तुमच्या मुलीला या विषयाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताच नाही असे दिसल्यास काय करावे? कदाचित वैयक्तिक बाबींवर चर्चा करायला तिला आवडत नसेल. किंवा, कदाचित तिला याविषयी काय विचारावे, कसे विचारावे हे कळत नसेल. मला आधीच सगळं माहीत आहे असेही कदाचित ती म्हणू शकते.
अमेरिकेत सहावीतल्या मुलींवर केलेल्या एका संशोधनात असे आढळले की पाळी येण्याआधी मुलींना जे काही माहीत असले पाहिजे, ते सगळे आपल्याला माहीत आहे असे बहुतेक मुलींना वाटत होते. पण आणखी काही प्रश्न विचारल्यावर अगदी स्पष्ट झाले की त्यांना पूर्ण माहिती नव्हती. शिवाय, ज्या गोष्टी त्या मुली खऱ्या मानून चालत होत्या, ते खरे तर रूढ कल्पनांवर व खोट्या धारणांवर आधारित गैरसमज होते. तेव्हा, मला सगळं माहीत आहे असे तुमच्या मुलीने म्हटले तरी, तुम्ही याविषयी तिच्यासोबत बोलणे महत्त्वाचे आहे.
पाळीचा विषय छेडून त्यावर थोडी थोडी माहिती देण्याकरता, सहसा तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. पण पालक या नात्याने ही तुमची जबाबदारी आहे. तुमच्या मुलीला तुमच्या मदतीची गरज आहे. हे ती सध्या मान्य करत नसली तरीसुद्धा. कधीकधी थोडी निराशा वाटणे स्वाभाविक आहे, पण महत्त्वाचे म्हणजे प्रयत्न करण्याचे सोडू नका. तुमच्या मुलीला थोडा वेळ द्या. कालांतराने, तिला मदत केल्याबद्दल ती जरूर तुमचे आभार मानेल.