कर्मवीर अण्णासाहेब कर्वे
अण्णा ! आज तुमचा ८१ वा वाढदिवस. केवढी धन्यतेची गोष्ट, केवढी आनंदाची गोष्ट ! आपल्या राष्ट्रांत राष्ट्रसेवकांच्या वांट्याला दीर्घायुष्य क्वचितच येतें. राष्ट्रांतील पडलेलें अपरंपार काम करावयास कोणी पुढें येत नाहीं असें पाहून पुढारी सर्व रक्त ओतून गाडा ओढूं लागतात व आपल्यांतून ते लौकर जातात. नामदार गोखले, विष्णुशास्त्री, रामतीर्थ, विवेकानंद, आगरकर, देशबंधू दास, कितीतरी थोर रत्नें भारतास फार दिवस लाभलीं नाहींत. अशा स्थितींत राष्ट्राची अहोरात्र सेवा करणार्‍या एखाद्या महापुरुषाचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्याचें भाग्य जनतेला लाभणें ही परमसुखाची गोष्ट आहे.

अण्णा ! तुमचें अपूर्व चरित्र डोळयांसमोर आलें म्हणजे तुमच्या चरणीं डोकें ठेवावेंसे वाटतें. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजांत तुम्हीं तेव्हां प्रोफेसर होतांत. तुम्हीं आपल्या पगारांतून पैन् पै वांचवून पुण्याजवळ चार मैलावर हिंगणें येथें अनाथ बालिकाश्रम संस्था सुरू केलीत. प्रथम तीन मुली संस्थेंत आल्या. ध्येयनिष्ठेनें तुम्ही कार्य सुरू केलें. आज त्या छोट्या गुतवळासारख्या प्रवाहाची केवढी भव्य गंगा झाली आहे.

लोकहितवादी, महात्मा ज्योतिराव फुले, आगरकर, न्यायमूर्ति रानडे वगैरे थोरांनीं स्त्रीशिक्षणाला जोरानें चालना दिली. स्त्रियांनीं शिकणें म्हणजे पाप, ही विचारसरणी त्यांनीं मारून टाकली. परंतु तुमच्याशिवाय संपूर्णपणें या कार्याला कोणी वाहून घेतलें ? एकेका कार्याला एकांतिक निष्ठेनें वाहून घेतल्याशिवाय कार्ये उठत नसतात. स्त्रीशिक्षण हें जीवनाचें ध्येय करून तुम्ही उभे राहिलांत.

स्त्रियांना शिक्षण कां द्यावयाचें ? कोणी म्हणतात त्या पतीचा हिशोब ठेवतील. कोणी म्हणतात त्या आजारीपणांत नीट औषधें देतील, थर्मामीटर लावतील. कोणी म्हणतात त्या शिकल्या तर लग्नाला अडचण पडणार नाहीं. कोणी म्हणतात त्या शिकल्या तर पतीबरोबर वादविवाद करतील. पतिपत्नींत काव्यशास्त्रविनोदाला पूर येईल. ह्या अनेक दृष्टींनीं स्त्रीशिक्षण असावें असे म्हणणारे लोक आहेत. परंतु स्त्रीशिक्षणाकडे पाहण्याची ही खरी दृष्टि नव्हे.

अण्णा ! तुमची दृष्टि कोणती होती ? तुमची दृष्टि एका प्रसंगीं मला कळून आली. १९३० सालांतील ती गोष्ट. एप्रिल महिन्याचे अखेरचे दिवस होते. सत्याग्रहाचा संग्राम भडकला होता. अंमळनेरची शाळा सोडून मी कोकणांत माझ्या भावाला भेटावयास जात होतों. मी आगबोटींत बसलों होतों. मुंबईच्या धक्क्यावरून बोट सुटली नव्हती. बोटींत अलोट गर्दी होती. मी माझी घोंगडी अंथरून जागा काबीज केली होती. तुम्हीं तेथें उभे होतांत. हातांत बॅग घेऊन शांतपणें तुम्हीं उभे होतांत. मी तुम्हांला ओळखलें व वंदन करून म्हटले 'बसा, या घोंगडीवर बसा.'

तुम्हीं नुकतेच जगाची यात्रा करून आलां होतांत. मी तुम्हांला अनेक प्रश्न विचारले. ३५ कोटि लोक असून तुम्हीं गुलाम कसे राहतां असा प्रश्न परदेशांत सर्वत्र विचारण्यांत येतो असें तुम्ही सांगितलेंत. नंतर सत्याग्रहाच्या गोष्टी सुरू झाल्या. तुम्हीं म्हणालेत 'जपानांत मी वाचलें कीं, महात्माजी मिठाचा सत्याग्रह सुरू करणार. मिठाचा सत्याग्रह सुरू करणार म्हणजे काय करणार असें मनांत आलें. परंतु मुंबई बंदरांत उतरलों. विलेपार्ले येथें स्वयंसेवकांची छावणी आहे असें ऐकलें. मी तेथें गेलों. तेथील तें देशभक्तीचें निर्भय व यज्ञमय वातावरण पाहून मलाहि स्वयंसेवक व्हावें अशी स्फूर्ति झाली. परंतु मोठ्या संयमानें ती इच्छा दाबली. नंतर मुंबईस गिरगांवांत एक देखावा पाहिला. हजारों नारी 'नहि रखनी नहि रखनी जालीम सरकार नहि रखनी' असें गाणें गात जात होत्या. त्यांच्या कडेवर समुद्राच्या पाण्यानें भरलेल्या कळशा होत्या. कायदेभंग त्या करीत होत्या. पोलीस लाठीमाराचा हुकूम येण्याची दु:खानें वाट पहात होते. तो रोमहर्षण देखावा पाहून माझ्या डोळयांचें पारणें फिटलें. मिठाचा सत्याग्रह हातीं घेऊन महात्माजींनीं राजकारण चुलीजवळ नेलें. स्त्रियांचा आत्मा त्यांनीं जागा केला. पंचवीस वर्षांत मला करतां आलें नाहीं तें महात्माजींनीं दोन महिन्यांत केलें. स्त्रियांचा आत्मा जागृत करणें ही सर्वात महत्त्वाची वस्तु आहे. शिक्षणाचें हें ध्येय आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel