बंधु बलरामासह गोकुळीं अवतरसी ।
मारुनि सकळां दुष्टा भूभारा हरिसी ॥
गोपवधूसी रासक्रीडा बहु करिसी ॥
आत्मज्ञाना कथुनी त्यासहि उद्धरिसी ॥ १ ॥
जय कृष्ण जय कृष्ण जय जय कंसांता ।
वंशीवादनयोगें भुलविसी सुरकांता ॥ धृ. ॥
सीमा सोडुनि इंद्रें करितां बहु कोप ।
गोवर्धन उचलोनी रक्षिसि गोगोप ॥
लाविसि गोरसरक्षक गोपीला झोंप ।
सर्वहि चोरुनि भक्षिसी वांटिसि अमूप ॥ जय. ॥ २ ॥
वाजवुनी मुरलीला रमविसि बल्लीला ।
त्यांसहि यमुनातीरी दाविसि बहु लीला ॥
कंठी घालिसि मोहक सफुल्लवल्लीला ।
स्कंधी घेउनि नाचसि रुसल्या गोपींला ॥ जय. ॥ ३ ॥
दमयिसि यमुनाडोही कालीया सर्पा ।
नाचसि फणिवरि थे थे शमविसि तद्दर्पा ॥
गोपीचित्तें हरिसी उभयुनि कंदर्पा ॥
म्हणसी तनुमनधनकृत गर्वहि मज अर्पा ॥ जय. ॥ ४ ॥
नमितों तव चरणांतें जनना मरणांतें ।
नासावें श्री कृष्णा आलो शरणातें ॥
काढी दीनदयाळा मायावरणाते ।
मज द्यावें नारायण नामस्मरणातें ॥ जय. ॥ ५ ॥