गुढीपाडवा
आपण गेल्या शुक्रवारी गुढीपाडवा साजरा केला. घरोघर गुढ्या उभारल्या गेल्या. हा गुढीपाडवा आपण साजरा कां करतों ? ह्याचा इतिहास आहे. आपल्या महाराष्ट्रावर जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वीं परचक्र आलें होतें. त्या वेळेस महाराष्ट्रांत शालिवाहन राजा होता. पश्चिमेकडून शक नांवाचे शत्रु महाराष्ट्राला त्रास देत होते. त्या वेळची दंतकथा अशी आहे कीं, शालिवाहन राजानें कुंभाराच्या मडक्यांचे घोडेस्वार बनविले व शत्रूचा पराजय केला. हा जो मोठा विजय शालिवाहन राजानें मिळविला, त्याची खूण म्हणून महाराष्ट्रभर त्या दिवशीं गुढ्या उभारतात. शालिवाहन राजानें आपल्या नांवाचा शक सुरू केला आणि तो शकारंभ आपण विजयध्वज उभारून साजरा करितों.
शालिवाहन राजानें मातीच्या मडक्याचे घोडेस्वार केले, यांत मोठा अर्थ आहे. महाराष्ट्रांतील लोक मातीच्या ढिपळाप्रमाणें पडलेले होते. त्यांच्यांत राम नव्हता; तेज नव्हतें. परंतु मातीसारख्या पडलेल्या या लोकांत शालिवाहन राजानें नवप्राण ओतला. जीं मढीं होतीं, तीं चैतन्याचीं तेजस्वी रूपें बनली. पडलेले उठले. नेभळे झुंजार झाले. महाराष्ट्राचा विजय झाला.
गुढी कोणी उभारावी ? जो मातीसारखा पडलेला नाहीं त्यानें. गुढी उभारणें म्हणजे मान उंच करणें. माझी मान कोणी खालीं दडपणार नाहीं असा आत्मविश्वास असणें म्हणजे गुढी उभारणें. खेड्यापाड्यांतून शहरांशहरांतून महाराष्ट्रांत आज गुढी उभारली जाईल. परंतु हृदयांत निर्भयपणा आहे का ? जर अद्याप खेड्यांतून भीति असेल तर गुढी उभारून काय फायदा ? राष्ट्रीय झेंडा घरोघर निर्भयपणें लावतां येत नसेल, गांवांत राष्ट्रीय झेंडा उभारतां येत नसेल तर या गुढीपाडव्यांना काय किंमत ?
काँग्रेसचें मुख्य कार्य म्हणजे निर्भयता निर्माण करणें हें आहे. परवां अमळनेर तालुक्यांतील एक गोष्ट कानांवर आली. तुम्ही लोक काँग्रेसचा झेंडा लावतां, हरिपुर्याला जातां, वगैरेबद्दल नापसंति कोण्या मोठ्या अधिकार्यानें प्रगट केली व लोकांना दरडावलें. ही गोष्ट जर खरी असेल तर गुढीपाडवा साजरा करण्यांत काय अर्थ ? अमळनेर जवळ मारवड गांव आहे. हा मोठा गांव आहे. येथें दोन अडीचशें काँग्रेसचे सभासद होतात. येथें मोठी शेतकरी परिषद भरली. येथें स्वयंसेवक दलाचा कॅम्प उघडला गेला. येथें वर्तमानपत्रें जातात. नेहमीं सभा होतात. अशा एखाद्या मोठ्या गांवीं जर एखाद्या मोठ्या अधिकार्यानें रागानें कांहीं समजा सांगितलें तर का लोकांनीं नेभळटपणानें ऐकून घ्यावयाचें ? काँग्रेससारख्या महान् संस्थेवर कोणी आग पाखडली तर का निमूटपणें बघावयाचें ?