जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारात ।

तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ॥ध्रु०॥

धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले ।

किर्त दिगंतरी करुन कुळातिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥

एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले ।

दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाही दरिद्री कुणी उरले ।

शालिवाहन शक नर्मदेपावत जाऊन जळी घोडे विरले ।

श्रीमंतास करभार देउन आले शरण रिपु पृथ्वीवरले ॥

चा० महावीर महादजीबाबा हुजरातीचे॥

आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥

केले महोच्छाव खुब मोथ्या गजरातीचे ॥चा०॥

तर्‍हे तर्‍हेचे ख्याल तमाशे बहुत होती दळभारात ।

श्रीमंतांचा संकल्प हाच की रंग करावा शहरात ॥१॥

कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्‍यांचा ।

सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधे बेत अधिक कारभार्‍यांचा ॥

मधे मुख्य अंबारि झळाळित मागे थाट अंबार्‍यांचा ।

चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्‍यांचा ॥

हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्‍यांचा ।

धुमाधार अनिवार मार भर बंबांच्या फटकार्‍यांचा ।

चा० नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥

वर्णिती भाट यश कीर्ति सकल गर्जुन ॥

चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥

चा० घरोघरी नारी झुरझरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारत ।

गुलाल गर्दा पेल दुतर्फा रंग रिचविती बहारांत ॥२॥

सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छेदात ।

हास्यवदन मन सदय सोबले शूर शिपाईवृंदात ॥

दोहो दाहो हाती भरमुठी दिल्हे चत लाल दिसे खुब बुंदात ।

तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात ॥

सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशे चवदात ।

परिधावि संवत्सरात फाल्गुन वद्य चतुर्दशी धादांत ॥

चा० बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥

रंगाचे पाट रस्त्यात वाहु लागले ॥

किती भरले गुलाले चौक ओटे बंगले ॥

चा० कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरात ।

पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारात ॥३॥

भोतगाडे रणगाडे गुलाले भरून चालती स्वारीत ।

गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारीत ॥

आपाबळवंतराव खवाशित चौरि मिजाजित वारीत ।

लाल कुसुंबि रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥

कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित ।

बल्लम बाण बोथाट्या इटे लगी वाद्यघोष डिमदारीत ।

चा० भले भले एकांडे मधे घोए घालती ।

बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥

संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥चा०॥

वत्रपाणिवारिती तरी झालि गर्दी मोठि बुधवारात ।

झुकत झुकत समुदाय सहित निट स्वारि आली रविवारात ॥४॥

आधिच पुणे गुलजार तशामधे अपूर्व वसला आदितवार ।

त्यात कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥

हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार ।

हर्ष होउन राजेंद्र झांकिती शरिरानन वारंवार ॥

पाटिल बावानी नेउन शिबीरा रंग केला जोरावार ।

वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥चा०॥

उलटली स्वारी मग महिताबा लाउनी ॥ कुरनिसा करित जन वाड्यामधे जाउनी ॥

दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥चा० महादेव गुणिराज फेकिती तान तननन दरबारात ।

प्रभाकराचे कवन पसरले सहज सहज शतावधि नगरात ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पोवाडा