राष्ट्रीय सप्ताहाचा इतिहास व आपलें कर्तव्य
सहा एप्रिलपासून तेरा एप्रिलपर्यंत दरवर्षी राष्ट्रीय सप्ताह पाळण्यांत येतो. या सात दिवसांचें काय महत्त्व ? आपण या सात दिवसांचा इतिहास कधींहि विसरतां कामा नये. हे अमर दिवस आहेत. १९१४ पासून १९१८ पर्यंत युरोपखंडांत महायुध्द सुरू होतें. या महायुध्दाची संधि साधून हिंदुस्थान स्वतंत्र करावा असे विचार कांहीं क्रांतिकारकांच्या मनांत होते. पंजाब, बंगाल वगैरे प्रांतांत क्रांतिकारकांचीं जाळीं पसरलीं होतीं. कॅनडा, अमेरिकेंतून कांहीं क्रांतिकारक देशांत त्या वेळेस आले होते. गदर चळवळ हिंदुस्थानांत व्हावयाची होती. परंतु गदर चळवळीचे पुढारी पकडले गेले. कांहीं फांशी गेले; कांहीं काळ्या पाण्यावर गेले. आपल्या महाराष्ट्रांतील दामोदर पिंगळे हा अत्यंत तेजस्वी तरुण त्या गदर चळवळींतच फांशी गेला. बंगालमध्यें शेंकडों तरुण ठिकठिकाणी डांबून ठेवण्यांत आले. या तरुणांची चौकशी करण्यांत येईना. शेवटीं या तरुणांची चौकशी करण्यासाठीं सरकारनें एक कमिटी नेमिली. या कमिटीचे रौलेट साहेब अध्यक्ष होते. रौलेट साहेबांनी शेवटीं रिपोर्ट लिहिला. क्रांतिकारकांची चळवळ दडपून टाकण्यासाठीं त्यांनीं कांहीं उपाय सुचविले.
महायुध्द आतां समाप्त झालें. महायुध्दांत सरकारनें हिंदी जनतेला किती तरी अभिवचनें दिलीं होतीं. परंतु युध्द संपतांच हिंदुस्थानच्या उरांत सुरी भोंसकण्यासाठीं सरकार उभें राहिलें. रौलेट अॅक्ट नांवाचा एक कायदा १९१९ च्या फेब्रुवारी महिन्यांत वरिष्ठ कायदे कौन्सिलांत मांडला गेला. मार्च महिन्यांत हा कायदा दिल्लीला पास झाला. त्या वेळेस महात्मा गांधी साबरमती तीरावर आश्रमांत तपस्या करीत होते. १९१५ मध्यें आफ्रिकेंतील सत्याग्रहाचा दिव्य झगडा यशस्वी करून ते मायभूमीस परत आले होते. चंपारण्यांत व खेडा जिल्ह्यांत शेतकर्यांवर होणार्या जुलमाविरुध्द त्यांनी सत्याग्रह करून यश मिळविलें होतें. अहमदाबाद येथें कामगारांचा झगडा हातांत घेऊन तोहि सत्याग्रही पध्दतीनें त्यांनीं यशस्वी केला होता. हिंदुस्थानांतहि सत्याग्रहाचे प्रयोग महात्माजीनीं असे केले. आतां राष्ट्रव्यापक सत्याग्रह सुरू करावयाचा होता.
मार्च महिन्यांत रौलेट कायदा पास होतांच साबरमतीचा महात्मा उभा राहिला. रौलेट अॅक्ट नागरिक-स्वातंत्र्य संपूर्णपणें हिरावून घेणारा आहे. हा कायदा म्हणजे माणुसकीला काळिमा आहे; न्यायाची थट्टा आहे, असें महात्माजींनीं जाहीर केलें. संशयावरून वाटेल त्या ठिकाणीं डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यानें सरकारला दिला होता. पकडण्याचा अधिकार सर्वसाधारण पोलिसास देण्यांत आला होता. संशय येताच पकडावें; डांबून ठेवावें. चौकशी होवो वा न होवो. खटला चाललाच तर त्यावर अपील नाहीं. निकाल शेवटचाच. अशा प्रकारचा हा कायदा होता.
हा कायदा नाहींसा करण्यासाठीं मला सत्याग्रहाची चळवळ सुरू करावी लागेल असें महात्माजींनीं जाहीर केलें. हिंदुस्थानांत नवीन तेज आलें. उपवास, प्रार्थना व हरताळ यांनीं सत्याग्रहास आरंभ व्हावयाचा होता. प्रथम ३० मार्च १९१९ हा दिवस जाहीर करण्यांत आला. परंतु मागून सहा एप्रिल हा दिवस निश्चित करण्यांत आला. दिल्ली वगैरे ठिकाणीं हा झालेला बदल कळला नाहीं. तेथें ३० मार्च रोजींच सभा झाल्या. दिल्लीला गोळीबार झाला. स्वामी श्रध्दानंद यांच्यावर पिस्तुल रोखण्यांत आलें. त्यांनीं पिस्तुलासमोर छाती उघडी ठेवून 'चलाव तेरी गोळी' असें सांगितलें. पुढें सहा एप्रिलला सर्व हिंदुस्थानभर उपवास, हरताळ, प्रार्थना, सभा असा कार्यक्रम झाला. सहा एप्रिल १९१९ म्हणजे नवयुगाचा आरंभ होता. सत्याग्रहाचा सूर्य सर्व हिंदुस्थानभर त्या दिवशीं तळपला. ते दिवस रोमांचकारी होते.