सदिच्छा आहे, प्रभूला प्रार्थना आहे कीं, वधूवरांस खरें सुख व मांगल्य भरपूर मिळो. । । वंदे मातरम् । ।
वर्ष २, अंक ४८.