वसविली सांगली । चिंतामणरायें चांगली ॥ध्रु०॥

सर्वांचा मुकुटमणी । मुख्य पटवर्धन चिंतामणि । कर्ममार्गामाजी सुलक्षणी । सर्व यजमानची मनास आणी ।

वचन जें निघेल तोंडातुनि । करावें मान्य सर्वत्रांनीं । दालतीचा खांब मुख्य स्थानी । आज्ञा त्याची कोण न मानी ।

किल्ला सांगली राजधानी । प्रज्ञा उभी जोडून द्वयपाणी । ज्याला जितुकें पाजतील पाणी । त्याला पिणें प्राप्त मुक्यानी ।

लौकिक त्याचा जगत्र वानी । शिपाई मूळचे पुण्यप्राणी । गजानन ज्याचा पक्ष धरोनि । करीत संरक्षण संतोष मानी ।

कानीं नित्य पडावें गानीं । गायन करिती महा महा गुणी । विणे पखवाज कितीक कोण गणी ।

कुशल ज्या त्या ममतेशील धनी । न लागे जेथें किंचित पाणी । तेथें प्रभु यत्किंचित खणी ।

पाणीच पाणी रानोरानीं । किल्ल्याची कीर्ति जग वाखाणी । चुंबित गगन मनोरे गगनीं । कोटांत कोट बाहेरुनि ।

सभोंता खंदक मग रेवणी । वेष्‍टिला वरुनि चिल्हारीनीं । चहुंकडे कीर्ति फाकली । वसविली सांगली ॥१॥

भक्ति गजाननाची भारी । तो मोरेश्वर देतो उभारी । चिंतामणी सर्वांला तारी । जेथें बिघडेल तेथें सवारी ।

चिंतामणीची चिंता वारी । धार्मिक अधर्मास धिःकारी । पटवर्धन जाणती संसारी । घालिती उडयाच जैशा घारी ।

फते केल्याविण माघारी । उलटोनयेची मारी मारी । म्हणावे हेंज मनांत खुमारी । ऐसे थोडे पुरुष अवतारी ।

वडिला वडिलीं नामधारी । सप्त पिढया लौकिक उद्धारी । वृत्ति धर्मा जागली । वसविली ॥२॥

खेरीज बाहेर पुरे । वसविले एकाहुन एक सरे । बंदोबस्ती गस्ती पाहरे । लोक खुखवस्ती बांधूनि घरें ।

एक राहती स्वस्थ नांदती बरे । कौल सर्वांला ताकीद फिरे । धन्याची आज्ञा नांदा कींरे । शिवालय देवालय सुंदरे ।

घाट बांधुनिया कृष्णातिरे । आंत भरचक्का चुनारचिरे । कृपा केली श्रीमोरेश्वरें । प्यसामुग्री भागली । वसविली सांगली० ॥३॥

शेंकडो चारी दुकानदार । जोहोरी बोहोरी शेटे सावकार । रुमाली रस्ते बांधून चार । बनविला बाग चांगला फार ।

आंत मांडव द्राक्षांचे गार । सुरुची झाडें मनोहर । फुलें हरजिनशी अपरंपार । पाचदवणा मरवा कचनार ।

गुलाब चमेली गुले अनार । मोतिया मोगर्‍यांचे हार । सोनचाफे मकरंद बहार । गणित करतांना वाटेल फार ।

म्हणुनि सांगितले सारासार । आंत उमराव जुने सरदार । अश्वरथ गाडया कुंजर बहार । पालख्या शिवाय घोडेस्वार ।

तलावे देती चक्राकार । दुपेटे शेले भरीजरतार । एकापरीस एक दवलतदार । भले लोक संग्रही धनदार ।

पुण्य त्या चिंतामणीचें सारें । मुख्य सवाला तोच आधार । दानधर्माला बहुत उदार । आल्या गेल्याचा आधीं सत्कार ।

कल्पनाबुद्धीचे भांडार । न लागे ज्याचा अंतनापार । पाहिले हें पक राजद्वार । विवेकी बिचार सारासार ।

कविता अनंतफंदी करी । ताल सुर नमुदा लागली । बसविली सांगली० ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पोवाडा